Posted On:
09 NOV 2026 8:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 नोव्हेंबर 2026
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज गुजरात मधील अहमदाबाद येथे सुमारे ₹1,400 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली.

अंमली पदार्थांचे व्यसन म्हणजे तरुणांचे शारीरिक व मानसिक आरोग्य तसेच एकाग्रता नष्ट करणारा आणि दहशतवादाला पाठबळ देणारा घटक, अशा शब्दात त्यांनी या समस्येचे वर्णन केले. नक्षलमुक्त भारताचे उद्दिष्ट साध्य केल्यानंतर आता मोदी सरकारने 31 डिसेंबर 2029 पर्यंत ‘नशा मुक्त भारत’ बनवण्याचे लक्ष्य ठेवले आहे, असे शाह यांनी नमूद केले. त्यांनी सर्वांना 31 डिसेंबर 2028 पूर्वी ‘नशामुक्त गुजरात’ बनवण्याची जबाबदारी घेण्याचे आवाहन केले. वर्गात मुलाच्या वर्तनात अनियमित बदल दिसल्यास शिक्षकांनी चाचण्यांची सोय करावी आणि पालकांची भेट घ्यावी, असे आवाहन शाह यांनी केले. पालक आणि नागरिकांनाही आपल्या परिसरात अंमली पदार्थांशी संबंधित कोणत्याही घडामोडीची माहिती देऊन आपली जबाबदारी पार पाडण्याचे त्यांनी आवाहन केले. अंमली पदार्थांच्या व्यसनाशी झुंजणाऱ्या तरुणांसाठी व्यसनमुक्ती केंद्रे स्थापन केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. अंमली पदार्थांच्या व्यसनावर उपचार घेण्यास कोणताही संकोच किंवा लाज बाळगू नये, असे ते म्हणाले. अशा तरुणांची ओळखही गुप्त ठेवली जाईल, अशी हमी त्यांनी दिली.

गुजरात आणि भारताला नशामुक्त करण्याची लढाई केवळ सरकार एकटे लढू शकत नाही. यासाठी नागरिक, शिक्षक आणि पालकांचे सहकार्य अत्यंत आवश्यक आहे, यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भर दिला. एक डिसेंबरपासून एक नियंत्रण कक्ष कार्यान्वित होईल, ज्यामध्ये अंमली पदार्थांशी संबंधित कोणतीही माहिती मिळाल्यानंतर 3 तासांच्या आत कारवाई करणारी यंत्रणा असेल, अशी माहिती त्यांनी दिली. या उद्देशासाठी एक वैज्ञानिक यंत्रणा विकसित करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले. अंमली पदार्थांच्या व्यापारात गुंतलेले मुख्य सूत्रधार आणि मध्यस्थ तुरुंगात जातील हे सुनिश्चित करण्यासाठी देखील व्यवस्था करण्यात आली आहे. अंमली पदार्थांच्या व्यापाराविरोधातील या लढ्यात सरकार एक पाऊलही मागे हटणार नाही, अशी ग्वाही पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या वतीने त्यांनी दिली.

माधुरी पांगे/शैलेश पाटील/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com