Posted On:
07 NOV 2026 8:21PM by PIB Mumbai
विजापूर येथील सैनिकी शाळेत 07 नोव्हेंबर 2026 रोजी पार पडलेल्या 'ऑल इंडिया सैनिक स्कूल नॅशनल गेम्स (AISSNG) 2026' च्या सांगता समारंभाला संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी विजेत्या संघांचे उत्कृष्ट यश आणि खेळाडूंच्या समर्पणाचे कौतुक करत त्यांना पदके व विजेतेपद चषक प्रदान केले.
स्पर्धेच्या अंतिम निकालात, बास्केटबॉल स्पर्धेत मुलांच्या कनिष्ठ गटात घोडाखाल येथील सैनिक शाळेने विजेतेपद पटकावले, तर मुलींच्या कनिष्ठ गटात विकास सैनिक शाळेने बाजी मारली. व्हॉलीबॉल स्पर्धेत मुलांच्या कनिष्ठ गटात अमरावतीनगरच्या सैनिकी शाळेने अजिंक्यपद पटकावले. तसेच, वादविवाद स्पर्धेत झाशी येथील सैनिकी शाळेने, तर प्रश्नमंजुषा स्पर्धेत कपूरथला येथील सैनिकी शाळेने अव्वल स्थान पटकावले.

_20261107202231_e0e490.jpeg)
नौदल प्रमुख ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी यावेळी तरुण कॅडेट्सना संबोधित केले. सतत स्वतःच्या सीमांचा विस्तार करा, कधीही हार मानू नका आणि उत्कृष्टतेची ध्यास बाळगा,” असे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी विजापूर येथील सैनिकी शाळेतल्या आपल्या जडणघडणीच्या दिवसांच्या आठवणींना उजाळा दिला आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाला पैलू पाडण्यात तसेच यशाच्या शिखरावर पोहोचवण्यात या संस्थेचे मोलाचे योगदान असल्याचे आवर्जून नमूद केले.
03 ते 07 नोव्हेंबर 2026 दरम्यान आयोजित करण्यात आलेली 'ऑल इंडिया सैनिक स्कूल नॅशनल गेम्स' ही स्पर्धा राष्ट्रीय एकात्मता, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि परस्पर आकलनाचे एक प्रभावी व्यासपीठ ठरली. या स्पर्धेने विविध प्रदेशांतील विद्यार्थ्यांना एकमेकांचे ज्ञान, संस्कृती, भाषा, श्रद्धा आणि विचार यांची देवाणघेवाण करण्याची संधी दिली; तसेच त्यांच्यात मैत्रीचे दृढ बंध, बंधुभाव आणि राष्ट्रीय अभिमानाची सामायिक भावना निर्माण केली. संरक्षण दलातील कार्यरत व सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकारी, मंत्री, लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा रंगतदार सांगता समारंभ पार पडला.
***
शैलेश पाटील/वैभवी जोशी/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com