Posted On:
07 NOV 2026 11:26AM by PIB Mumbai
भारत आणि युरोपीय महासंघाने युरोपीय महासंघाच्या संशोधन आणि नवोन्मेष क्षेत्रातील प्रमुख कार्यक्रम असलेल्या होरायझन युरोपमध्ये भारताच्या सहभागासाठीच्या वाटाघाटी यशस्वीरीत्या पूर्ण केल्या आहेत. या कार्यक्रमातील भारताचा सहभाग हा दोन्ही बाजूंमधील दीर्घकालीन संस्थात्मक संशोधन सहकार्याच्या चौकटीच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण धोरणात्मक पाऊल आहे. भारत आणि युरोपीय महासंघ यांच्यातील विज्ञान आणि तंत्रज्ञान सहकार्यविषयक करार तसेच भारत-युरोपीय महासंघ व्यापार आणि तंत्रज्ञान परिषद यांच्या अंतर्गत सुरू असलेल्या संशोधन आणि विकास प्रकल्पांच्या आणि सहकार्याच्या आधारावर हा सहभाग निश्चित करण्यात आला आहे.
या सहभागामुळे भारतीय संशोधक, संशोधन संस्था आणि उद्योगांना संयुक्त संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होऊन या कार्यक्रमांतर्गत निधी मिळवण्याची संधी उपलब्ध होणार आहे. तसेच युरोपमधील संशोधन संस्थांसोबत काम करता येणार असून, अत्याधुनिक संशोधन सुविधांचाही लाभ घेता येणार आहे. यामुळे संशोधक आणि तज्ज्ञांची परस्पर देवाणघेवाण वाढेल. तसेच महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान, मानके आणि विविध समस्यांवरील उपाययोजना संयुक्तपणे विकसित करण्यास मदत होईल.
होरायझन युरोप कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात आरोग्य, डिजिटल तंत्रज्ञान, उद्योग आणि अंतराळ, हवामान, ऊर्जा आणि वाहतूक, अन्न आणि जैव-अर्थव्यवस्था या विषयांचा समावेश आहे. हे विषय भारताच्या संशोधनविषयक प्राधान्यक्रमांशी सुसंगत असून, देशाच्या वैज्ञानिक सामर्थ्याला अधिक बळ देणारे आहेत. भारत 2047 पर्यंत विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना, या सहभागामुळे देशातील संशोधन आणि नवोन्मेष क्षेत्राला मोठे बळ मिळणार आहे. 27 जानेवारी 2026 रोजी झालेल्या ऐतिहासिक भारत-युरोपीय महासंघ शिखर परिषदेनंतर या कार्यक्रमात भारताच्या सहभागाबाबत चर्चा सुरू झाली. त्यानंतर 15 जुलै 2026 रोजी ब्रुसेल्स येथे झालेल्या व्यापार आणि तंत्रज्ञान परिषदेच्या मंत्रिस्तरीय बैठकीत औपचारिक वाटाघाटी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
***
नेहा कुलकर्णी/राज दळेकर/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai