संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

अंदमान आणि निकोबार कमांड येथे पहिल्या बिम्स्टेक सागरी सुरक्षा सरावाची सांगता

Posted On: 06 NOV 2026 6:13PM by PIB Mumbai

बिम्स्टेक  सदस्य राष्ट्रांचा पहिला सागरी सुरक्षा सराव 3 नोव्हेंबर 2026 रोजी श्री विजय पुरम येथे यशस्वीपणे संपन्न झाला. 30 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर 2026 या कालावधीत आयोजित विविध उपक्रम आणि समन्वित सागरी कवायतीं नंतर या सरावाची सांगता झाली. हा सराव भारताची एकमेव क्वाड सर्व्हिस कमांड अर्थात चारही दलांची संयुक्त कमांड असलेल्या अंदमान आणि निकोबार कमांड  च्या देखरेखीखाली पार पडला. या कमांडचे प्रमुख कमांडर-इन-चीफ व्हाइस ॲडमिरल विनीत मॅकार्थी हे आहेत.

या सरावात बिम्स्टेक सदस्य राष्ट्रांच्या नौदलांनी सहभाग घेतला. यामध्ये भारतीय नौदलाची जहाजे - आयएनएस तारागिरी, आयएनएस कर्मुक आणि आयएनएस सरयू; म्यानमार नौदलाचे जहाज - यूएमएस किंग आंग झेया; आणि श्रीलंका नौदलाचे जहाज - एसएलएनएस गजबाहू यांचा समावेश होता. प्रादेशिक सागरी सहकार्य आणि सामूहिक सुरक्षा अधिक दृढ करण्याच्या दिशेने ही एक महत्त्वाची घटना ठरली आहे.

दिल्ली घोषणापत्राच्या प्रेरणेनुसार आणि नोव्हेंबर 2025 मध्ये झालेल्या सागरी सुरक्षा सहकार्यावरील बिम्स्टेक तज्ञ गटाच्या चौथ्या बैठकी'तील निष्कर्षांना पुढे नेण्याच्या उद्देशाने हा सराव आयोजित करण्यात आला होता. या सरावामुळे सहभागी नौदलांना एकमेकांशी समन्वय वाढवण्याची, व्यावसायिक संवाद दृढ करण्याची आणि परस्पर सामंजस्य विकसित करण्याची एक मौल्यवान संधी मिळाली.

श्री विजय पुरम येथे पार पडलेल्या किनाऱ्यालगतच्या टप्प्यात उच्चस्तरीय चर्चा, व्यावसायिक संवाद आणि सांस्कृतिक देवाणघेवाण झाली. यामुळे सहभागी प्रतिनिधी मंडळांना आपापल्या संस्थांमधील संबंध अधिक सखोल करण्याची आणि मैत्रीचे बंध दृढ करण्याची संधी मिळाली. त्यानंतर, 2 ते 2 नोव्हेंबर 2026 दरम्यान श्री विजय पुरमच्या समुद्रकिनाऱ्यालगत सी फेज अर्थात समुद्रातील टप्पा पार पडला. यामध्ये समन्वित सागरी तैनाती आणि संयुक्त कार्यात्मक उपक्रम राबवण्यात आले, ज्यातून सुरक्षित आणि स्थिर सागरी वातावरण राखण्यासाठी बिम्स्टेक' सदस्य राष्ट्रांची सामूहिक कटिबद्धता दिसून आली.

केवळ कार्यात्मक सहकार्यापलीकडे जाऊन, या सरावामुळे सहभागी कर्मचाऱ्यांमध्ये दीर्घकाळ टिकणारी मैत्री निर्माण झाली आणि बंगालचा उपसागर समृद्ध, लवचिक आणि खुला असावा, या सामायिक दृष्टिकोनाला बळकटी मिळाली. सामायिक सागरी आव्हानांचा सामना करण्यासाठी आणि परस्पर सागरी हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी बिम्स्टेक राष्ट्रांचा सामूहिक संकल्प या सरावातून दिसून आला.

या पहिल्या सरावाची यशस्वी सांगता, बिम्स्टेक सदस्य राष्ट्रांमधील सागरी सहकार्याला अधिक संस्थात्मक स्वरूप देण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरली आहे.

 

***

Sushma Kane / Rajesh Shirbhate / Madhura Nerurkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2333840) अभ्यागत कक्ष : 6