Posted On:
06 NOV 2026 8:10PM by PIB Mumbai
भारतीय रिझर्व्ह बँक, नागपूर, विभाग आर्थिक समावेशन मजबूत करण्यासाठी, बँकिंग जागरूकता सुधारण्यासाठी आणि सुरक्षित डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी तीन उपक्रम हाती घेत आहे. अर्थ मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाद्वारे, आरबीआय आणि सहभागी बँकांच्या समन्वयाने 21 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर, 2026 या कालावधीत आयोजित करण्यात येत असलेल्या देशव्यापी वित्तीय समावेशकता संतृप्तता अभियान अंतर्गत, आरबीआय, नागपूरचा वित्तीय समावेशन आणि विकास विभाग, संपूर्ण विदर्भात अंमलबजावणीसाठी समन्वय साधत आहे. या मोहिमेचा उद्देश प्रत्येक ग्रामपंचायत आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये किमान एक शिबिर आयोजित करून नागरिकांपर्यंत अत्यावश्यक बँकिंग सेवा पोहचवणे हा आहे.
या शिबिरांमध्ये री-केवायसी, सी-केवायसी, नामनिर्देशन अद्ययावतीकरण, आधार सीडिंग आणि निष्क्रिय जन-धन खाती सक्रिय करण्यासाठी मदत पुरवली जाते. पात्र नागरिक पीएमजेडीवाय, पीएमजेजेबीवाय, पीएमएसबीवाय आणि एपीवाय अंतर्गत नावनोंदणी, किसान क्रेडिट कार्ड अर्जांसाठी मदत आणि प्रधानमंत्री पीक विमा योजनेबद्दल माहिती देखील मिळवू शकतात. आरबीआयच्या उद्गम , आयआरडीएआयच्या बिमा भरोसा आणि सेबीच्या मित्र या प्लॅटफॉर्मद्वारे दावा न केलेल्या ठेवी, विमा रक्कम आणि म्युच्युअल फंड गुंतवणुकीचा शोध घेण्यासाठी देखील मदत उपलब्ध आहे. आरबीआय नागपूरने 21 ऑक्टोबर रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिवसादरम्यान दीक्षाभूमी येथे एलईडी डिस्प्ले, मराठी आणि हिंदीतील ऑडिओ संदेश, बँक स्टॉल्स आणि माहिती साहित्याच्या वितरणाद्वारे या मोहिमेचे उद्घाटन केले. नागरिक शिबिराच्या तपशिलासाठी त्यांच्या जवळच्या बँक शाखेशी किंवा व्यवसाय प्रतिनिधीशी संपर्क साधू शकतात.
जानेवारी 2026 मध्ये सुरू करण्यात आलेल्या "परख – एव्हरी नोट मॅटर्स" या मोहिमेत नागरी सहकारी बँका (यूसीबी), जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका (डीसीसीबी) आणि प्रादेशिक ग्रामीण बँका (आरआरबी) यांच्या अधिकाऱ्यांची सदोष चलनी नोटा हाताळण्याची क्षमता सुधारण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. गेल्या दहा महिन्यांत, आरबीआय नागपूरने 190 नागरी सहकारी बँका, 23 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, दोन राज्य सहकारी बँका, दोन प्रादेशिक ग्रामीण बँका आणि पाच व्यावसायिक बँकांमधील 8,700 हून अधिक अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षणात बनावट नोटा ओळखणे, नोटा परत करण्याचे नियम आणि प्रत्यक्ष निवाड्याच्या सरावांचा समावेश आहे. बँकेच्या काउंटरवर प्रदर्शित करण्यासाठी नियमांचे संदर्भ पोस्टरही तयार करण्यात आले आहे.
आरबीआय नागपूरचा ई-बात (इलेक्ट्रॉनिक बँकिंग जागरूकता आणि प्रशिक्षण) कार्यक्रम इंटरनेट आणि मोबाईल बँकिंग, एनईएफटी, आरटीजीएस, एईपीएस आणि यूपीआय यासारख्या डिजिटल पेमेंट प्रणालींच्या सुरक्षित वापराला प्रोत्साहन देतो. यामध्ये सामाजिक सुरक्षा योजना, ठेव विमा, आरबीआय रिटेल डायरेक्ट, सेंट्रल बँक डिजिटल करन्सी आणि उदगम (UDGAM) पोर्टल यांसारख्या विषयांचा समावेश करण्याबरोबरच, सिम क्लोनिंग, ज्यूस जॅकिंग आणि डिजिटल अरेस्ट, यासारख्या सायबर फसवणुकींबद्दलही जागरूकता निर्माण केली जाते. 2026-27 दरम्यान, विदर्भ आणि मराठवाड्यातील 13 जिल्ह्यांमध्ये 18 कार्यक्रम राबवण्यात आले असून, त्याद्वारे बँक ग्राहक, बचत गट, आशा कार्यकर्त्या, सीआयएसएफ जवान आणि पतसंस्थांचे सदस्य यांच्यासह 6,210 सहभागींपर्यंत पोहोचण्यात आले. एकत्रितपणे, या उपक्रमांचा उद्देश आर्थिक सेवांची उपलब्धता वाढवणे, तसेच नागरिक आणि बँकिंग कर्मचाऱ्यांना अधिक जागरूकतेने आणि आत्मविश्वासाने आर्थिक प्रणाली वापरायला सहाय्य करणे हा आहे.
***
Sushma Kane / Rajesh Shirbhate / Rajashree Agashe / Madhura Nerurkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai