संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारत-अमेरिका यांच्यातील 'टायगर ट्रम्प 2026' संयुक्त लष्करी सरावाची समारोप समारंभाने सांगता

Posted On: 06 NOV 2026 1:59PM by PIB Mumbai

भारत आणि अमेरिका यांच्यातील पाचव्या द्विपक्षीय त्रि-दल  मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण सराव  'टायगर ट्रम्प 2016' या संयुक्त लष्करी सरावाची 5 नोव्हेंबर 2026 रोजी विशाखापट्टणम येथे समारोप समारंभाने सांगता झाली.

31 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर 2026 या कालावधीत झालेल्या या संयुक्त लष्करी सरावात भारत आणि अमेरिकेच्या सशस्त्र दलांतील जवानांनी सहभाग घेतला. यामध्ये स्टाफ एक्सरसाइज (STAFFEX) आणि टेबलटॉप एक्सरसाइज (TTX) यांचा समावेश होता. संयुक्त उभयचर (समुद्र आणि जमीन) मोहिमांवर विशेष भर देत, मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारणाच्या (HADR) संयुक्त मोहिमांचे नियोजन आणि अंमलबजावणी करताना दोन्ही देशांच्या सैन्यदलांमधील समन्वय आणि परस्पर कार्यक्षमता वाढवणे, तसेच एकमेकांच्या कार्यपद्धतींची अधिक चांगली समज विकसित करणे हा या सरावाचा मुख्य उद्देश होता.

'स्टाफएक्स' (STAFFEX) या सरावात सायबर क्षेत्र आणि वैद्यकीय मोहिमांसह विविध समकालीन विषयांवरील कार्यात्मक नियोजन, अभ्यासपूर्ण व्याख्याने आणि विषयतज्ज्ञांमधील चर्चासत्रांचा समावेश होता. यामुळे दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांना आपले व्यावसायिक ज्ञान, अनुभव आणि सर्वोत्तम कार्यपद्धतींची देवाणघेवाण करण्याची संधी मिळाली.

'टीटीएक्स' (TTX) या सरावामुळे सहभागी सैन्यदलांना काल्पनिक परिस्थितीवर आधारित युद्धसरावाच्या माध्यमातून 'स्टाफएक्स'दरम्यान तयार केलेल्या संकल्पना आणि योजनांची अंमलबजावणी करण्याची संधी मिळाली. यामुळे संयुक्त मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण (HADR) मोहिमा राबवताना येणारी कार्यात्मक आव्हाने आणि विविध यंत्रणांमधील समन्वय याबाबत दोन्ही देशांच्या सैन्यदलांमध्ये समान समज विकसित होण्यास मदत झाली.

या समारोप समारंभाला ईस्टर्न फ्लीटचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग रिअर ॲडमिरल विशाल बिश्नोई आणि अमेरिकेच्या पॅसिफिक फ्लीटचे उपकमांडर रिअर ॲडमिरल जोआकिन जे. मार्टिनेझ डी पिनिलॉस यांच्यासह भारत आणि अमेरिकेचे वरिष्ठ लष्करी अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

2019 मध्ये प्रथम आयोजित करण्यात आलेल्या 'टायगर ट्रम्प' या सरावामुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील कार्यात्मक समन्वय आणि द्विपक्षीय संरक्षण सहकार्य सातत्याने अधिक मजबूत होत आहे. 2026 मधील या सरावाची यशस्वी सांगता दोन्ही देशांच्या संयुक्त मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण क्षमतांना अधिक बळकटी देण्याच्या तसेच हिंद-प्रशांत क्षेत्रातील शांतता, स्थैर्य आणि सुरक्षा कायम राखण्यासाठी योगदान देण्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करते.

***
 

Sushma Kane / Ashutosh Save / Madhura Nerurkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2333735) अभ्यागत कक्ष : 6