संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) कडून 'प्रलय' या अर्ध-बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी उड्डाण चाचणी

Posted On: 05 NOV 2026 7:47PM by PIB Mumbai

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) 5 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी 11 वाजून 10 मिनिटांनी ओदिशाच्या किनारपट्टीवरील डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम बेटावरून 'प्रलय'  या अर्ध-बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी उड्डाण चाचणी घेतली. चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी श्रेणीने (Integrated Test Range – ITR) तैनात केलेल्या विविध उपकरणांद्वारे नोंदवलेल्या चाचणी माहितीवरून या चाचणीची सर्व उद्दिष्टे पूर्णपणे साध्य झाल्याचे निश्चित झाले.

हैदराबाद येथील रिसर्च सेंटर इमारात (Research Centre Imarat – RCI) यांनी डीआरडीओच्या अन्य प्रयोगशाळांच्या सहकार्याने हे क्षेपणास्त्र, स्वदेशी तंत्रज्ञानाच्या आधारे विकसित केले आहे. या क्षेपणास्त्र प्रणालीची निर्मिती, विकास आणि उत्पादन भागीदारांपैकी एक असलेल्या भारत डायनामिक्स लिमिटेडने (बीडीएल) केली आहे. संरक्षण दलांच्या वापरासाठीच्या मूल्यमापन चाचण्यांचा भाग म्हणून ही उड्डाण चाचणी घेण्यात आली. यावेळी डीआरडीओचे वरिष्ठ अधिकारी, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी आणि संरक्षण दलांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या यशस्वी चाचणीमुळे 'प्रलय' क्षेपणास्त्र प्रणालीचा भारतीय लष्करात समावेश करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी यशस्वी उड्डाण-चाचणीबद्दल डीआरडीओ, संरक्षण दल आणि उद्योग भागीदारांचे अभिनंदन केले. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेले हे क्षेपणास्त्र उदयोन्मुख आव्हानांविरुद्ध लष्कराची तांत्रिक क्षमता आणि कार्यात्मक (ऑपरेशनल) सज्जता आणखी वाढवेल, असे ते म्हणाले.

संरक्षण सचिव, संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव तसेच डीआरडीओचे अध्यक्ष राजेश कुमार सिंह यांनी या यशस्वी उड्डाण चाचणीसाठी योगदान देणाऱ्या सर्व पथकांचे अभिनंदन केले.

***

Radhika Aghor / Ashutosh Save / Madhura Nerurkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2333390) अभ्यागत कक्ष : 11