Posted On:
05 NOV 2026 3:25PM by PIB Mumbai
भारत अवकाशातील कचरा हटवण्याच्या क्षेत्रात जागतिक स्तरावर सुरुवातीच्या काळातच आघाडी घेणाऱ्या देशांमध्ये स्थान मिळवत आहे. एका भारतीय नवउद्योगाकडून बाह्य अवकाश अधिक सुरक्षित आणि शाश्वत करण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान विकसित केले जात आहे, असे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान तसेच पृथ्वी विज्ञान राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार आणि पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण, निवृत्तिवेतन, अणुऊर्जा आणि अवकाश विभागाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज सांगितले.
2030 पर्यंत अवकाश कचरामुक्त करण्याचे उद्दिष्ट जाहीर करताना मंत्र्यांनी सांगितले की, अवकाशातील कचरा सक्रियपणे हटवण्याच्या क्षेत्रात भारत विकसित करत असलेली क्षमता ही अवकाश तंत्रज्ञानातील देशाचे वाढते जागतिक नेतृत्व आणि संपूर्ण मानवजातीसाठी अवकाशातले वातावरण सुरक्षित करण्याची भारताची बांधिलकी दर्शवते.
नवी दिल्लीतल्या कर्तव्य भवन इथून डॉ. जितेंद्र सिंह यांनी हैदराबादमधील कॉस्मोसर्व्ह स्पेसच्या बेस 1 सुविधेच्या उद्घाटन कार्यक्रमाला दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित केले.
हैदराबाद मधील गाचीबावली इथल्या व्हीएसडी टेक पार्कमध्ये झालेल्या उद्घाटन समारंभाला तेलंगणा सरकारचे माहिती तंत्रज्ञान आणि उद्योगमंत्री डी. श्रीधर बाबू प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कॉस्मोसर्व्ह स्पेसचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. चिरंजीवी फणींद्र हेही यावेळी उपस्थित होते. डॉ. जितेंद्र सिंह या कार्यक्रमात दूरदृश्य प्रणालीद्वारे प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले.
उद्घाटनाबद्दल कॉस्मोसर्व्ह स्पेसचे अभिनंदन करताना डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की, बेस 1 ही सुमारे 14,800 चौरस फूट क्षेत्रावर उभारलेली सर्वसमावेशक आणि अत्याधुनिक सुविधा आहे. इथे अवकाशातील रोबोटची रचना आणि निर्मिती केली जाते, अवकाशातल्या परिस्थितीशी मिळत्याजुळत्या वातावरणात त्यांची चाचणी घेतली जाते आणि मोहिमेच्या नियंत्रण केंद्रातून त्यांचे संचालन केले जाते. या सुविधेमध्ये कक्षेत जवळ जाणे आणि लक्ष्य वस्तू पकडणे यांसाठीच्या प्रयोगशाळा, अवकाश रोबोटिक्स नवोन्मेष प्रयोगशाळा, सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाचे अनुकरण करणारी यंत्रणा आणि उपग्रह एकत्रीकरणासाठीच्या स्वच्छ कक्षांचा समावेश आहे. भारताच्या खासगी अवकाश क्षेत्राच्या क्षमतेत या सुविधेमुळे महत्त्वपूर्ण भर पडली आहे.
अवकाशातील कचरा सक्रियपणे हटवणे आणि कक्षेतच उपग्रहांची देखभाल करणे या क्षेत्रांत अग्रणी कामगिरी केल्याबद्दल डॉ. जितेंद्र सिंह यांनी डॉ. चिरंजीवी फणींद्र आणि त्यांच्या चमूचे अभिनंदन केले. कंपनीच्या स्थापनेनंतर एका वर्षाच्या आत, जुलै 2026 मध्ये मिशन एम्ब्रेसने अवकाशात मृदू रोबोटिक पाकळ्यांची चाचणी घेतली. यावरून भारतातल्या खासगी अवकाश नवउद्योगांची वेगवान प्रगती आणि वाढती तांत्रिक परिपक्वता दिसून येते, असे त्यांनी नमूद केले. इस्रो आणि गगनयान कार्यक्रमातल्या चमूच्या अनुभवाचा खासगी क्षेत्रातल्या सहकार्याच्या माध्यमातून उपयोग करून घेतला जात असल्याबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केले.
डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की, कॉस्मोसर्व्ह स्पेसने सॅटेलाइट सिस्टीमसाठी पिक्सेल बरोबर, प्रोपल्शन सिस्टीमसाठी ध्रुव एरोस्पेस नेदरलँड्स आणि लॉन्च सेवांसाठी स्कायरूट एरोस्पेस यांच्याबरोबर केलेली भागीदारी, अंतराळ तंत्रज्ञानातील संपूर्ण सहकार्याच्या उगवत्या संस्कृतीचे दर्शन घडवते. एकात्मिक अंतराळ मोहिमा आखण्यासाठी आणि जागतिक मापदंड प्रस्थापित करण्यासाठी भारतीय स्टार्टअप्स स्वदेशी पेलोड, बॅटरी तंत्रज्ञान, उपग्रह प्रणाली आणि खासगी प्रक्षेपण क्षमता यांना कसे एकत्र आणत आहेत हे या उपक्रमातून दिसून येते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंतराळ क्षेत्रात केलेल्या परिवर्तनकारी सुधारणांमुळे भारताची अफाट क्षमता खुली झाली, असे नमूद करत डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की, सुमारे पाच ते सहा वर्षांपूर्वी सुरू झालेला हा प्रवास आणि त्यानंतर 'न्यूस्पेस इंडिया लिमिटेड' आणि 'इन-स्पेस' ची स्थापना, यामुळे देशातील अंतराळ परिसंस्थेचे स्वरूप पूर्णपणे बदलले. भारताची अंतराळ अर्थव्यवस्था सुमारे 9 अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत वाढली असून, आगामी दशकात ती 40 ते 45 अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे, त्याचवेळी, देशातील अंतराळ क्षेत्रातील स्टार्टअप परिसंस्था एका अंकी संख्येवरून वाढून, आता सुमारे 450 उद्योगांपर्यंत विस्तारली आहे.
ते म्हणाले की, भारताकडे वैज्ञानिक प्रतिभा किंवा तांत्रिक क्षमतांची कधीच उणीव नव्हती, गरज होती ती केवळ अशा पोषक परिसंस्थेची, जी तरुणांमधील अफाट क्षमतांना वाव देऊ शकेल. त्यांनी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांना अवकाश क्षेत्रात अधिक सक्रियपणे सहभागी होण्याचे आवाहन केले आणि नवोन्मेषाला गती देण्यासाठी, सहयोग बळकट करण्यासाठी आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाला पाठिंबा देण्यासाठी विज्ञान आणि संशोधनात अधिक परोपकार करण्याचे आवाहन केले.
डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय भागीदारीबरोबरच तंत्रज्ञानविषयक स्वावलंबन आणि आणि सार्वभौम क्षमता प्राप्त करणे हे भारताचे अंतिम उद्दिष्ट आहे. चांद्रयान आणि गगनयान कार्यक्रमांमधील भारताची कामगिरी, अत्यंत कमी खर्चात प्रगत मोहिमा राबवण्याची भारताची क्षमता दर्शवते. भारताची अंतराळ क्षमता 'गति शक्ती', स्मार्ट सिटी, आपत्ती सज्जता आणि नागरिकांना थेट लाभ देणाऱ्या इतर अनेक क्षेत्रांमधील उपयोगांद्वारे पृथ्वीवरील जीवनात परिवर्तन घडवून आणत आहेत, यावरही त्यांनी भर दिला.
केंद्रीय मंत्री म्हणाले की, कॉस्मोसर्व्ह स्पेसचा उपक्रम 'विश्वबंधू भारत'च्या भावनेचे प्रतीक असून, तो अंतराळ शाश्वततेप्रति असलेली भारताची वचनबद्धता राष्ट्रीय सीमांच्या पलीकडे मानवतेच्या हितासाठी विस्तारत आहे. त्यांनी अंतराळातील वातावरण अधिक स्वच्छ आणि सुरक्षित ठेवण्यासाठी योगदान दिल्याबद्दल चमूचे अभिनंदन केले आणि सांगितले की, अशा उपक्रमांमुळे अंतराळ तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताचे जागतिक नेतृत्व अधिक बळकट होईल आणि देशाचे भू-राजकीय स्थान उंचावेल.
लवकरात लवकर या केंद्राला प्रत्यक्ष भेट देण्यासाठी आणि 'कॉस्मोसर्व्ह स्पेस' टीमशी संवाद साधण्यासाठी आपण उत्सुक असल्याचे डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले.

***
Nitin Fulluke / Nikhil Chitre / Rajashree Agashe / Madhura Nerurkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai