कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एमएसडीई कडून 19 संस्थांना कौशल्य उत्कृष्टता केंद्रे म्हणून मान्यता

Posted On: 02 NOV 2026 9:50PM by PIB Mumbai

‍नवी दिल्ली, 2 नोव्हेंबर 2026

कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने आज देशभरातील 19 नामांकित  संस्थांना, कौशल्य उत्कृष्टता केंद्रे म्हणून अधिकृत मान्यता दिली. एमएसडीईच्या सचिव, देबश्री मुखर्जी यांनी आज नवी दिल्लीत कौशल्य भवन इथे झालेल्या कार्यक्रमात, ही मान्यता प्रमाणपत्रे सादर केली. ही मान्यता, 9 ऑक्टोबर 2026 ते 8 ऑक्टोबर 2029 या काळात वैध असणार आहे.

कौशल्य उत्कृष्टता केंद्रे आणि व्यवसाय प्रशिक्षण केंद्रे, अशी मान्यता देण्यासाठीच्या मार्गदर्शक तत्त्वांअंतर्गत उपलब्ध करून दिलेल्या ‘ग्रीन चॅनेल’च्या माध्यमातून या संस्था यादीत समाविष्ट करण्यात आल्या आहेत.

या प्रक्रियेमुळे, या राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाच्या संस्था, पीएम-सेतू अंतर्गत श्रेणीसुधारित करण्यात आलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था तसेच केंद्र सरकारची मंत्रालये, विभाग आणि राज्य सरकारे यांच्याद्वारे संचालित किंवा नोंदणी  करण्यात आलेली कौशल्य उत्कृष्टता केंद्रे, अशा सर्व प्रतिष्ठित संस्थांना जलदगतीने नोंदणीकृत होण्याचा मार्ग उपलब्ध होतो. या प्रक्रियेंतर्गत पात्र संस्थांना आवश्यक माहिती सादर करावी लागते आणि त्यांचे अर्ज नामांकन किंवा नियमित मूल्यमापन प्रक्रिया न होता, थेट कार्यकारी समितीसमोर विचारार्थ ठेवले जातात. अशा सुलभ आणि जलद मंजुरी प्रक्रियेद्वारे, प्रतिष्ठित तसेच उच्च गुणवत्तेच्या संस्थांची नोंदणी वेगाने करण्याचा या व्यवस्थेचा उद्देश आहे.

यासाठीची मार्गदर्शक तत्वे, 15 जुलै 2026 रोजी जारी करण्यात आली. त्याद्वारे, एका स्थायी, अत्याधुनिक आणि उद्योग-संलग्न प्रशिक्षण संस्थांची संपूर्ण व्यवस्थाच, अधिक मजबूत करण्याचा उद्देश आहे. त्यासाठी अत्याधुनिक पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान आणि मजबूत उद्योग भागीदारीचे पाठबळही दिले जात आहे.

एमएसडीसी च्या सचिव, देबश्री मुखर्जी यावेळी बोलतांना म्हणाल्या, “आम्ही देशातील सर्वात प्रतिष्ठित संस्थांचे एक भांडार उभारतो आहोत, ज्या कौशल्यात तज्ञ असतील, आणि त्यांचे निकाल उत्कृष्ट असतील, त्यानुसार त्यांचे वर्गीकरण केले जाईल, अशा संस्था कौशल्य विकासाचे आधिकाधिक उत्तम परिणाम साधण्यात मदत करतील, आपल्या आकांक्षी युवकांना कौशल्ये प्रदान करतील. ही केंद्रे, उत्तम दर्जाचे प्रशिक्षण देण्यात महत्वाची भूमिका पार पडतील, प्रशिक्षक आणि मूल्यमापन करणाऱ्यांना सहाय्य करतील, संस्थांची उद्योगांशी असलेली सांगड अधिक मजबूत करतील आणि अध्यायनाचे निष्कर्ष सुधारतील. अशा संस्थांसोबत काम करण्यास आम्ही उत्सुक आहोत, ज्यातून अत्याधुनिक आणि भविष्यासाठी सज्ज असे कौशल्य सर्व क्षेत्रे आणि प्रदेशात उपलब्ध होऊ शकेल.”

‘कौशल्य उत्कृष्टता केंद्र’ (CoE-Skills) हे कायमस्वरूपी, प्रगत आणि विशिष्ट क्षेत्रावर केंद्रित असलेले प्रशिक्षण केंद्र म्हणून विकसित करण्याची संकल्पना आहे. या केंद्रांद्वारे उच्च दर्जाचे, उद्योग क्षेत्राच्या गरजांशी सुसंगत आणि परिणामाभिमुख कौशल्य प्रशिक्षण दिले जाईल. या केंद्रांमध्ये प्रगत आणि तंत्रज्ञानाधारित प्रशिक्षण, कौशल्य मूल्यमापन, मार्गदर्शन आणि करिअरविषयक समुपदेशन, प्रशिक्षक आणि मूल्यांकनकर्त्यांचे प्रशिक्षण, उद्योग क्षेत्राशी समन्वय तसेच प्रशिक्षणानंतरच्या परिणामांची पूर्तता आणि त्यांचा मागोवा घेणे अशा विविध कामांचा समावेश असेल.

उच्च दर्जाच्या संस्था आणि विशेष प्रशिक्षण केंद्रांना एका समान राष्ट्रीय चौकटीत आणून, ‘कौशल्य उत्कृष्टता केंद्र’ हा उपक्रम प्रगत प्रशिक्षण क्षमता बळकट करण्यास, संस्थात्मक कौशल्य व अनुभवाचे व्यापक आदानप्रदान सुलभ करण्यास आणि देशभरात विश्वासार्ह, उद्योग क्षेत्राच्या गरजांशी सुसंगत व परिणामाभिमुख कौशल्य विकासाला प्रोत्साहन देण्यास मदत करेल.

कौशल्य उत्कृष्टता केंद्रे म्हणून मान्यता मिळालेल्या महाराष्ट्रातील संस्था -

रसायन आणि पेट्रोकेमिकल

CIPET: CSTS, संभाजीनगर , महाराष्ट्र

बांधकाम

भारतीय रेल्वे स्थापत्य अभियांत्रिकी संस्था, पुणे, महाराष्ट्र

बहु – विभागीय

प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्था, पुणे, महाराष्ट्र

सागरी अभियांत्रिकी

आयएनएस शिवाजी – भारतीय नौदलाच्या सागरी अभियंत्यांसाठीची प्रमुख प्रशिक्षण संस्था, पुणे, महाराष्ट्र

याशिवाय गोव्यातल्या राष्ट्रीय हायड्रोग्राफी संस्थेचाही या 19 संस्थांमध्ये समावेश आहे.  


निलीमा चितळे/राधिका अघोर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 


(Release ID: 2331830) अभ्यागत कक्ष : 8
Read this releasein: English , हिन्दी