कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
Posted On:
02 NOV 2026 8:43PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 नोव्हेंबर 2026
कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण व निवृत्तीवेतन मंत्रालयाच्या निवृत्तीवेतन व निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाने (डीओपीपीडब्ल्यू )2 नोव्हेंबर 2026 रोजी नवी दिल्लीतील एनडीसीसी कन्वेन्शन सेंटर येथे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सहकार्याने देशव्यापी डिजिटल जीवन प्रमाणपत्र मोहीम 5 अंतर्गत भव्य शिबीर आयोजित केले. निवृत्तीवेतनधारक व ज्येष्ठ नागरिकांनी या शिबिरात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. तंत्रज्ञान आधारित, सुलभ व निवृत्तीवेतनधारकांना अनुकूल अशा सेवांद्वारे डिजिटल हयातीचा दाखला सादर करण्याची सुविधा उपलब्ध करुन देणे हा या शिबिराचा उद्देश होता.
डीओपीपीडब्ल्यूच्या सचिव निवेदिता शुक्ला वर्मा यावेळी म्हणाल्या की निवृत्तीवेतनधारकांचे डिजिटल सक्षमीकरण हा सरकारच्या जीवन सुलभता वचनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे, विशेषतः चेहऱ्याद्वारे ओळख सुविधेमुळे निवृत्तीवेतनधारकांना बँकेत अथवा अन्य कार्यालयात प्रत्यक्ष न जाता स्मार्टफोन्स द्वारे स्वतंत्रपणे डिजिटल हयातीचा दाखला निर्माण करणे शक्य झाले. या सुविधेने हयातीचा दाखला सादर करण्याच्या प्रक्रियेत अमूलाग्र बदल घडवून आणला या मुद्द्यावर सचिवांनी भर दिला.
सचिवांनी या उपक्रमात एसबीआयने दिलेल्या लक्षणीय योगदानाची प्रशंसा केली. बँकेने गेल्या वर्षी या मोहीमेतून जवळपास 25 लाख डिजिटल हयातीचे दाखले वितरित केल्याची माहिती त्यांनी दिली.
सध्याच्या मोहीमेचा भाग म्हणून एसबीआय 115 शहरांमध्ये विशेष डीएलसी शिबिरे आयोजित करणार आहे आणि आपल्या शाखांच्या व समर्पित पथकांच्या माध्यमातून या सेवेचा विस्तार करणार आहे. बँकेने आपल्या निवृत्तीवेतनधारकांमध्ये याची व्याप्ती वाढवण्यासाठी आणि निवृत्तीवेतनधारकांची संख्या सर्वाधिक असलेल्या बँकेच्या शाखांमध्ये विशेष सुविधा पुरविण्यासह डिजिटल सेवांसाठी काही उपक्रमदेखील हाती घेतले आहेत.
डीओपीपीडब्ल्यूचे सहसचिव ध्रुवज्योती सेनगुप्ता यांनी या मोहीमेतील सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन निवृत्तीवेतनधारकांना केले. आपल्या सहकारी निवृत्तीवेतनधारकांना ही सेवा वापरण्यास प्रोत्साहन देऊन अधिक सुलभ, पारदर्शी व नागरिककेंद्री निवृत्तीवेतन प्रणालीसाठी योगदान द्यावे असेही आवाहन त्यांनी केले.
निलीमा चितळे/सुरेखा जोशी/प्रिती मालंडकर