Posted On:
02 NOV 2026 7:17PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 नोव्हेंबर 2026
रेल्वे मंत्रालयातर्फे 30 ऑक्टोबर 2026 रोजी नवी दिल्लीतल्या रेल भवन इथे राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात आला. तसेच, स्वच्छता ही सेवा 2026 या विशेष अभियान 6.0 अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त रेल्वे मंडळाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश कुमार यांनी रेल भवनमधल्या विचार सभागृहात उपस्थितांना राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ दिली. यावेळी रेल्वे मंडळाचे सदस्य, महासंचालक, वरिष्ठ अधिकारी आणि रेल्वे मंत्रालयातले कर्मचारी उपस्थित होते.

सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती 31 ऑक्टोबर रोजी दरवर्षी राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी केली जाते. संस्थानांचे भारतीय संघराज्यात विलीनीकरण करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. देशाची एकता आणि अखंडता अधिक मजबूत करण्यासाठीही त्यांनी मोलाचे योगदान दिले.
स्वच्छता ही सेवा 2026 या विशेष अभियान 6.0 अंतर्गत रेल भवन इथे स्वच्छता, आरोग्य आणि स्वच्छताविषयक सुविधा यांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात आले. स्वच्छता मित्रांच्या आरोग्याची आणि कल्याणाची काळजी घेण्याचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांच्यासाठी आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले.

यावेळी रेल्वे मंडळाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी रेल भवनमधली स्वच्छता राखण्यासाठी समर्पित भावनेने दिलेल्या सेवांबद्दल स्वच्छता मित्रांचा सत्कार केला. रेल भवनमधली स्वच्छता कायम राखण्यासाठी त्यांनी केलेल्या परिश्रमांची आणि स्वच्छतेची भावना जपण्याच्या त्यांच्या बांधिलकीची या सत्कारातून दखल घेण्यात आली.

दैनंदिन देखभाल आणि व्यवस्थापनाची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या योगदानाचाही या कार्यक्रमात गौरव करण्यात आला. रेल्वे मंडळातल्या वरिष्ठ सदस्यांनी समर्पण आणि मेहनतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार केला. यामध्ये स्वच्छता व्यवस्थापन आणि उद्यान विभागातल्या कर्मचाऱ्यांचाही समावेश होता. रेल्वे परिवारातली एकतेची भावना आणि एक कुटुंब म्हणून एकत्र काम करण्याची वृत्ती यातून अधोरेखित झाली. भारतीय रेल्वे आणि देशातल्या जनतेच्या सेवेसाठी आयुष्याचा महत्त्वपूर्ण काळ समर्पित करून निवृत्त झालेल्या 11 कर्मचाऱ्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमातून कार्यालये स्वच्छ आणि हरित ठेवण्याचा संदेश देण्यात आला.त्याचबरोबर सांघिक कार्य, परस्पर आदर आणि सामूहिक जबाबदारीची संस्कृती जोपासण्यावर भर देण्यात आला. भारतीय रेल्वे हा एक परिवार असून, देशातल्या जनतेच्या सेवेसाठी एक संघ म्हणून एकत्र काम करत असल्याची भावना या कार्यक्रमातून व्यक्त झाली.
एक भारत, श्रेष्ठ भारत या संकल्पनेच्या दिशेने देशाची वाटचाल सुरू असताना, राष्ट्रीय एकता आणि अखंडता अधिक बळकट करण्यात भारतीय रेल्वे महत्त्वाची भूमिका बजावत आहे. देशाची राष्ट्रीय वाहतूक व्यवस्था म्हणून भारतीय रेल्वे देशाच्या कानाकोपऱ्यांना जोडते आणि दररोज लाखो प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचवते. लोक, प्रदेश आणि राज्ये यांना एकमेकांच्या जवळ आणणारे राष्ट्रीय एकतेचे प्रतीक म्हणून भारतीय रेल्वे कार्यरत आहे.
निलीमा चितळे/निखिलेश चित्रे/प्रिती मालंडकर