Posted On:
31 OCT 2026 9:24PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त गुजरातमधील एकता नगर येथे आयोजित राष्ट्रीय एकता दिवस सोहळ्यात सहभागी झाले होते. यावेळी केलेल्या भाषणात पंतप्रधानांनी पारंपरिक सकाळचा कार्यक्रम ते सायंकाळचा समारंभ असा बदल अधोरेखित केला. भारत पर्व दालनामध्ये काल सायंकाळी झालेल्या दिमाखदार समारंभाची आणि सकाळच्या एकता दौडमध्ये सहभागी झालेल्या लाखो नागरिकांनी घेतलेल्या एकता शपथेची त्यांनी आठवण केली.
जगातील सर्वात उंच स्टॅच्यु ऑफ युनिटी या पुतळ्याच्या उभारणीमधे देशभरातील नागरिकांनी योगदान दिल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच या स्थळाचे अनोखे वलय व एकता दिवसाची प्रेरणादायी उर्जा यांचा उल्लेख करताना पंतप्रधान म्हणाले की या स्मारकाला भेट देताना भारतीय नागरिक असल्याच्या अभिमानाने आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्याविषयीच्या कृतज्ञतेच्या भावनेने उर भरुन येतो. “स्वातंत्र्यानंतर त्यांनी 550 पेक्षा जास्त संस्थानांना एकत्र आणले आणि पोलादी निर्धाराने त्या सर्वांना एकतेच्या सूत्रात बांधले,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
स्वातंत्र्य देशाला आपली ओळख निर्माण करण्यासाठी सक्षम करते आणि प्रजासत्ताक पद्धत घटनेच्या चौकटीत राहून सार्वजनिक उत्तरदायित्व सुनिश्चित करण्यासाठी निर्णय घेण्यात मार्गदर्शन करते असे स्पष्ट करुन, एकता देशाला प्रगती करण्यासाठी आंतरिक बळ देते हा मुद्दा पंतप्रधानांनी अधोरेखित केला. “म्हणूनच आज आपल्या देशात स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन आणि एकता दिवस हे तीनही राष्ट्रीय सण संपूर्ण उत्साहात साजरे केले जातात,” असे मोदी म्हणाले.
यावर्षीच्या राष्ट्रीय एकता संचलनाद्वारे एकता नगर येथे राष्ट्रीय ऐक्याचे अनोखे, भव्य दर्शन घडले असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. हे संचलन पोलिस व सुरक्षा दलांच्या शौर्याला समर्पित होते आणि यातील चित्ररथांमधून भारताचा वारसा व आकांक्षा यांचे दर्शन घडले असे नमूद करुन पंतप्रधानांनी सांगितले की एकता दिवस केवळ औपचारिक कार्यक्रमांचा दिवस न राहता लोकांच्या सहभागातून साजरा होणारा लोकाभिमानाचा सोहळा ठरत आहे. “या समारंभाच्या माध्यमातून मी राष्ट्रीय एकता दिनानिमित्त सर्व देशवासियांचे अभिनंदन करतो आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या चरणी नतमस्तक होतो,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
सरदार पटेल हे उत्तुंग ऐतिहासिक व्यक्तीमत्त्व होते. त्यांच्याशिवाय आधुनिक भारताची कल्पनाच केली जाऊ शकत नाही असे सांगून पंतप्रधान म्हणाले की देशाच्या सध्याच्या भौगोलिक व राजकीय प्रतिमेला आकार देण्याचे श्रेय सरदार पटेलांचे आहे. “फाळणीनंतरही हिमालयापासून हिंद महासागरापर्यंत भारताला सुरक्षित ठेवणारे सरदार पटेलच होते,” असे मोदी म्हणाले.
भारताचे स्वरूप आणि राष्ट्रीय चेतनेची सखोल जाणीव असल्यामुळे सरदार वल्लभभाई पटेल यशस्वी झाले, असे पंतप्रधानांनी सांगितले. या महान नेत्याने विविधतेला अडथळा न मानता, हजारो वर्षांपासून भारतीय संस्कृतीला टिकवून ठेवणाऱ्या राष्ट्रीय एकतेचा खरा पाया मानल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. “याच सामर्थ्याने आपण प्रगती आणि समृद्धीची शिखरे गाठली आहेत,” असे पंतप्रधान म्हणाले.
सरदार पटेल यांनी देशाला भौगोलिक आणि भावनिकदृष्ट्या एकत्र करून आधुनिक भारताचा पाया रचला, यावर भर देत पंतप्रधानांनी, देशाच्या सांस्कृतिक पुनरुत्थानाला चालना देण्यात सरदार पटेल यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर प्रकाश टाकला. “गुजरातमधील सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीद्वारे त्यांनी देशाच्या सांस्कृतिक पुनरुत्थानालाही चालना दिली,” असे ते म्हणाले.
यावर्षी सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीला 75 वर्षे पूर्ण होत असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. जुलमी शासकांना न जुमानता हजार वर्षे अभिमानाने फडकत असलेल्या मंदिराच्या ध्वजापासून प्रेरित होऊन देशभरात सोमनाथ स्वाभिमान पर्व साजरे केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. “आणि यावर्षीही देश हा सण त्याच उत्साहाने साजरा करत आहे,” असे पंतप्रधान म्हणाले.
राष्ट्रीय एकतेचे भव्य सोहळे, जागतिक स्तरावर भारताची वाढती प्रतिष्ठा, जलद आर्थिक विकास आणि काशी विश्वनाथापासून राम मंदिरापर्यंत सुरू असलेले सांस्कृतिक पुनरुज्जीवन यांचा उल्लेख करत पंतप्रधानांनी सांगितले की देश सरदार पटेल यांनी दाखवलेल्या त्याच मार्गावर पुढे जात आहे. “यासाठी हा देश त्यांचा सदैव ऋणी राहील,” असेही त्यांनी सांगितले.
सरदार पटेलांच्या 150व्या जयंतीनिमित्त दोन वर्षे चाललेल्या देशव्यापी उत्सवांची आणि त्या काळात देशाने घेतलेल्या महत्त्वपूर्ण संकल्पांची आठवण करून देताना पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले. सरदार पटेल यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त बोलताना पंतप्रधानांनी सांगितले की हे संकल्प अल्पावधीतच पूर्ण करण्यात आले आहेत. “या दोन वर्षांत देशाने अनेक अभूतपूर्व टप्पे गाठले आहेत,” असे पंतप्रधान म्हणाले.
सरदार पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन नक्षलवाद आणि माओवादी दहशतवाद पूर्णपणे संपुष्टात येईपर्यंत स्वस्थ न बसण्याचा संकल्प आपण केल्याची, राष्ट्राला आठवण करून देत, पंतप्रधानांनी घोषित केले की एका वर्षाच्या आत नक्षलवादी कारवायांचे कंबरडे मोडले आहे. नक्षलग्रस्त जिल्ह्यांची संख्या 2015 मधील 126 वरून मार्च 2026 पर्यंत शून्यावर आणल्याचे त्यांनी जाहीर केले. अनेक दशकांच्या हिंसाचाराने ग्रासलेले प्रदेश आता विस्तारणारे रस्ते, मोबाईल नेटवर्क, शाळा आणि आरोग्य सुविधांमुळे विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील होत आहेत, असे त्यांनी सांगितले. “ज्या तरुणांना एकेकाळी अनिश्चिततेचा सामना करावा लागला, त्यांच्यासाठी शिक्षण, रोजगार आणि प्रगतीच्या नवीन संधी खुल्या होत आहेत,” हे त्यांनी अधोरेखित केले.
राष्ट्रीय एकता दिनाच्या सोहळ्यात विशेष अतिथी म्हणून सहभागी झालेल्या पूर्वीच्या नक्षलग्रस्त भागांतील कुटुंबांचे स्वागत करून पंतप्रधानांनी त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या प्रदेशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्राणांचे बलिदान देणाऱ्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना पंतप्रधानांनी आदरांजली वाहिली. “देशाच्या या भागांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या त्या सर्व शूर सैनिकांनाही मी अभिवादन करतो,” असे पंतप्रधान म्हणाले.
राष्ट्रीय पातळीवर केलेल्या ठोस कामगिरीमुळे आणि संवेदनशील प्रशासनामुळे जनतेच्या वाढलेल्या आत्मविश्वासामुळे भारत आज अधिक सुरक्षित आणि दृढनिश्चयी आहे, असे निरीक्षण पंतप्रधानांनी नोंदवले. स्वातंत्र्योत्तर काळातील अनेक दशकांच्या पोकळ घोषणांनंतर गरिबी निर्मूलनात गाठलेल्या ऐतिहासिक टप्प्यावर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला. या काळात ‘गरिबी हटाओ’च्या घोषणा देणारे स्वतःच श्रीमंत झाले, अशी टीका त्यांनी केली. जागतिक बँकेच्या एका अलीकडील अहवालाचा हवाला देत पंतप्रधान म्हणाले की या अहवालानुसार 2024 पूर्वीच्या 10 ते 12 वर्षांत 50 कोटी भारतीयांनी गरिबीवर मात केली आहे. “याचा अर्थ, जिथे पूर्वी 100 पैकी 27 लोक अत्यंत गरिबीच्या विळख्यात होते, तिथे आज हा आकडा 3 पेक्षा कमी राहिला आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
गेल्या 12 वर्षांत गरिबांचे कल्याण आणि सक्षमीकरणाला सर्वोच्च प्राधान्य देऊन, थेट लाभ हस्तांतरण प्रणालीद्वारे गळतीमुक्त मदत पोहोचवणे, मोफत रेशन, मोफत आरोग्यसेवा, कोट्यवधी पक्की घरे, शौचालये, धूरमुक्त स्वयंपाकघरे आणि व्यापक विमा संरक्षण यांसारख्या उपाययोजनांतून जागतिक स्तरावर ही गौरवास्पद कामगिरी साध्य झाली आहे, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की 2014 पूर्वी 25 कोटीपेक्षा कमी लोकांपर्यंत मर्यादित असलेले सामाजिक सुरक्षा कवच आज सुमारे 100 कोटी नागरिकांपर्यंत विस्तारले आहे. सरदार पटेल यांना आदरांजली अर्पण करताना, त्यांच्या आशीर्वादाचे स्मरण करून पंतप्रधानांनी गरीबी पूर्णपणे नष्ट करण्याचा संकल्प पुन्हा व्यक्त केला. "केवळ अशा प्रयत्नांतूनच आपण देशातील गरीबी दूर करू आणि देशाला विकसित भारत बनवू, असे पंतप्रधान मोदींनी ठामपणे सांगितले.
युद्धे, आर्थिक संकट, सामुग्रीची कमतरता आणि विस्कळीत पुरवठा साखळ्यांनी ग्रासलेल्या, गेल्या काही दशकांतील अत्यंत अस्थिर जागतिक परिस्थितीत, राष्ट्रीय एकता हीच स्थिरता आणि यशाची हमी देते, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की भारतीयांची एकजूट हीच देशाची सर्वात मोठी ताकद आहे, जी कोणत्याही जागतिक संकटाचा सामना करण्यास सक्षम आहे. अलीकडच्या जागतिक ऊर्जा संकटाचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की अनेक देशांना इंधनाचे रेशनिंग करावे लागले होते. अशा वेळी, भारत हा मोठी लोकसंख्या असलेला आणि तेलाची आयात करणारा देश असल्याने, येथेही गंभीर संकट येईल असा अंदाज वर्तवला जात होता, तसेच भारतविरोधी शक्तीही सक्रिय झाल्या होत्या. मात्र मुत्सद्दी धोरणात्मक कौशल्य आणि जनतेची एकजूट यांच्या बळावर आपण नागरिकांना या धक्क्यापासून सुरक्षित ठेवले, असे त्यांनी नमूद केले.
गेल्या दशकाहून अधिक काळ राजकीय नैराश्यात राहिल्यानंतर आता उघडपणे बाहेर आलेल्या आणि कट-कारस्थाने रचणाऱ्या, नागरिकांमध्ये फूट पाडणाऱ्या तसेच अफवा पसरवून भारताची प्रतिमा मलिन करण्यासाठी समाज माध्यमांचा शस्त्र म्हणून वापर करणाऱ्या शक्तींविरुद्ध पंतप्रधानांनी सावध केले. त्यांनी नागरिकांना आवाहन केले की त्यांनी परदेशात होणाऱ्या गुप्त बैठका, भारतविरोधी घटकांकडून मिळणारा बाह्य पाठिंबा आणि देशाच्या शत्रूंच्या भाषेशी मिळतीजुळती विधाने करण्याच्या या पद्धती ओळखाव्यात. आपण दुर्गम भागांतून नक्षलवाद संपवला आहे, परंतु वैचारिक अतिरेक्यांचा धोका अजूनही पूर्णपणे टळलेला नाही. अशा घटकांपासून देशाला सदैव सतर्क राहावे लागेल, असा इशारा मोदींनी दिला.
राष्ट्रीय ऐक्याचे हे महान ध्येय आणि एका सक्षम व समर्थ भारताच्या दिशेने सुरू असलेला प्रवास कोणत्याही अडचणींशिवाय अविरत सुरू राहिला पाहिजे, यावर भर देत पंतप्रधानांनी पुढील प्रमुख राष्ट्रीय प्राधान्यक्रम स्पष्ट केले. यामध्ये भारताच्या सीमा पूर्णपणे सुरक्षित करणे, घुसखोरी आणि लोकसंख्याशास्त्रीय बदल रोखणे, तसेच धर्मनिरपेक्ष नागरी संहिता लागू करण्याच्या दिशेने वाटचाल करणे यांचा समावेश आहे. मोठे संकल्प आणि धाडसी निर्णय घेताना अडथळे आणि वादळे येणे अपरिहार्य आहे, हे मान्य करत त्यांनी स्पष्ट केले की एक भारत, श्रेष्ठ भारत आणि विकसित भारत या आपल्या दृढ निश्चयापासून देश मागे हटणार नाही. 2047 चे ध्येय गाठण्यासाठी प्रत्येक श्वासासह अथक परिश्रम केले जातील, असे सांगत त्यांनी उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आणि 'भारत माता की जय'च्या घोषणा दिल्या. पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले की आपण कठोर परिश्रमांच्या शिखरापर्यंत पोहोचू, वादळांचा धैर्याने सामना करू, परंतु आपले लक्ष केवळ एकाच ध्येयावर केंद्रित असेल – 2047 सालापर्यंत एक शक्तिशाली आणि सक्षम भारत घडवणे!
***
निलिमा चितळे/माधुरी पांगे/सुरेखा जोशी/श्रद्धा मुखेडकर/राजेश शिरभाते/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com