राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रपतींच्या उपस्थितीत नाशिक येथील सिंहस्थ महाकुंभाचा ध्वजस्तंभ पूजन, ध्वजापूजन आणि ध्वजारोहण सोहळा


कुंभमेळ्यांसाठी जमणारे असंख्य भाविक म्हणजे भारताच्या सांस्कृतिक तसेच  आध्यात्मिक एकतेचा आणि सातत्यपूर्ण परंपरांचा जागता पुरावा आहे: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Posted On: 31 OCT 2026 8:41PM by PIB Mumbai

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू  आज (31 ऑक्टोबर 2026) महाराष्ट्र राज्यातील नाशिक येथे आयोजित सिंहस्थ महाकुंभाच्या ध्वजस्तंभ पूजन, ध्वजा पूजन आणि ध्वजारोहण सोहळ्याला उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधितही केले.

आपल्या भाषणात राष्ट्रपती म्हणाल्या की, नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ महाकुंभाची परंपरा अत्यंत प्राचीन आणि समृद्ध आहे. हरिद्वारमध्ये गंगेच्या काठी, प्रयागराजमध्ये त्रिवेणी संगमावर, उज्जैनमध्ये क्षिप्रा नदीच्या काठी आणि नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या काठी होणारे कुंभमेळे जगप्रसिद्ध आहेत. शतकानुशतके सातत्याने आयोजित केले जाणारे हे मेळे आपल्या देशाच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि आध्यात्मिक परंपरांच्या सामर्थ्याचे  प्रतीक आहेत.

राष्ट्रपती म्हणाल्या की, शतकानुशतकांपासून या कुंभमेळ्यांसाठी जमणारे असंख्य भाविक म्हणजे भारताच्या सांस्कृतिक व आध्यात्मिक एकतेचा आणि परंपरांच्या सातत्याचा जागता पुरावा ठरला आहे. हे मेळे श्रद्धा आणि सामाजिक सलोख्याचे उत्तम उदाहरण आहेत. त्यांनी विश्वास व्यक्त केला की, नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ महाकुंभ 2027 हा आपल्या प्राचीन वारशाला आधुनिक काळाशी जोडणारा एक सेतू ठरेल. हा सोहळा आपल्या तरुण पिढीला भारताचा भव्य वारसा आणि जीवनातील महत्वाच्या मूल्यांशी जोडण्याची एक उत्कृष्ट संधी ठरेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

राष्ट्रपती म्हणाल्या की, आज जगभरातील लोक हवामानातील टोकाच्या बदलांमुळे अनेक संकटांचा सामना करत आहेत. आपल्या देशातही, महाराष्ट्रासह इतर प्रदेशांत, अनेक लोक आणि प्रामुख्याने आपले शेतकरी—दुष्काळाच्या छायेत आहेत. केंद्र आणि राज्य सरकारे, आपल्या नागरिकांना—विशेषतः शेतकऱ्यांना—सध्याच्या आव्हानांचा सामना करताना आवश्यक मदत मिळावी, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.

स्वच्छतेचे महत्त्व आणि पर्यावरणाबाबतच्या जागरूकतेवर भर देत, राष्ट्रपतींनी नागरिकांना वैयक्तिक आणि सामूहिक अशा दोन्ही स्तरांवर पर्यावरण संवर्धनासाठी सातत्याने प्रयत्न सुरू ठेवण्याचे आवाहन केले. त्यांनी विश्वास व्यक्त केला की, नाशिक येथील महाकुंभात,  कुंभ व्यवस्थापनाचे प्रयत्न आणि जनतेचा सक्रिय सहभाग मिळून स्वच्छता व कचरा व्यवस्थापनाचा एक आदर्श वस्तुपाठ घालून देतील.

राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी इथे क्लिक करा

***

निलिमा चितळे/राजेश शिरभाते/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2331043) अभ्यागत कक्ष : 13