वस्त्रोद्योग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क सवलतीला 31 डिसेंबर 2026 पर्यंत दिली मुदतवाढ

Posted On: 31 OCT 2026 2:38PM by PIB Mumbai


देशांतर्गत वस्त्रोद्योग क्षेत्राच्या कच्च्या मालाची गरज लक्षात घेऊन केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सध्याच्या सीमा शुल्क सवलतीला 31  डिसेंबर 2026 पर्यंत मुदतवाढ दिली आहे.

वित्त मंत्रालयाच्या महसूल विभागाने 30 ऑक्टोबर 2026 रोजी जारी केलेल्या अधिसूचना क्र.  35/2026- कस्टम्स द्वारे ही मुदतवाढ जाहीर केली आहे. या दुरुस्तीमुळे, 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत असलेली सवलत आता दोन महिन्यांनी वाढवून 31 डिसेंबर 2026 पर्यंत लागू करण्यात आली आहे.

देशांतर्गत वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी कापसाची उपलब्धता वाढवणे, विशिष्ट प्रकारच्या कापसाची गरज पूर्ण करणे आणि वस्त्र व तयार कपडे मूल्य साखळीमध्ये मूल्यवर्धनाला चालना देणे, हा या निर्णयाचा उद्देश आहे.

या उपाययोजनेमुळे कापड आणि तयार कपड्यांच्या उत्पादकांना कच्च्या मालाची गरज पूर्ण करण्यासाठी अधिक लवचिकता मिळेल, उत्पादन खर्चाचा ताण कमी होण्यास मदत होईल, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना आधार मिळेल आणि देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय वस्त्रोद्योगाची स्पर्धात्मकता अधिक बळकट होईल अशी अपेक्षा आहे.

या मुदतवाढीमुळे कच्च्या मालाची अखंड उपलब्धता सुनिश्चित होईल, वस्त्रोद्योगाची परिचालन लवचिकता सुधारेल आणि कापूस-आधारित वस्त्र व तयार कपडे क्षेत्रात अधिक मूल्यवर्धन  होण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.

वस्त्रोद्योग मंत्रालय एक स्पर्धात्मक, लवचिक आणि जागतिक स्तरावर एकात्मिक वस्त्रोद्योग क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी; मूल्यवर्धन व रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी; आणि संपूर्ण वस्त्रोद्योग मूल्य साखळीच्या दीर्घकालीन विकासाला बळकटी देण्यासाठी कटिबद्ध आहे.

***

माधुरी पांगे/सुषमा काणे/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2330885) अभ्यागत कक्ष : 15