लोकसभा सचिवालय
azadi ka amrit mahotsav

लोकसभा अध्यक्षांनी भारताचे आध्यात्मिक पुनर्जागरण, सामाजिक परिवर्तन आणि राष्ट्रनिर्माणातील गायत्री परिवाराच्या योगदानाची केली प्रशंसा


लोकसभा अध्यक्षांनी 'गायत्री परिवार'ला विकास, सदाचरण आणि राष्ट्रनिर्माणाचे आदर्श पुढे नेण्याचे केले आवाहन

माता भगवती देवी जी यांचे तप, करुणा आणि सेवेने परिपूर्ण जीवन महिला सक्षमीकरण आणि समाजसुधारणेच्या परिवर्तनकारी चळवळीसाठी प्रेरणादायी ठरले: लोकसभा अध्यक्ष

अखंड ज्योती आध्यात्मिक जागरण, मूल्यधिष्ठित शिक्षण आणि चारित्र्य घडवण्याच्या माध्यमातून लोकांचे जीवन प्रकाशमय करत आहे: ओम बिर्ला

नवी दिल्ली येथे 'गायत्री परिवार'द्वारे आयोजित शताब्दी सोहळ्याला लोकसभा अध्यक्षांनी केले संबोधित

Posted On: 31 OCT 2026 1:32PM by PIB Mumbai

 

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज 'शताब्दी समारोह 2026 निमित्त आध्यात्मिक विभूती आचार्य श्रीराम शर्मा जी आणि माता भगवती देवी जी यांना आदरांजली वाहिली. त्यांनी भारताच्या आध्यात्मिक पुनर्जागरण, सामाजिक परिवर्तन आणि राष्ट्रनिर्माणात त्यांनी दिलेल्या अमूल्य योगदानाचे स्मरण केले. ते म्हणाले की, हा शताब्दी सोहळा केवळ भूतकाळाचे स्मरण करण्याचा प्रसंग नसून, देशातील असंख्य लोकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणणाऱ्या एका सर्जनशील चळवळीचाउत्सव आहे.

नवी दिल्ली येथे 'गायत्री परिवार'द्वारे आयोजित शताब्दी सोहळ्यात बोलताना, आचार्य श्री राम शर्मा जी यांना आदरांजली अर्पण करताना बिर्ला म्हणाले की, 'अखंड ज्योती'च्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण देशात अध्यात्माचा प्रकाश पसरवला आणि व्यक्ती विकास, कुटुंब विकास, समाज विकास व राष्ट्रनिर्मितीच्या आदर्शांनी लोकांना प्रेरित केले. त्यांचा "आपण बदलू, युग बदलेल" हा प्रेरणादायी संकल्प भारत आणि जगभरातील लोकांसाठी एक मूलमंत्र बनला आहे. गायत्री मंत्र आणि यज्ञाच्या माध्यमातून आचार्य जी यांनी लोकांना आध्यात्मिक चेतनेशी जोडले आणि आंतरिक शुद्धी व आध्यात्मिक जागरणाचा मार्ग प्रशस्त केला.

गायत्री परिवारासोबतच्या आपल्या वैयक्तिक ऋणानुबंधांची आठवण सांगताना, बिर्ला म्हणाले की, त्यांनी अगदी दुर्गम गावे आणि पाड्यांवरही आचार्यजींच्या आध्यात्मिक तत्त्वज्ञानाचा परिवर्तनकारी प्रभाव  अनुभवला आहे. या तत्त्वज्ञानामुळे लोकांना कठीण परिस्थितींवर मात करण्यास, तसेच अंधश्रद्धा आणि हानिकारक सामाजिक प्रथांतून बाहेर पडण्यास मदत झाली आहे. या चळवळीने केवळ लोकांच्या सामाजिक जीवनातच बदल घडवून आणला नाही, तर त्यांच्या वैयक्तिक विकासामध्ये, चारित्र्यघडणीमध्ये आणि समाज व राष्ट्राप्रती जबाबदारीची जाणीव अधिक दृढ करण्यातही मोलाचे योगदान दिले आहे.

माता भगवती देवी जी यांना श्रद्धापूर्वक आदरांजली अर्पण करताना, लोकसभेच्या अध्यक्षांनी त्यांचे मातृत्व, प्रेम, करुणा, तपश्चर्या, समर्पण आणि सेवाभावाने परिपूर्ण असाधारण जीवनाचा विशेष उल्लेख केला. ते म्हणाले की, त्यांचे योगदान केवळ आध्यात्मिक जागरणापुरते सीमित नव्हते; त्यांनी सामाजिक परिवर्तन आणि महिला सक्षमीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण चळवळ उभारली. हा तो काळ होता जेव्हा देशभरातील महिलांना अनेक सामाजिक आव्हानांचा आणि अनिष्ट  प्रथांचा सामना करावा लागत होता. त्यांनी नमूद केले की, माता जी यांनी महिलांना शिक्षण घेण्यास, आत्मविश्वास विकसित करण्यास आणि स्वावलंबी बनण्यास प्रेरित केले. त्यांच्या जीवनातून आणि शिकवणीतून हे दिसून येते की, कुटुंबाच्या चौकटीत स्त्रीच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होणे, हे संपूर्ण कुटुंब आणि समाजाच्या प्रगतीचा पाया ठरते. त्यांच्या मातृसुलभ प्रेम आणि करुणामय मार्गदर्शनाने असंख्य महिलांचे जीवन बदलले आणि त्यांच्या सामाजिक व आध्यात्मिक सक्षमीकरणाला नवी गती दिली. आध्यात्मिक जाणीव आणि भारतीय मूल्यांवर आधारित वातावरण, सकारात्मक दृष्टिकोन जोपासण्यासाठी, कुटुंबांना बळकट करण्यासाठी आणि एक प्रगत समाज घडवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते, असेही त्यांनी सांगितले.

बिर्ला यांनी भारताचा आध्यात्मिक वारसा, सांस्कृतिक ज्ञान आणि मूल्यधिष्ठित तत्त्वज्ञान जगाच्या विविध भागांपर्यंत पोहोचवण्यासाठी 'गायत्री परिवार' करत असलेल्या निरंतर प्रयत्नांचे कौतुक केले. ही संस्था अनेक देशांमध्ये आपल्या कार्याद्वारे, समकालीन गरजा लक्षात घेऊन, वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक विकासाच्या आदर्शांना पुढे नेत आहे असे त्यांनी नमूद केले. त्यांनी अध्यात्म, संस्कृती आणि भारतीय मूल्यांवर आधारित शिक्षणाप्रती संस्थेच्या वचनबद्धतेचीही प्रशंसा केली.

आचार्यजींनी स्थापन केलेल्या विद्यापीठाचा उल्लेख करत, लोकसभेचे अध्यक्ष म्हणाले की, शिक्षणाच्या सुरुवातीच्या टप्प्यापासूनच अध्यात्म, सांस्कृतिक मूल्ये आणि चारित्र्य घडवण्यावर या विद्यापीठाद्वारे दिला जाणारा भर अत्यंत प्रशंसनीय आहे.

त्यांनी मूल्यधिष्ठित शिक्षण, नारी जागरण व सक्षमीकरण आणि समाजसुधारणेच्या क्षेत्रात संस्थेने घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक केले. तसेच, भारताच्या आध्यात्मिक परंपरा आणि सांस्कृतिक मूल्यांना जागतिक स्तरावर पोहोचवतानाच, लोकांना विज्ञान व तंत्रज्ञानातील प्रगतीची ओळख करून दिल्याबद्दल त्यांनी डॉ. चिन्मय पांड्या यांची प्रशंसा केली. आजच्या काळात अध्यात्माचे महत्त्व अधोरेखित करत  बिर्ला म्हणाले की, आज जेव्हा अनेक देशांतील लोक तणाव आणि नैराश्याचा सामना करत आहेत, अशा वेळी आंतरिक शांती, आध्यात्मिक बळ आणि अर्थपूर्ण जीवनाचा संदेश अधिक महत्त्वाचा ठरत आहे . त्यांनी नमूद केले की, गायत्री परिवाराचे आध्यात्मिक केंद्र लोकांना मानसिक शांती, आत्मविश्वास, दृढनिश्चय आणि जीवनाला योग्य दिशा प्रदान करते. बिर्ला यांनी गायत्री परिवाराला आवाहन केले की, त्यांनी 'अखंड ज्योती'चा प्रकाश प्रत्येक गावात आणि समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्याचे कार्य सुरू ठेवावे.  जोपर्यंत समाजातील शेवटच्या व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडत नाही, तोपर्यंत हे अभियान अविरत सुरू राहिले पाहिजे  यावर त्यांनी भर दिला. अध्यात्म, धर्म, संस्कृती, चारित्र्य घडण आणि राष्ट्रनिर्मितीचे आदर्श या प्रयत्नांच्या केंद्रस्थानी असायला हवेत, असे ते म्हणाले.

गायत्री परिवाराच्या निरंतर योगदानाबद्दल विश्वास व्यक्त करत बिर्ला म्हणाले की, आचार्य श्री राम शर्मा जी आणि माता भगवती देवी जी द्वारा प्रज्वलित  आध्यात्मिक ऊर्जा आणि चेतना लोकांचे जीवन उजळत राहील, तसेच एक सुसंवादी, जागरूक आणि विकसित समाज घडवण्याचा पाया अधिक बळकट करेल.

***

शिल्पा पोफळे/सुषमा काणे/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2330859) अभ्यागत कक्ष : 8