संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

व्हीआयएसव्ही-2026 च्या उद्घाटन प्रसंगी संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी विकसित भारतासाठी आत्मनिर्भर संरक्षण परिसंस्थेची भूमिका केली अधोरेखित

Posted On: 30 OCT 2026 7:14PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 30 ऑक्टोबर 2026

संरक्षण राज्य मंत्री संजय सेठ यांनी 30 ऑक्टोबर 2026 रोजी नवी दिल्लीतील माणेकशॉ सेंटरमध्ये, संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ, सेंटर फॉर जॉइंट वॉरफेअर स्टडीज (सीईएनजेओडब्ल्यूएस) च्या सहयोगाने आयोजित केलेल्या विश्व-2026 (व्हीआयएसव्ही-2026: व्हिजन, इनोव्हेशन, सिनर्जी, व्हॅल्यूज) चे उद्घाटन केले. ‘संरक्षण क्षमतांचे प्रदर्शन, जागतिक भागीदारीचे बळकटीकरण’, या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमात ‘भागीदार राष्ट्रांसाठी डीआरडीओ संरक्षण उपाय: तंत्रज्ञानापासून धोरणात्मक भागीदारीपर्यंत’, या विषयावरील परिसंवाद आयोजित करण्यात आला होता.

उपस्थितांना संबोधित करताना संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी भारताची संरक्षण क्षमता बळकट करण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याचा विस्तार करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे म्हणून, दूरदृष्टी, नवोन्मेष, समन्वय आणि मूल्ये हे व्हीआयएसव्हीचे चार स्तंभ अधोरेखित केले. दूरदृष्टी भविष्यातील संरक्षण गरजांचा अंदाज घेण्यासाठी दिशा प्रदान करते, नवोन्मेष संशोधनाचे रूपांतर प्रभावी तंत्रज्ञान आणि उपायांमध्ये करते, समन्वय सशस्त्र सेना, संशोधन संस्था, उद्योग आणि आंतरराष्ट्रीय भागीदारांना एकत्र आणतो, आणि मूल्ये ही सहकार्याचा आधार बनून त्यामध्ये विश्वास, परस्पर आदर आणि जबाबदारीची भावना रुजवतात. विकसित भारत @ 2047 च्या दिशेने देशाच्या प्रवासाचा एक भाग म्हणून तांत्रिकदृष्ट्या प्रगत आणि स्वावलंबी संरक्षण परिसंस्था तयार करण्याविषयी भारताची वचनबद्धता त्यांनी अधोरेखित केली. त्यांनी स्वदेशी संशोधन,डिझाइन, विकास आणि उत्पादन क्षमता बळकट करण्यामध्ये 'आत्मनिर्भर भारता'च्या भूमिकेवरही प्रकाश टाकला आणि तांत्रिक स्वावलंबनामुळे भारताला आंतरराष्ट्रीय भागीदारीमध्ये अधिक अर्थपूर्ण योगदान देणे शक्य होईल, असे नमूद केले.

नवोन्मेषावर बोलताना संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी, उदयोन्मुख संरक्षण विषयक आव्हानांना तोंड देण्यासाठी संशोधन आणि तांत्रिक प्रगतीचे रूपांतर प्रभावी उपायांमध्ये करण्याच्या महत्त्वावर भर दिला. भारताच्या स्वदेशी संरक्षण क्षमता बळकट करण्यात डीआरडीओच्या योगदानाची त्यांनी दखल घेतली आणि प्रगत संरक्षण तंत्रज्ञान विकसित करण्यात भारतीय शास्त्रज्ञ, अभियंते आणि उद्योग यांची वाढती भूमिका अधोरेखित केली.

संरक्षण राज्यमंत्र्यांनी डीआरडीओ उत्पादनांची अरबी, स्पॅनिश आणि फ्रेंच भाषांमधील एक संकलन पुस्तिकाही प्रकाशित केली. आंतरराष्ट्रीय भागीदारांमध्ये भारताच्या संरक्षणविषयक उपाययोजनांबाबत अधिक जागरूकता निर्माण करणे आणि संबंधित देशांसोबतच्या सहकार्याला चालना देणे, हे या मागचे उद्दिष्ट आहे.

परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी बदलत्या भू-राजकीय आणि तांत्रिक वातावरणातील संरक्षण मुत्सद्देगिरीचे बदलते स्वरूप अधोरेखित केले आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये धोरणात्मक स्वायत्तता, बहुपक्षीय समन्वय, विश्वास आणि सहकार्य यावर भर दिला.

व्हीआयएसव्ही-2026 ने आंतरराष्ट्रीय भागीदारांना भारताच्या स्वदेशी संरक्षण संशोधन, विकास आणि उत्पादन क्षमतांची ओळख करून घेण्यासाठी, तसेच सहकार्याच्या संभाव्य क्षेत्रांचा शोध घेण्यासाठी संबंधित भागधारकांशी संवाद साधण्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले.


सुवर्णा बेडेकर /राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumba

 


(Release ID: 2330594) अभ्यागत कक्ष : 13