राज्यसभा सचिवालय
azadi ka amrit mahotsav

राज्यसभेचे सभापती सी. पी. राधाकृष्णन यांनी ब्रिक्स सदस्य आणि भागीदार देशांच्या पीठासीन अधिकाऱ्यांसाठी आणि शिष्टमंडळ प्रमुखांसाठी मेजवानीचे केले आयोजन


ब्रिक्स मंच जागतिक सहकार्याचा एक अत्यंत महत्त्वाचा आधारस्तंभ झाला असल्याचे सांगत राधाकृष्णन यांनी ब्रिक्सचे वाढते महत्त्व केले अधोरेखित

Posted On: 27 OCT 2026 8:17PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27 ऑक्टोबर 2026

राज्यसभेचे सभापती सी. पी. राधाकृष्णन यांनी आज नवी दिल्ली येथे आयोजित 12 व्या ब्रिक्स संसदीय मंचामध्ये सहभागी झालेल्या ब्रिक्स सदस्य आणि भागीदार देशांच्या पीठासीन अधिकाऱ्यांसाठी आणि शिष्टमंडळ प्रमुखांसाठी दुपारच्या भोजनाचे आयोजन केले.

या कार्यक्रमाला लोकसभेचे सभापती ओम बिर्ला; ब्रिक्स आणि भागीदार देशांच्या संसदेचे अध्यक्ष व पीठासीन अधिकारी; केंद्रीय मंत्री; राज्यसभेचे उपसभापती हरिवंश; राज्यसभा आणि लोकसभेचे महासचिव, तसेच ब्रिक्स आणि भागीदार देशांचे अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

भारतीय संसदेत सर्व मान्यवरांचे स्वागत करताना, राज्यसभेचे सभापती  म्हणाले की, आपण अशा एका ऐतिहासिक ठिकाणी जमलो आहोत, जे भारताच्या संसदीय लोकशाहीचे केंद्रस्थान आहे. ही लोकशाही तळागाळापासून सर्वोच्च स्तरापर्यंत काळाच्या ओघात विकसित होत गेली आहे. ते म्हणाले की, लोकशाही ही भारतासाठी काही नवीन संकल्पना नाही; इतिहासावरून दिसून येते की, उत्तरेकडील वैशालीसारख्या ठिकाणी लोकशाही अस्तित्वात होती, तर दक्षिणेत चोल राज्यकर्त्यांनी कुडावोलाई  प्रणालीचा अवलंब केला होता. याच खोलवर रुजलेल्या वारशामुळे भारताला लोकशाहीची जननी  म्हटले जाते.

ब्रिक्सचे वाढते महत्त्व अधोरेखित करत सी. पी. राधाकृष्णन म्हणाले की, हे व्यासपीठ जागतिक सहकार्याचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ बनले आहे. त्यांनी ब्रिक्सचे वर्णन अशा एका व्यासपीठाच्या रूपात केले, जिथे विविध संस्कृती, समृद्ध इतिहास आणि गतिमान अर्थव्यवस्था एकत्र येतात; ज्यांचा उद्देश एक संतुलित, सर्वसमावेशक आणि समृद्ध जागतिक व्यवस्था निर्माण करणे हा आहे. त्यांनी पुढे सांगितले की, 12 व्या ब्रिक्स संसदीय मंचादरम्यान झालेली चर्चा आणि विचारविनिमय हे सदस्य आणि भागीदार देशांच्या त्या सामूहिक दृढनिश्चयाचे प्रतिबिंब आहेत, ज्याद्वारे जागतिक आव्हानांना एकता, संवाद आणि परस्पर विश्वासाच्या माध्यमातून सामोरे जाण्याचा प्रयत्न केला जात आहे. सप्टेंबर 2026 मध्ये झालेल्या ब्रिक्स  शिखर परिषदेदरम्यान मांडलेल्या दृष्टिकोनाची आठवण करून देत, सभापतींनी  नमूद केले की  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर प्रकाश टाकला होता की, ब्रिक्स देश जागतिक नवोन्मेष  आणि उपाययोजनांसाठी महत्त्वाचे केंद्र म्हणून उदयास येत आहेत. राधाकृष्णन यांनी दृढ विश्वास व्यक्त केला की, 12 वी ब्रिक्स संसदीय परिषद या प्रयत्नांना अधिक बळकट करेल आणि सदस्य तसेच भागीदार देशांमध्ये आकाराला येत असलेल्या नवोन्मेषांसाठी नवीन संधी निर्माण करेल.

सोनाली काकडे/राजेश शिरभाते/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 2329201) अभ्यागत कक्ष : 6