Posted On:
27 OCT 2026 7:53PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 ऑक्टोबर 2026
राज्यसभेचे अध्यक्ष सी. पी. राधाकृष्णन यांनी आज नवी दिल्लीत रशियन फेडरेशनच्या फेडरल असेंब्लीच्या 'स्टेट डुमा'चे अध्यक्ष महामहिम व्याचेस्लाव्ह वोलोदिन यांच्या नेतृत्वाखालील रशियन संसदीय शिष्टमंडळाची भेट घेतली.
महामहिम व्याचेस्लाव्ह वोलोदिन आणि त्यांच्यासोबत आलेल्या रशियन शिष्टमंडळाचे राज्यसभा अध्यक्षांनी स्वागत केले आणि या भेटीबद्दल आनंद व्यक्त केला. तसेच 'स्टेट ड्युमा'च्या अध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल महामहिम व्याचेस्लाव्ह वोलोदिन यांचे अभिनंदन केले. सप्टेंबर 2026 मध्ये 'स्टेट ड्युमा'च्या नवव्या सत्रासाठीच्या प्रतिनिधींच्या निवडणुका यशस्वीपणे पार पडल्याबद्दलही राज्यसभा अध्यक्षांनी त्यांचे अभिनंदन केले.
उभय देशांमधील घनिष्ठ संबंध दर्शवणाऱ्या अलीकडील काही विशेष घटनांचा सी. पी. राधाकृष्णन यांनी याप्रसंगी उल्लेख केला. सप्टेंबर 2026 मध्ये दिल्ली येथे झालेल्या ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना 'तिरुक्कुरल' (Thirukkural) या ग्रंथाची रशियन आवृत्ती भेट दिली, ही बाब अत्यंत आनंददायी आणि समाधान देणारी होती असे राधाकृष्णन यांनी नमूद केले.
राज्यसभा अध्यक्षांनी दोन्ही देशांच्या संसद सदस्यांमधे नियमित होत असलेल्या संपर्क आणि संवादावर प्रकाश टाकताना, अलीकडच्या काही महत्त्वाच्या उच्चस्तरीय भेटींचा उल्लेख केला. यामध्ये मे 2025 मध्ये पहलगाम दहशतवादी हल्ला आणि भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'च्या पार्श्वभूमीवर कनिमोळी करुणानिधी यांनी पाच संसद सदस्यांसह केलेल्या रशिया दौऱ्याचा, तसेच डिसेंबर 2025 मध्ये राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्या भारत भेटीदरम्यान झालेल्या 23 व्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेतील त्यांच्या सहभागाचा समावेश होता.
द्विपक्षीय सहकार्याच्या मुख्य स्तंभांचा उल्लेख करत, अध्यक्षांनी नमूद केले की भारत आणि रशिया दरम्यान राजनैतिक संबंध प्रस्थापित झाल्याच्या 80व्या वर्धापनदिनाची तयारी सध्या सुरू आहे. दहशतवादाचा सामना करण्याच्या दोन्ही देशांच्या संयुक्त संकल्पाला रशियाने दिलेल्या निरंतर पाठिंब्याबद्दल त्यांनी रशियाचे आभार मानले. आर्थिक आघाड्यांवर भाष्य करताना, दोन्ही देशांच्या नेतृत्वाने दाखवलेल्या सहमतीनुसार, 2030 पर्यंत दोन्ही देश वार्षिक 100 अब्ज अमेरिकन डॉलर्सचे द्विपक्षीय व्यापारी उद्दिष्ट साध्य करतील, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. याव्यतिरिक्त, त्यांनी आंतर-प्रादेशिक सहकार्य, विज्ञान आणि तंत्रज्ञान, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि लोकांमधील परस्पर संबंधांना सहकार्याची इतर महत्त्वाची क्षेत्रे म्हणून अधोरेखित केले.
परस्पर प्राधान्यक्रम समजून घेण्यासाठी, अनुभवांची देवाणघेवाण करण्यासाठी आणि सहकार्यासाठी कृती करण्यायोग्य मार्ग शोधण्यात अशा प्रकारची चर्चा महत्त्वाची भूमिका बजावते, असे सी. पी. राधाकृष्णन यांनी भेटीचा समारोप करताना सांगितले. दोन्ही देशांच्या लोकांच्या परस्पर फायद्यासाठी संबंध आणखी मजबूत करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला.

_20261027174015_98a844.jpeg)
सुषमा काणे/सविता म्हसकर /प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai