Posted On:
27 OCT 2026 5:45PM by PIB Mumbai
पणजी, 27 ऑक्टोबर 2026
जागतिक ऊर्जा उद्योग, ऊर्जा सुरक्षा प्राधान्यक्रमांचे उदयोन्मुख कल आणि परवडणाऱ्या व शाश्वत ऊर्जा प्रणालींच्या गरजांचा विचार करत असताना, 'इंडिया एनर्जी वीक (IEW) 2027' मधील परिषद कार्यक्रमात धोरणात्मक संवाद, तांत्रिक ज्ञानाचे आदानप्रदान आणि संपूर्ण ऊर्जा मूल्य साखळीतील सहकार्यासाठी एक मंच उपलब्ध होईल.
पाचव्या इंडिया एनर्जी वीकचे 28-31 जानेवारी 2027 दरम्यान न्यू टाऊन कन्व्हेन्शन सेंटर, कोलकाता येथे आयोजन होणार आहे. हा परिषद कार्यक्रम ऊर्जेचे भविष्य घडवणाऱ्या आव्हानांचा आणि संधींचा विचार करण्यासाठी आंतरराष्ट्रीय ऊर्जा नेते, धोरणकर्ते, गुंतवणूकदार, अभियंते, संशोधक आणि तंत्रज्ञान नवोन्मेषकर्त्यांना एकत्र आणेल.
‘अनलॉकिंग इनोव्हेशन, सिक्युअरिंग एनर्जी, शेपिंग टुमॉरो’ या संकल्पनेवर म्हणजे नवोन्मेष उलगडून दाखवणे, ऊर्जा सुरक्षित करणे, भविष्य साकार करण्याच्या संकल्पनेवर आधारित 2027 ची आवृत्ती, ऊर्जा क्षेत्रापुढील अत्यंत निकडीच्या आव्हानांवर चर्चा घडवून जागतिक ऊर्जा परिसंस्थेतील या कार्यक्रमाचे प्रमुख स्थान अधिक भक्कम करेल.
या परिषद उपक्रमात 6,500 हून अधिक प्रतिनिधी सहभागी होण्याची अपेक्षा आहे. याचे दोन मुख्य घटक, धोरणात्मक परिषद आणि तांत्रिक परिषद, तांत्रिक संशोधन, नवोन्मेष आणि कार्यप्रणालीतील उपयोगांवर होणाऱ्या चर्चांसोबतच धोरणकर्त्यांना उद्योग प्रमुखांशी जोडतील. या कार्यक्रमात 120 हून अधिक देशांतील 75,000 पेक्षा जास्त ऊर्जा व्यावसायिक आणि 700 हून अधिक प्रदर्शक कंपन्या सहभागी होण्याची अपेक्षा आहे, जे बाजारपेठ आणि तंत्रज्ञानामध्ये सहकार्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करतील. इंडिया एनर्जी वीकच्या मागील आवृत्त्यांमध्ये प्रमुख ऊर्जा उत्पादक आणि वापरकर्त्या देशांतील वरिष्ठ सरकारी नेते व ऊर्जा अधिकारी एकत्र आले होते. यूएई, कॅनडा, नेदरलँड्स, ओमान, ब्रुनेई, म्यानमार आणि टांझानिया यांसारख्या देशांतील सतरा मंत्री आणि उपमंत्री, आंतरराष्ट्रीय ऊर्जा मंच (IEF), बिमस्टेक (BIMSTEC) आणि युरेशियन इकॉनॉमिक युनियन सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांसह IEW 2026 मध्ये सहभागी झाले होते. बेंगळुरू येथे2023 मध्ये सुरू झाल्यापासून इंडिया एनर्जी वीकचा वेगाने विस्तार झाला असून, त्याचा आकार, आंतरराष्ट्रीय सहभाग आणि हाताळल्या जाणाऱ्या मुद्यांची व्याप्ती वाढली आहे. 2026 मध्ये गोव्यात आयोजित करण्यात आलेल्या याच्या चौथ्या आवृत्तीत 120 हून अधिक देशांतील 6,500 परिषद प्रतिनिधी आणि इतर सहभागी एकत्र आले होते.
धोरणात्मक परिषद: जागतिक ऊर्जा प्रणालीसाठी मार्ग निश्चित करणे
IEW 2027 धोरणात्मक परिषद सुरक्षित, सर्वसमावेशक आणि परवडणाऱ्या जागतिक ऊर्जा प्रणालींच्या दिशेने नवीन मार्ग शोधण्यासाठी ऊर्जा मंत्री, धोरणकर्ते, उद्योग प्रमुख, सी-सूट (C-suite) अधिकारी आणि नवसंशोधकांना एकत्र आणेल.
जागतिक ऊर्जा क्षेत्राचे भवितव्य ठरवणाऱ्या प्राधान्यक्रमांवर चर्चा करण्यासाठी स्ट्रॅटेजिक कॉन्फरन्स अर्थात धोरणात्मक परिषद एक उच्चस्तरीय मंच म्हणून उपयुक्त ठरणार आहे. या परिषदेत 300 पेक्षा जास्त वक्ते मार्गदर्शन करणार असून 100 पेक्षा जास्त सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. वाढत्या ऊर्जेची गरज पूर्ण करतानाच शाश्वततेला गती देणे हे या परिषदांमधील चर्चेचे मुख्य सूत्र असणार आहे. यादृष्टीने या परिषदेतील चर्चांमध्ये सहकार्य, गुंतवणूक, नवोन्मेष आणि प्रत्यक्ष काम करताना येणारी आव्हाने या विषयांवर संपूर्ण ऊर्जा मूल्य साखळीतील तज्ज्ञ आपले दृष्टिकोन मांडणार आहेत.
भविष्यातील अल्प कार्बन (Low-Carbon) अर्थव्यवस्था विकसित करण्यातील भारताची भूमिका या परिषदेतून जगासमोर मांडली जाणार आहे. यासोबतच विविध भागीदारांमधील सहकार्याच्या नव्या संधीही यामुळे समोर येतील. यादृष्टीने या परिषदेतील विविध सत्रांमध्ये धोरणकर्ते आणि उद्योग क्षेत्रातील प्रमुख निर्णयकर्ते एकाच मंचावर येणार आहेत. यामुळे ऊर्जा उत्पादक आणि ग्राहक देशांच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या भागीदारी, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि धोरणात्मक पर्यायांवर सखोल चर्चा घडून येण्यास मदत होणार आहे.
तांत्रिक परिषद (Technical Conference): संशोधन आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीला गती
ज्ञान, सखोल माहिती आणि नवोन्मेषाचे आदानप्रदान, हा पाचव्या इंडिया एनर्जी वीक तांत्रिक परिषदेच्या आयोजनामागचा उद्देश आहे. या परिषदेत जगभरातील ऊर्जा क्षेत्रातील अभियंते, संशोधक तसेच तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची व्यक्तिमत्वे एकत्र येणार आहेत.
100 पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या तांत्रिक समितीने या कार्यक्रमाची आखणी केली आहे. या परिषदेत तंत्रज्ञान विषयक 50 पेक्षा जास्त सत्रे आणि कार्यशाळा होणार आहेत. या उपक्रमांअंतर्गत 250 पेक्षा जास्त तज्ज्ञ वक्ते आणि चर्चासत्रांमधील निमंत्रित मार्गदर्शन करतील. या उपक्रमांच्या माध्यमातून उर्जा क्षेत्रातील विद्यमान कार्यान्वयिन व्यवस्थेपासून ते उदयोन्मुख तंत्रज्ञानापर्यंत विस्तारलेल्या तंत्रज्ञानविषयक 20 मुख्य श्रेणींअंतर्गत होत असलेले अत्याधुनिक संशोधन, क्रांतिकारी तंत्रज्ञान आणि प्रत्यक्ष जगात त्याचा होत असलेला वापर याची मांडणी केली जाणार आहे.
या श्रेणींमध्ये उद्योग क्षेत्राच्या व्यापक प्राधान्यक्रमांचा समावेश केलेला आहे. यात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटायझेशन, जैवइंधने आणि पर्यायी इंधने, कार्बन संकलन, वापर आणि साठवणूक (CCUS - Carbon Capture, Utilisation and Storage), स्वयंपाकाचे स्वच्छ इंधन, हवामान तंत्रज्ञान आणि नवीकरणीय ऊर्जा, ऊर्जा संक्रमण आणि कार्बन उत्सर्जनातील घट, भविष्यातील वाहतूक व्यवस्था, हायड्रोजन उत्पादन, विकास आणि अंतिम वापर, हायड्रोकार्बन शोध, उत्पादन आणि विकास, नैसर्गिक वायू आणि एलएनजी अर्थात द्रवरुप नैसर्गिक वायू इंधन (LNG) प्रक्रिया, कार्यान्वयन आणि तंत्रज्ञान, तेलशुद्धीकरण आणि पेट्रोकेमिकल्स तंत्रज्ञान, रसद पुरवठा व्यवस्थापन, साठवणूक आणि पायाभूत सुविधा, आरोग्य, सुरक्षा, सुरक्षितता आणि पर्यावरण, तसेच संबंधित सोयी सुविधा आणि वीज निर्मिती या बाबींचा अंतर्भाव आहे.
ऊर्जा उद्योगासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या तंत्रज्ञानविषयक इतर तांत्रिक क्षेत्रांसोबतच संघटनात्मक सज्जता आणि कार्यान्वयनात्मक उत्कृष्टता या मुद्यांवरही या कार्यक्रमात भर दिला जाणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने या विविध क्षेत्रांमध्ये काम करणारे तज्ज्ञ एकत्र येणार असल्याने, ही परिषद संशोधनाचे निष्कर्ष, औद्योगिक अनुभव आणि सर्वोत्तम पद्धतींचे सुलभतेने आदानप्रदान घडवून आणणारी ठरणार आहे.
इंडिया एनर्जी वीक ही परिषद भारताच्या वतीने आयोजित केली जाणारी जागतिक दर्जाची एक प्रमुख उर्जाविषयक परिषद आहे. या परिषदेच्या निमित्ताने सुरक्षित, शाश्वत आणि परवडणाऱ्या दरातील ऊर्जेच्या भविष्याच्या दिशेने होत असलेल्या वाटचालीच्या प्रगतीचा वेग वाढवण्यासाठी सरकारमधील नेतृत्व करणारी व्यक्तिमत्वे, उद्योग क्षेत्रातील प्रथितयश व्यक्तिमत्वे आणि नवोन्मेषक एकाच व्यासपीठावर येणार आहेत. एक तटस्थ मंच या नात्याने, इंडिया एनर्जी वीक या परिषदेच्या माध्यमातून जागतिक ऊर्जा क्षेत्राच्या जडणघडणीला चालना देण्याच्या उद्देशाने गुंतवणूक, धोरणात्मक सुसंगतता आणि तंत्रज्ञानविषयक सहकार्याला प्रोत्साहन देण्याचे काम केले जात आहे.
इंडिया एनर्जी वीक 2027 चे आयोजन फेडरेशन ऑफ इंडियन पेट्रोलियम इंडस्ट्री अर्थात भारतीय पेट्रोलियम उद्योग महासंघाच्या वतीने केले जात आहे. या परिषदेला केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे प्रमुख पाठबळ लाभले आहे. इन्फॉर्मा मार्केट्स ही कंपनी या परिषदेच्या संयोजकाची जबाबदारी सांभाळत आहे.
कोलकातामधील न्यू टाऊन कन्व्हेन्शन सेंटर इथे 28 ते 31 जानेवारी 2027 या कालावधीदरम्यान ही परिषद आयोजित केली जाईल. नवोन्मेषाचा मार्ग प्रशस्त करणे, उर्जा सुरक्षा आणि उद्याची जडणघडण ही या परिषदेची संकल्पना आहे.
अधिक माहितीसाठी भेट द्या: https://www.indiaenergyweek.com/
पीआयबी मुंबई | सोनाली काकडे/शैलेश पाटील/तुषार पवार/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai