Posted On:
26 OCT 2026 9:48PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर 2026
युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या 'मेरा युवा भारत' (माय भारत ) ने, “विकसित भारतासाठी नशा मुक्त युवा” अभियानाच्या 100 आठवड्यांच्या मोहिमेच्या सहाव्या आठवड्यात विविध उपक्रमांचे आयोजन केले. प्राथमिक अहवालानुसार 694 कार्यक्रमांच्या माध्यमातून देशातील 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 2,11,139 युवक आणि नागरिकांना अभियानात सहभागी करून घेण्यात आले. व्यसनमुक्त जीवनशैलीबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी 'नशे के रावण का दहन/नशा रुपी महिषासुराचा वध', पारंपरिक खेळ आणि 'विकसित भारत’ या विषयावर चर्चा अर्थात शेजार युवा संसद असे उपक्रम आयोजित करण्यात आले. या उपक्रमांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, प्रत्यक्ष सहभाग आणि सामुदायिक संवाद यांचा मेळ साधण्यात आला होता.
व्यसनावर मात करण्याचा आणि व्यसनाधीनतेचा त्याग करण्याचा संदेश देण्यासाठी या मोहिमेत प्रतिकात्मक रावण दहन आणि महिषासुर वध यांसारख्या सांस्कृतिक दृष्ट्या रुजलेल्या उपक्रमांचा वापर करण्यात आला. पारंपरिक खेळांच्या उपक्रमांनी शारीरिक तंदुरुस्ती, निरोगी जीवनशैली आणि सामुदायिक सहभागाला प्रोत्साहन दिले, तर 'शेजार युवा संसद' सत्रांनी तरुण आणि समाजातील सदस्यांना व्यसनाधीनतेचे हानिकारक परिणाम, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि व्यसनमुक्त समाज घडवण्यात तरुणांची भूमिका यावर चर्चा करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले.

हे कार्यक्रम 'फिट इंडिया' आणि 'ब्रह्मा कुमारीज', 'हार्टफुलनेस', 'फिक्की', 'सीआयपीयू', 'असोचॅम' आणि 'प्रोजेक्ट पॉइंट' यांसारख्या भागीदार संस्थांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले होते. या सहयोगी दृष्टिकोनामुळे मोहिमेची व्याप्ती वाढवण्यासाठी आणि व्यसनाधीनतेविरुद्ध सामूहिक कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी युवा नेटवर्क, सामुदायिक संस्था आणि भागीदार संस्था एकत्र आल्या.

या मोहिमेअंतर्गत व्यसनमुक्त भारताच्या उद्दिष्टासाठी 2,11,139 जणांनी शपथ घेतली. तरुणांना निरोगी, व्यसनमुक्त जीवनशैली स्वीकारण्यास प्रोत्साहित करून आणि इतरांना व्यसन कारक पदार्थांपासून दूर राहण्यासाठी प्रेरित करून, जागृतीचे रूपांतर वैयक्तिक वचनबद्धता आणि सामुदायिक कृतीमध्ये करण्याचा या उपक्रमांचा उद्देश होता.
'100 आठवड्यांच्या या मोहिमेच्या माध्यमातून, 'मेरा युवा भारत' जनजागृती कार्यक्रम, सहभागात्मक उपक्रम आणि युवकांच्या नेतृत्वाखालील उपक्रमांद्वारे तरुण आणि समुदायांना सातत्याने सहभागी करून घेत आहे. मोहीमेच्या सहाव्या आठवड्यात सांस्कृतिक परंपरा, खेळ आणि नियोजनबद्ध संवादावर लक्ष केंद्रित केल्याने, व्यसनाधीनता रोखण्यासाठी आणि तरुणांमध्ये माहितीपूर्ण निवडीला प्रोत्साहन देण्यासाठी सातत्यपूर्ण सामुदायिक सहभागाचे महत्त्व अधोरेखित होते.
हा उपक्रम 'विकसित भारतासाठी नशामुक्त युवा'च्या व्यापक दृष्टिकोनाला पाठिंबा देतो. तरुण नागरिकांना निरोगी समुदाय आणि विकसित भारताच्या निर्मितीमध्ये योगदान देण्यासाठी प्रोत्साहित करणे, हा या मोहिमेचा उद्देश आहे.
निलीमा चितळे/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai