संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

संरक्षण दलांसाठी 2.12 लाख कोटी रुपयांच्या भांडवली अधिग्रहण प्रस्तावांना संरक्षण अधिग्रहण परिषदेकडून मंजुरी

Posted On: 26 OCT 2026 6:21PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर 2026

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील संरक्षण अधिग्रहण परिषदेने (डीएसी) 26 ऑक्टोबर 2026 रोजी संरक्षण दलांच्या सुमारे 2,12,000 कोटी रुपये अंदाजित खर्चाच्या विविध भांडवली अधिग्रहण प्रस्तावांना 'आवश्यकतेची स्वीकृती' म्हणजेच तत्त्वतः प्रशासकीय मंजुरी दिली. भारतीय लष्करासाठी उच्च गतिशीलता वाहने (एचएमव्ही), गोळीबार प्रतिसाद प्रणाली (जीएसआरएस), हलकी बहुउद्देशीय हेलिकॉप्टर्स (एलएमआरएच), अति अल्पपल्याची हवाई संरक्षण प्रणाली (व्हीएसएचओआरएडीएस), प्लॅटफॉर्म आधारित मानवरहित हवाई प्रणाली विरोधी यंत्रणा (सी- यूएएस), लांब पल्ल्याची मानवरहित हवाई प्रणाली, टेहळणी ड्रोन, एकात्मिक टेहळणी आणि प्रहार प्रणाली तसेच लांब पल्ल्याची कामीकाझे ड्रोन प्रणाली यांच्या खरेदीला मंजुरी देण्यात आली.

उच्च गतिशीलता वाहनांमुळे आव्हानात्मक भूप्रदेशात लष्कराची कार्यक्षमता, रसद पुरवठा आणि गतिशीलता वाढेल. स्वयंचलित तोफ प्रणालीमुळे यांत्रिकी दलांना तोडीस तोड गतिशीलता आणि अग्निशक्ती मिळेल. गोळीबार प्रतिसाद प्रणालीमुळे सैन्याला परिस्थितीची रिअल-टाइम माहिती मिळून त्यांची कार्यक्षमता वाढेल. हलकी बहुउद्देशीय हेलिकॉप्टर्सचा वापर भारतीय लष्कर आणि भारतीय हवाई दल या दोन्हींकडून टेहळणी, निगराणी, लढाऊ मोहिमा, सैनिकांचा शोध आणि बचावकार्य, मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण इत्यादींसाठी केला जाईल. अति अल्पपल्याची हवाई संरक्षण प्रणाली (व्हीशोरॅड्स) नवीन पिढीच्या लहान आकाराच्या हवाई धोक्यांना तोंड देईल, तर प्लॅटफॉर्म आधारित मानव रहित हवाई प्रणाली विरोधी यंत्रणेमुळे (सी-यूएएस) आधुनिक युद्धभूमीवर रणगाड्यांचे टिकून राहण्याचे प्रमाण वाढवेल. निगराणी आणि ड्रोन प्रणाली भारतीय लष्कराची निगराणी आणि लक्ष्य निर्धारित करण्याची क्षमता वाढवतील.

भारतीय नौदलासाठी सक्रिय ऑफबोर्ड डेकॉय प्रणाली (एओडीएस) आणि इतर प्रमुख नौदल प्लॅटफॉर्मच्या खरेदीला मंजुरी देण्यात आली. एओडीएसमुळे क्षेपणास्त्रविरोधी संरक्षणाची विश्वासार्हता वाढवेल, विशेषतः शत्रूंच्या आधुनिक जहाजविरोधी क्षेपणास्त्रांपासून संरक्षण करण्यास मदत होईल. स्वदेशात आरेखित आणि निर्मित हे प्रमुख नौदल प्लॅटफॉर्म आधुनिक युद्ध क्षमतांनी युक्त असतील आणि नौदलाची लढाऊ क्षमता वाढवतील.

भारतीय हवाई दलाची हवाई संरक्षण आणि युद्धक्षमता वाढवण्यासाठी हेलिकॉप्टर, हवाई संरक्षण प्रणाली, शस्त्रे आणि मोबाईल एक्स-बँड डॉप्लर हवामान रडार प्रणालीच्या खरेदीस मंजुरी देण्यात आली. विशेष उपयुक्तता हेलिकॉप्टरच्या खरेदीमुळे भारतीय हवाई दलाला महत्त्वाच्या हवाई वाहतुकीच्या गरजा पूर्ण करण्यास मदत होईल. एक्स-बँड डॉप्लर हवामान रडार प्रणाली आघाडीच्या भागातील हवामानावर उच्च अचूकतेने निगराणी ठेवण्यास मदत करेल.

संरक्षण खरेदी परिषदेने दिलेल्या एकूण तत्वतः मंजुरीपैकी सुमारे 82% खरेदी भारतीय उद्योगाकडून केली जाणार आहे.

 
निलीमा चितळे/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2328639) अभ्यागत कक्ष : 10