Posted On:
22 OCT 2026 6:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 ऑक्टोबर 2026
केंद्रीय कौशल्य विकास राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि उद्योजकता तसेच शिक्षण विभाग राज्यमंत्री जयंत चौधरी यांनी आज मुंबई इथल्या राष्ट्रीय शेअर बाजाराच्या (एनएसई) सोशल सोशल स्टॉक एक्स्चेंजमध्ये राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाच्या (एनएसडीसी) पदार्पणाची सुरुवात करून दिली आणि बेल-रिंगिंग सोहळ्यात भाग घेतला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सरकारी निधी, खासगी क्षेत्रातील कॉर्पोरेट सामाजिक दायित्व निधी (सीएसआर), किरकोळ गुंतवणूकदार भांडवल आणि विशेष प्रशिक्षण क्षमता यांना शाश्वत उपजीविकेच्या सामायिक उद्दिष्टासाठी एकत्र आलो आहोत, असे ते म्हणाले.
एनएसडीसीच्या पहिल्यावहिल्या झिरो कूपन झिरो प्रिन्सिपल (झेडसीझेडपी) जारी करण्यासाठी राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेने (नाबार्ड) या नाविन्यपूर्ण कौशल्य आणि जागतिक रोजगार उपक्रमासाठी चार कोटी रुपये वितरीत केले. हा कार्यक्रम मध्यप्रदेशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल इतर मागासवर्गीय श्रेणीच्या ओबीसी कुटुंबांतील 600 ग्रामीण युवकांना पाठबळ पुरवून त्यांना आंतरराष्ट्रीय रोजगार संधींसाठी सज्ज करेल.
या कार्यक्रमाने गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण, शाश्वत रोजगार तसेच जागतिक कार्यबळ संधी उपलब्ध करून देण्यात सामाजिक वित्तपुरवठा आणि सहयोगी संस्थात्मक चौकटींची वाढती भूमिका अधोरेखित केली.
याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय कौशल्य विकास राज्यमंत्री आणि उद्योजकता तसेच शिक्षण विभाग राज्यमंत्री जयंत चौधरी म्हणाले, “भारताचा विकास देशातील लोकांमध्ये केलेल्या गुंतवणुकीशी जुळणारा असला पाहिजे.सरकार सक्षम आराखडा निर्माण करू शकेल पण मोठ्या प्रमाणातील वित्तपुरवठा विकासासाठी सार्वजनिक संस्था, खासगी निधी पुरवठादार आणि देणगीदार यांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे.”
सोशल स्टॉक एक्सचेंज या सामूहिक वचनबद्धतेला विश्वासार्ह प्रकल्प, पारदर्शकता आणि पडताळणीयोग्य परिणामांशी जोडते. कौशल्य विकासातील गुंतवणुकीचे रूपांतर जागतिक रोजगाराच्या संधींमध्ये आणि शाश्वत उपजीविकेमध्ये करणारी भागीदारी उभारल्याबद्दल मी एनएसडीसी, नाबार्ड, एनएसई, मध्यप्रदेश सरकार आणि सर्व योगदानकर्त्यांचे अभिनंदन करते.
मध्यप्रदेश सरकारच्या मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक कल्याण विभागाच्या राज्यमंत्री कृष्णा गौर म्हणाल्या की, मध्य प्रदेश सरकार मागासवर्गीय तरुणांसाठी, विशेषतः ज्यांना दर्जेदार प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी मिळवण्यात आर्थिक व सामाजिक अडथळ्यांचा सामना करावा लागतो, त्यांच्यासाठी संधी विस्तारण्यास कटिबद्ध आहे. एनएसडीसीसोबतची ही भागीदारी आमच्या राज्यातील 600 तरुणांना आंतरराष्ट्रीय स्तरावर उपयुक्त कौशल्ये आत्मसात करण्याची आणि जपान व जर्मनीमध्ये रोजगारासाठी सज्ज होण्याची संधी देते. सरकारी निधीला यशस्वी रोजगाराच्या परिणामांशी जोडणाऱ्या या मॉडेलला पाठिंबा देताना आम्हाला आनंद होत आहे. आम्हाला विश्वास आहे की, हा उपक्रम सहभागी कुटुंबांसाठी आर्थिक स्वावलंबन आणि उपजीविकेत सुधारणा घडवून आणणारा एक मौल्यवान मार्ग ठरू शकेल.
गुंतवणुकीला रोजगाराच्या परिणामांशी जोडणारे नाविन्यपूर्ण वित्तपुरवठा मॉडेल
सुमारे 11.25 कोटी रुपयांच्या या कार्यक्रमात विविध वित्तपुरवठा संरचनेचा अवलंब करण्यात आला आहे, ज्यामध्ये निधीचे तीन पूरक स्रोत एकत्र येतात. कार्यक्रमाच्या एकूण खर्चापैकी 15 टक्के वाटा लाभार्थ्यांचा असेल, 35 टक्के निधी सोशल स्टॉक एक्सचेंजद्वारे उभारला जाईल आणि उर्वरित 50 टक्के निधी उमेदवारांना आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वीपणे रोजगार मिळाल्यानंतर मध्यप्रदेश सरकारद्वारे दिला जाईल.
परिणामांवर आधारित हा घटक एनएसडीसी आणि मध्यप्रदेश सरकार यांच्यातील द्विपक्षीय सोशल इम्पॅक्ट बाँड आराखड्यांतर्गत तयार करण्यात आला आहे, जो सार्वजनिक खर्चाला मोजता येणाऱ्या रोजगाराच्या परिणामांशी जोडतो. राज्य सरकार उमेदवारांच्या निवडीसाठी, निवासी प्रशिक्षण पायाभूत सुविधांसाठी आणि भाषा प्रयोगशाळांसाठीही सहकार्य करेल.
झिरो कूपन, झिरो प्रिन्सिपल आराखडा पात्र सामाजिक संस्थांना पारंपरिक व्याज किंवा मुद्दल परतफेडीच्या अटींशिवाय संसाधने उभारण्यास सक्षम करतो. यामध्ये निधीचा पारदर्शक वापर आणि सामाजिक परिणामांच्या अहवाल सादरीकरणावर विशेष भर दिला जातो.
संस्थात्मक भागीदारी अधिक बळकट करणे
नाबार्डचा सहभाग हा ग्रामीण विकास वित्तपुरवठा आणि आंतरराष्ट्रीय कार्यशक्तीच्या गतिशीलतेतून निर्माण होणाऱ्या संधी यांच्यातील एक महत्त्वाचा संगम दर्शवतो. हा उपक्रम ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना अधिक उत्पन्न मिळवण्याचे मार्ग उपलब्ध करून देऊन, त्यांची बचत वाढवण्यास आणि उपजीविकेत शाश्वत सुधारणा घडवून आणण्यास मदत करेल.
सामाजिक शेअर बाजारातील (Social Stock Exchange) भागभांडवल विक्रीत नाबार्ड अर्थात राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेच्या सहभागातून, वित्तीय विकासाच्या नवोन्मेषी प्रारूपांचा शोध घेण्याची नाबार्डच्या वचनबद्धतेची प्रचिती येते, असे नाबार्डचे अध्यक्ष डॉ. शाजी कृष्णन व्ही. यांनी सांगितले. या उपक्रमामुळे संस्थात्मक आणि खाजगी क्षेत्रातील सहभागाला अधिक प्रोत्साहन मिळेल, तसेच मूल्यमापन करता येणारा सामाजिक प्रभाव साध्य करण्यासाठी वित्तपुरवठा विषयक नवोन्मेषी प्रारुपांची क्षमताही सिद्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सामाजिक शेअर बाजारात राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाचे (NSDC) पदार्पण हे कौशल्य विकास आणि रोजगाराशी संबंधित उपक्रमांसाठी वित्तपुरवठ्यात विविधता आणण्यासाठी महामंडळ करत असलेल्या प्रयत्नांमधील एक महत्त्वाचे पाऊल आहे असे महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुणकुमार पिल्लई यांनी नमूद केले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महामंडळ शाश्वत उपजीविकेच्या सामायिक उद्दिष्टांना अनुसरून सरकारी पाठबळ, संस्थात्मक भांडवल आणि विशेष प्रशिक्षण क्षमतांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहे असे ते म्हणाले. यासाठी महामंडळावर विश्वास दाखवल्याबद्दल तसेच सहकार्याबद्दल त्यांनी राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक, राष्ट्रीय शेअर बाजार (NSE), मध्य प्रदेश राज्य सरकार आणि संबंधित भागीदारांचे आभारही मानले. आता यापुढे प्रभावी अंमलबजावणी, पडताळणीयोग्य फलनिष्पत्ती आणि सामाजिक वित्तपुरवठ्यात अधिक सहभागाला चालना देऊ शकणाऱ्या उपक्रमांची साखळी तयार करण्यावर महामंडळाचा भर असेल, असेही त्यांनी नमूद केले.
या उपक्रमांतर्गत निवासी परदेशी भाषा आणि रोजगारक्षमता प्रशिक्षणाच्या माध्यमातून 300 उमेदवारांना जपानमधील आणि इतर 300 उमेदवारांना जर्मनीतील रोजगाराच्या संधींसाठी तयार केले जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. या अभियानाअंतर्गत सेवा शुश्रूषा, आदरातिथ्य, बांधकाम आणि उत्पादन या क्षेत्रांमधील विशिष्ट ठिकाणांसाठीची सज्जता आणि रोजगाराच्या संधींवर भर दिला जाणार आहे. हे प्रशिक्षण पूर्णतः राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाच्या मालकीची उपकंपनी असलेल्या एनएसडीसी इंटरनॅशनल लिमिटेड'द्वारे दिले जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली.
कौशल्य विकासातील सरकारी गुंतवणुकीला पूरक ठरणारे नवोन्मेषी आणि फलनिष्पत्ती केंद्रित वित्तपुरवठा प्रारिपे विकसित करण्याच्या व्यापक प्रयत्नांचा एक भाग म्हणून, राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ सामाजिक शेअर बाजारात सहभागी झाले आहे. सामाजिक गुंतवणूक आणि रोजगाराशी संलग्न सार्वजनिक निधीची सांगड घालून, रोजगारक्षमता बळकट करणे, जागतिक पातळीवर मनुष्यबळाची ये जा वाढवणे आणि उपजीविकेच्या पर्यायांची परिणामकारकता सुधारण्यासाठी जसाच्या तसा अमलात आणता येईल असा आराखडा प्रस्थापित करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाविषयी (NSDC):
राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ हे केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या अखत्यारीत कार्यरत आहे. औद्योगिक भागीदारी, नवोन्मेषी वित्तपुरवठा यंत्रणा आणि कौशल्य विकास उपक्रमांच्या माध्यमातून, देशभरातील युवा वर्गासाठी रोजगारक्षमता वाढवणे, व्यावसायिक प्रशिक्षणाला बळकटी देणे आणि शाश्वत उपजीविकेच्या संधी निर्माण करणे हा राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाचा मुख्य उद्देश आहे.





* * *
राधिका अघोर/सुषमा काणे/संजना चिटणीस/राजेश शिरभाते/तुषार पवार/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai