खाण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

इंडियन ब्युरो ऑफ माइन्सने स्वच्छता आणि सामुदायिक सहभागावर लक्ष केंद्रित करून 'स्वच्छता ही सेवा 2026' अभियानाचा केला समारोप

Posted On: 19 OCT 2026 5:50PM by PIB Mumbai

नागपूर, 19 ऑक्‍टोबर 2026

 

नागपूर इथल्या इंडियन ब्युरो ऑफ माइन्सने (आयबीएम) “स्वच्छतेमध्ये सहभाग, स्वच्छ भारत, विकसित भारत” या संकल्पनेअंतर्गत स्वच्छता, पर्यावरण संरक्षण आणि सार्वजनिक सहभागाप्रती आपली वचनबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित करत महिनाभर चाललेल्या ‘स्वच्छता ही सेवा (एसएचएस) 2026’ अभियानाचा 17 ऑक्टोबर रोजी समारोप केला.

आयबीएमचे नियंत्रक महासंचालक पंकज कुलश्रेष्ठ यांच्या हस्ते 17 सप्टेंबर रोजी सुरू झालेल्या या मोहिमेचा प्रारंभ कुलश्रेष्ठ आणि खाणींचे मुख्य नियंत्रक डॉ. योगेश जी. काळे यांच्या हस्ते अनुक्रमे हिंदी आणि इंग्रजीमध्ये स्वच्छतेची शपथ देऊन झाला.

या मोहिमेदरम्यान नागपूर येथील आयबीएम मुख्यालयाने त्यांच्या अखत्यारीतील चार विभागीय कार्यालये, 14 प्रादेशिक कार्यालये, खनिज प्रक्रिया प्रयोगशाळा आणि खाणी यांच्यासह स्वच्छता, आरोग्य, कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरण जागृतीला प्रोत्साहन देणाऱ्या विविध उपक्रमांचे आयोजन केले.

प्रमुख उपक्रमांमध्ये सार्वजनिक ठिकाणी, निवासी भागांमध्ये आणि खाणींजवळील गावांमध्ये स्वच्छता मोहीम; स्वच्छतेसाठी निश्चित केलेल्या लक्ष्य गटांचे आणि कचऱ्याची समस्या होण्याची शक्यता असलेल्या ठिकाणांचे परिवर्तन; स्वच्छ पाठशाळा कार्यक्रम; वॉकेथॉन आणि सायक्लोथॉन; ई-कचरा संकलन मोहीम आणि कचऱ्यापासून कलाकृती बनवण्याचे सर्जनशील उपक्रम यांचा समावेश होता. सामुदायिक संपर्क कार्यक्रम, स्वच्छता संवाद सत्रे आणि शालेय स्तरावरील निबंध, चित्रकला व घोषवाक्य-लेखन अशा स्पर्धांनी सार्वजनिक सहभाग आणि पर्यावरण जागृतीला प्रोत्साहन दिले.

स्वच्छता आणि आरोग्य राखण्यातील सफाई मित्रांच्या योगदानाला मान्यता देत आयबीएमने त्यांच्यासाठी आरोग्य तपासणी शिबिरेही आयोजित केली. “एक दिन, एक घंटा, एक साथ” या उपक्रमांतर्गत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी श्रमदानात भाग घेतला तर “एक पेड माँ के नाम” अंतर्गत वृक्षारोपण मोहिमेद्वारे पर्यावरण संवर्धनाला प्रोत्साहन देण्यात आले. स्वच्छतेचा संदेश अधिक दृढ करण्यासाठी आयबीएमच्या मुख्यालयात एक ‘स्वच्छता दीवार’ देखील उभारण्यात आली.

17 ऑक्टोबर रोजी झालेल्या समारोप कार्यक्रमात सफाई मित्रांच्या समर्पित सेवेबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला आणि सर्जनशील चित्रांच्या माध्यमातून व मोहीम उपक्रमांमधील सहभागातून स्वच्छतेला प्रोत्साहन देणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

एसएचएस 2026 च्या माध्यमातून इंडियन ब्युरो ऑफ माइन्सने स्वच्छता, जबाबदार कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरणीय शाश्वतता यांना दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आहे.

 

* * *

पीआयबी मुंबई | निलिमा चितळे/नंदिनी मथुरे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2325202) अभ्यागत कक्ष : 29
Read this releasein: English