संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नागपूर येथील डीजीआर रोजगार मेळाव्यात माजी सैनिकांसाठी 1,300 हून अधिक रोजगाराच्या संधी

Posted On: 16 OCT 2026 8:36PM by PIB Mumbai

नागपूर, 16 ऑक्‍टोबर 2026

 

संरक्षण मंत्रालयाच्या माजी सैनिक कल्याण विभागाच्या (डीईएसडब्ल्यू) अंतर्गत पुनर्वसन महासंचालनालयाने (डीजीआर) 16 ऑक्टोबर 2026 रोजी नागपूर येथे माजी सैनिक (ईएसएम) रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते. या उपक्रमाद्वारे, माजी सैनिकांना अर्थपूर्ण दुसरी कारकीर्द घडवायला सहाय्य करण्याची, तसेच उद्योग क्षेत्र आणि माजी सैनिक यांच्यातील रोजगार परिसंस्था अधिक बळकट करण्याची वचनबद्धता अधोरेखित करण्यात आली.

या रोजगार मेळाव्यात 480 हून अधिक माजी सैनिक आणि 42 आघाडीच्या राष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. याद्वारे विविध क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या 1,300 हून अधिक  संधी उपलब्ध करून देण्यात आल्या. या कार्यक्रमामुळे सशस्त्र दलांतील प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची कौशल्ये, अनुभव आणि नेतृत्वक्षमता यांना उद्योगांच्या बदलत्या गरजांशी जोडण्यावर लक्ष केंद्रित करणारे व्यासपीठ उपलब्ध झाले.

   

या कार्यक्रमाचे उद्घाटन 'उमंग सब एरिया'चे जनरल ऑफिसर कमांडिंग, मेजर जनरल वरुण मल्होत्रा यांनी केले. ते प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

वरिष्ठ लष्करी अधिकारी आणि कॉर्पोरेट प्रतिनिधींनी सहभागी माजी सैनिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी रोजगाराच्या संधी, उद्योगांच्या अपेक्षा आणि नागरी कार्यक्षेत्रात आवश्यक असलेल्या क्षमता यावर चर्चा केली. माजी सैनिक त्यांचे नेतृत्व गुण, शिस्त, सचोटी, तांत्रिक कौशल्य, समस्या सोडवण्याची क्षमता आणि कठीण परिस्थितीत मनुष्यबळ आणि संसाधनांचे व्यवस्थापन करण्याचा अनुभव, याद्वारे संस्थांसाठी अत्यंत मोलाचे योगदान देत असल्याचे या संवादामधून अधोरेखित झाले.

प्रमुख नियोक्त्यांमध्ये सोलर ग्रुप, डेल्हीवरी, इरोस ग्रुप, हल्दीराम, जेएसआर डायनॅमिक्स आणि एसबीआय लाईफ यासारख्या इतर नामांकित संस्थांचा समावेश होता. त्यांचा सहभाग विविध क्षेत्रांमध्ये माजी सैनिकांना सामावून घेण्याच्या वाढत्या संधी, तसेच पुनर्वसनाच्या संधी विस्तारण्यात उद्योगांचा निरंतर सहभाग प्रतिबिंबित करतो.

या रोजगार मेळाव्याने केवळ रोजगारासाठी सहाय्य करण्यापलीकडे जाऊन, लष्करी अनुभव आणि कॉर्पोरेट क्षेत्राच्या गरजा यांच्यातील संबंध अधिक दृढ करायला सहाय्य केले. यामुळे नियोक्त्यांना शिस्तबद्ध, कुशल आणि अनुभवी मनुष्यबळाशी थेट संवाद साधता आला, तर दुसरीकडे माजी सैनिकांना नवीन व्यावसायिक मार्ग शोधण्याची आणि नागरी क्षेत्रात आपली क्षमता वापरण्याची संधी मिळाली.

  

डीजीआर, रोजगार सहाय्य, कौशल्य विकास, उद्योजकतेला प्रोत्साहन आणि उद्योगांबरोबर भागीदारी, याद्वारे सशस्त्र दलातील सेवानिवृत्त होणाऱ्या आणि सेवानिवृत्त जवानांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया पुढे नेत आहे. लष्करी जीवनातून नागरी जीवनाकडे स्थित्यंतर करताना सन्मानजनक रोजगार, शाश्वत उपजीविका आणि राष्ट्र उभारणीत निरंतर योगदानाच्या संधी सुनिश्चित करणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.

विविध क्षेत्रांतील कॉर्पोरेट संस्था, उद्योग संघटना आणि नियोक्त्यांनी माजी सैनिकांबरोबरचे आपले संबंध अधिक दृढ करावेत, आणि या सिद्ध झालेल्या, प्रतिभावान मनुष्यबळाची अफाट क्षमता ओळखावी, असे डीजीआर चे आवाहन आहे.

सरकार, उद्योगक्षेत्र आणि सशस्त्र सेना यांच्यातील अधिक मजबूत भागीदारीमुळे लष्करी अनुभवाचे कार्यक्षम नागरी रोजगारात रूपांतर होईल. माजी सैनिक, त्यांचे कुटुंबीय, नियोक्ते आणि राष्ट्र, या सर्वांनाच याचा लाभ मिळेल.

 

* * *

पीआयबी मुंबई | निलिमा चितळे/राजश्री आगाशे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2324563) अभ्यागत कक्ष : 14
Read this releasein: English