Posted On:
16 OCT 2026 5:20PM by PIB Mumbai
मुंबई, 16 ऑक्टोबर 2026
राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी, प्रादेशिक केंद्र, मुंबईने (एनएडीटी -आरसी, मुंबई) 'रिफ्लेक्शन्स - अ जर्नी थ्रू सर्व्हिस, लीडरशिप अँड लर्निंग' या अनुभवांची देवाणघेवाण करणाऱ्या मालिकेचे उद्घाटन केले. ही मालिका विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अनुभवाचा आणि दृष्टिकोनाचा लाभ कनिष्ठ व मध्यम स्तरावरील अधिकाऱ्यांना मिळवून देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे.
एनएडीटी -आरसी, मुंबईचे प्रधान अप्पर महासंचालक नवनीत मनोहर यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी मनोहर यांनी या मालिकेची संकल्पना, ध्येय आणि उद्दिष्टे स्पष्ट केली. या सत्रात पाहुण्या वक्त्यांचे मनोगत, त्यानंतर विषयावर आधारित संवाद आणि एक परस्परसंवादी सत्र पार पडले. या कार्यक्रमाला अतिरिक्त आयकर आयुक्तांच्या स्तरापर्यंतचे अधिकारी उपस्थित होते.
केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाचे सदस्य (आयटी) संजय बहादूर प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमात सहभागी झाले आणि कर प्रशासन, तपास, स्पर्धा नियमन आणि धोरणनिर्मितीमधील 3 दशकांहून अधिक काळाच्या आपल्या कारकिर्दीतील अनुभवांची देवाण-घेवाण केली. त्यांनी अधिकाऱ्यांना तंत्रज्ञानाचा अंगीकार करून आपली कौशल्ये सतत अद्ययावत करण्याचे आणि हस्तक्षेप-विरहीत कर प्रशासनाकडे वाटचाल करण्याचे आवाहन केले.
संजय बहादूर यांनी एनएडीटी -आरसी, मुंबई (पूर्वीचे डीटीआरटीआय, मुंबई) या संस्थेची सप्टेंबर 2012 ते मे 2015 या काळात धुरा सांभाळली होती, या आठवणी सोबत घेऊन त्यांनी पुन्हा एकदा या संस्थेला भेट देताना आपल्या कार्यकाळातील आठवणींना उजाळा दिला. प्रशिक्षणाबाबत आपले विचार मांडले आणि प्रशिक्षणविषयक बदलत्या गरजा व सर्वोत्तम पद्धतींवर उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांच्या चमूंना मार्गदर्शन केले.
'मिशन कर्मयोगी'च्या भावनेनुसार, सातत्यपूर्ण क्षमता बांधणी आणि मूल्य-आधारित नेतृत्वाला प्रोत्साहन देण्याच्या आपल्या कटिबद्धतेचा एनएडीटी -आरसी, मुंबईने 'रिफ्लेक्शन्स' मालिकेच्या माध्यमातून पुनरुच्चार केला आहे.

केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाचे सदस्य (आयटी) संजय बहादूर, एनएडीटी -आरसी, मुंबईचे प्रधान अप्पर महासंचालक नवनीत मनोहर यांच्याशी संवाद साधला

नवनीत मनोहर यांनी संजय बहादूर यांचे स्वागत केले

संजय बहादूर अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना
* * *
पीआयबी मुंबई | निलिमा चितळे/शैलेश पाटील/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai