संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय नौदलाकडून पाणबुडीविरोधी युद्धासाठीच्या उथळ पाण्यातील स्वदेशी बनावटीची युद्धनौका आयएनएस मंगरोलचा नौदलात समावेश

Posted On: 12 OCT 2026 9:56PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 ऑक्टोबर 2026

भारतीय नौदलाने 12 ऑक्टोबर 2026 रोजी मुंबईतील नौदल गोदीत पाणबुडीविरोधी युद्धासाठीच्या उथळ पाण्यातील युद्धनौकांपैकी माहे वर्गातील (एएसडब्ल्यू-एसडब्ल्यूसी) तिसरी युद्धनौका आयएनएस मंगरोल (पी82) नौदलात दाखल केली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पश्चिम नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, व्हाइस  अॅडमिरल संजय वत्सायन यांनी भूषविले.

या समारंभाला संरक्षण दलांचे वरिष्ठ अधिकारी, संरक्षण मंत्रालयाचे प्रतिनिधी, कोचीन शिपयार्ड लिमिटेड (सीएसएल)चे प्रतिनिधी, उद्योग क्षेत्रातील भागीदार आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

कोची स्थित कोचीन शिपयार्ड लिमिटेडने बांधलेली स्वदेशी बनावटीची आयएनएस मंगरोल ही युद्धनौका युद्धनौकांची रचना, बांधणी आणि विविध प्रणालींचे एकत्रीकरण या क्षेत्रांतील भारताच्या वाढत्या क्षमतांचे प्रतीक आहे.

या युद्धनौकेत 80 टक्क्यांहून अधिक स्वदेशी सामग्रीचा वापर करण्यात आला आहे. यामुळे आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया या उपक्रमांप्रती देशाची वचनबद्धता अधोरेखित होते. तसेच, स्वदेशी नौदल क्षमता बळकट करण्यामध्ये भारतीय संरक्षण उद्योग आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (एमएसएमई) यांच्या योगदानाचे महत्त्व या युद्धनौकेमुळे स्पष्ट होते.

किनारी आणि उथळ पाण्यातील मोहिमांसाठी तयार करण्यात आलेली आयएनएस मंगरोल ही युद्धनौका पाणबुडीविरोधी युद्ध (एएसडब्ल्यू), पाण्याखालील टेहळणी आणि कमी तीव्रतेच्या सागरी मोहिमा (एलआयएमओ) राबविण्यास सक्षम आहे. तसेच, सुरुंग युद्धाशी संबंधित कार्ये पार पाडण्याची क्षमताही या युद्धनौकेत आहे. या युद्धनौकेवरील प्रगत संवेदक, सोनार आणि शस्त्र प्रणाली यांमुळे किनारी समुद्राच्या आव्हानात्मक परिस्थितीत पाण्याखालील धोक्यांचा शोध घेणे, त्यांचा मागोवा घेणे आणि प्रतिकार करण्याच्या शक्यता अधिक प्रभावी झाल्या आहेत. तीन डिझेल इंजिनांद्वारे चालणाऱ्या वॉटरजेट प्रॉपल्शन प्रणालींमुळे या युद्धनौकेला उच्च दर्जाची गतिशीलता आणि जलद प्रतिसादाची क्षमता प्राप्त आहे. उथळ आणि मर्यादित जल क्षेत्रातील मोहिमांसाठी ही वैशिष्ट्ये अत्यंत महत्त्वाची ठरतात.

व्हाइस अॅडमिरल संजय वत्सायन यांनी आपल्या भाषणात आयएनएस मंगरोलच्या नौदलातील समावेशाबद्दल भारतीय नौदल आणि कोचीन शिपयार्ड लिमिटेड (सीएसएल) यांचे अभिनंदन केले. बदलत्या सागरी सुरक्षा परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताची सागरी टेहळणी आणि पाणबुडीविरोधी युद्ध क्षमता बळकट करण्यासाठी स्वदेशी युद्धनौकांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. भारताच्या स्वदेशी जहाज बांधणी उद्योगाच्या वाढत्या क्षमतांवरही त्यांनी भर दिला. तसेच, तांत्रिक प्रगती, कार्यात्मक सज्जता आणि संरक्षण उत्पादनातील स्वावलंबन यांसाठी भारतीय नौदलाची सातत्यपूर्ण वचनबद्धता त्यांनी ठळकपणे मांडली.

आयएनएस मंगरोल या युद्धनौकेला गुजरातमधील जुनागढ जिल्ह्यातील मंगरोल या किनारी शहरावरून आणि तिथल्या प्रमुख मासेमारी बंदरावरून नाव देण्यात आले आहे. ही युद्धनौका पूर्वीच्या आयएनएस मंगरोल (एम85) या युद्धनौकेचा वारसा पुढे चालवते. ही पूर्वीची युद्धनौका सुरुंगशोधक होती आणि एप्रिल 2004 पर्यंत भारतीय नौदलात सेवेत होती. अशा प्रकारे, उल्लेखनीय युद्धनौकांची नावे जतन करण्याची नौदलाची परंपरा कायम राखली जात आहे.

आयएनएस मंगरोलचा नौदलात समावेश हा भारतीय नौदलाची पाणबुडीविरोधी युद्ध क्षमता आणि किनारी संरक्षण सज्जता बळकट करण्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. भारताच्या किनारी सागरी क्षेत्रांचे संरक्षण करणे, देशाच्या सागरी हितसंबंधांचे रक्षण करणे, सागरी क्षेत्राविषयीची जागरूकता वाढविणे आणि पाण्याखालील धोक्यांचा प्रतिकार करणे यामध्ये या युद्धनौकेचे योगदान राहील.

या युद्धनौकेच्या समावेशामुळे सागरी सुरक्षा, प्रादेशिक स्थैर्य आणि युद्धनौकांच्या बांधणीतील स्वावलंबन यांप्रती भारतीय नौदलाची वचनबद्धता आणखी दृढ झाली आहे. हिंद महासागर क्षेत्रातील भारताच्या सागरी हितसंबंधांना पुढे नेण्याच्या दृष्टीनेही हा समावेश महत्त्वपूर्ण आहे.

 


माधुरी पांगे/रेश्मा बेडेकर/प्रिती मालंडकर 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2322556) अभ्यागत कक्ष : 4
Read this releasein: English , हिन्दी