पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय ‘इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स’च्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन
नवी दिल्लीतील 55 लोदी इस्टेट हा आयबीसीए मुख्यालयाचा नवीन पत्ता
Posted On:
12 OCT 2026 8:29PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 ऑक्टोबर 2026
‘इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स’ (आयबीसीए) च्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते आज झाले. नवी दिल्लीतील 55 लोदी इस्टेट इथे हे नवे कार्यालय आहे. उद्घाटन सोहळ्यात आयबीसीएचे महासंचालक डॉ. एस. पी. यादव यांनी मंत्री आणि इतर मान्यवरांचे स्वागत केले. त्यानंतर त्यांनी आयबीसीएच्या विविध उपक्रमांची आणि कार्यक्रमांची माहिती दिली. या कार्यक्रमाला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचे विशेष सचिव आणि महासंचालक (वन) संतोष तिवारी यांच्यासह मंत्रालयातील इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमात केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री, ग्लोबल बायोफ्युएल्स अलायन्स (जीबीए) चे महासंचालक, ‘कोॲलिशन फॉर डिझास्टर रिझिलीअन्स इन्फ्रास्ट्रक्चर’ (सीडीआरआय) चे महासंचालक, आंतरराष्ट्रीय सौर आघाडी (आयएसए) चे महासंचालक आणि भारतातील विविध आंतरराष्ट्रीय आणि संयुक्त राष्ट्रांच्या संघटनांचे प्रमुख व प्रतिनिधी सहभागी झाले होते. यामध्ये संयुक्त राष्ट्रे, संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (यूएनडीपी), जागतिक बँक, संयुक्त राष्ट्र बाल निधी (युनिसेफ), आशियाई विकास बँक (एडीबी), वर्ल्डवाइड फंड फॉर नेचर (डब्ल्यूडब्ल्यूएफ), इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचर (आययूसीएन), संयुक्त राष्ट्रे पर्यावरण कार्यक्रम (यूएनईपी), अन्न व कृषी संघटना (एफएओ) आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा विभाग (यूएनडीएसएस) यांचा समावेश होता.
आयबीसीए विषयक
‘इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स’ ही करारावर आधारित आंतरसरकारी संघटना आहे. जगातील मार्जारवर्गीय सात मोठ्या वन्य प्रजातींच्या संवर्धनासाठी या संघटनेची स्थापना करण्यात आली असून तिचे मुख्यालय भारतात आहे. या सात प्रजाती म्हणजे सिंह, वाघ, बिबट्या, स्नोलेपर्ड, चित्ता, जॅग्वार आणि प्यूमा.
भारत सरकारने 5 वर्षांच्या कालावधीसाठी (2023-24 ते 2027-28) सुरुवातीचे योगदान म्हणून 150 कोटी रुपये देण्याचे वचन दिले आहे. आतापर्यंत भारतासह जगभरातील 29 देश आयबीसीएचे सदस्य झाले आहेत. तसेच 5 देशांनी निरीक्षक म्हणून सहभागी होण्याचा पर्याय निवडला आहे; तर अन्य 11 देशांनी या आघाडीचे सदस्य होण्यास संमती दिली आहे.
आयबीसीएच्या स्थापनेनंतर अडीच वर्षांच्या कालावधीत गाठलेले काही महत्त्वाचे टप्पे पुढीलप्रमाणे -
परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या प्रायोजकत्वाखालील आयटीईसी कार्यक्रमांतर्गत विविध देशांतील परदेशी सहभागींसाठी क्षमता बांधणीचे दोन कार्यक्रम घेतले.
20 देशांतील पशुवैद्यकीय डॉक्टरांसाठी ‘प्राईम कॅट हेल्थ’ कार्यक्रमाचे आयोजन केले.
साइटिस सीओपी, यूएनएफट्रिपलसी सीओपी आणि साइटिस स्थायी समितीच्या बैठकीसारख्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर व्यापक आणि अर्थपूर्ण सहभाग नोंदवला.
आंतरराष्ट्रीय वेबिनार आणि जागतिक छायाचित्रण स्पर्धा यांसारख्या जनजागृतीपर व लोकसंपर्क उपक्रमांचे आयोजन केले.

माधुरी पांगे/रेश्मा बेडेकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2322544)
अभ्यागत कक्ष : 6