भूविज्ञान मंत्रालय
एपीएआरसी (APARC) सर्वसाधारण सभा 2026 ला आयआयटीएम पुणे येथे प्रारंभ : वातावरण आणि हवामान विज्ञानाच्या भविष्याला आकार देण्यासाठी जागतिक तज्ञ आले एकत्र
Posted On:
12 OCT 2026 7:34PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 ऑक्टोबर 2026
'वातावरणीय प्रक्रिया आणि हवामानातील त्यांची भूमिका (APARC) सर्वसाधारण सभा 2026' चा उद्घाटन समारंभ आज भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था (IITM), पुणे येथे पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. श्रीनिवास कुमार तुम्माला (सचिव, भूविज्ञान मंत्रालय, भारत सरकार) दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. सन्माननीय अतिथी म्हणून को बॅरेट (यूएन डब्ल्यूएमओच्या उप-महासचिव), डॉ. हिंदुमा थी पलानीसामी (वैज्ञानिक अधिकारी, WCRP, WMO), डॉ स्टेफनी इव्हान (CNRS संशोधन शास्त्रज्ञ वातावरण आणि चक्रीवादळ प्रयोगशाळा , रियुनियन आयलंड, फ्रान्स आणि APARC सह-अध्यक्ष, डीएलआर इन्स्टिट्यूट ऑफ ऍटमॉस्फेरिक फिजिक्स आणि APARC LOC इंटरनॅशनल), डॉ सूर्यचंद्र राव (संचालक, भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था), आणि डॉ सुवर्णा फडणवीस (अध्यक्ष, वैज्ञानिक आयोजन समिती आणि प्रकल्प संचालक CCCR, IITM) उपस्थित होते.
एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार ठरत, भारत दर चार वर्षांनी होणाऱ्या या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाचे यजमानपद भूषवत आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने हवामान आणि वातावरणीय विज्ञानातील महत्त्वपूर्ण वैज्ञानिक प्रगतीवर चर्चा करण्यासाठी आणि सहयोगात्मक उपक्रमांना चालना देण्यासाठी जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ, संशोधक, विद्यार्थी आणि धोरणकर्ते एकत्र येत आहेत.
पाच दिवस चालणाऱ्या या सभेमध्ये (12–16,ऑक्टोबर 2026) युरोप, अमेरिका, दक्षिण आशिया, आग्नेय आशिया, ऑस्ट्रेलिया आणि इतर प्रदेशांतील 550 हून अधिक सहभागी एकत्र येणार आहेत. यामध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहणारे 380 प्रतिनिधी (250 राष्ट्रीय आणि 130 आंतरराष्ट्रीय) तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होणारे सुमारे 180 जागतिक संशोधक यांचा समावेश आहे.
सक्षम नेतृत्व आणि बीजभाषण
या कार्यक्रमाची सुरुवात आयआयटीएम (IITM), पुणे'चे संचालक डॉ. सूर्यचंद्र ए. राव यांच्या बीजभाषणाने झाली. त्यांच्या भाषणाचा विषय होता: "मॉन्सूनचे मॉडेलिंग: संभाव्य पूर्वानुमानक्षमता आणि पूर्वानुमान कौशल्य यांमधील तफावत दूर करण्याच्या संधी ."
या सभेचे नेतृत्व करणाऱ्या प्रमुख मान्यवरांमध्ये आणि वातावरणीय शास्त्रज्ञांमध्ये डॉ. स्टेफनी इव्हान, CNRS शास्त्रज्ञ, फ्रान्स; APARC सह-अध्यक्ष), डॉ. ओलाफ मॉर्गनस्टर्न (Deutscher Wetterdienst - DWD, जर्मनी; APARC सह-अध्यक्ष), डॉ. हिंदूमती पलानीसामी (जागतिक हवामानविज्ञान संघटना - WMO, जिनिव्हा), प्रा. पॉल कुशनर (टोरोंटो विद्यापीठ, कॅनडा), डॉ. सूर्यचंद्र ए. राव (संचालक, IITM, पुणे) आणि डॉ. सुवर्णा फडणवीस (प्रकल्प संचालक, सेंटर फॉर क्लायमेट चेंज रिसर्च, IITM) यांचा समावेश आहे.
सामाजिक हितासाठी महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा
APARC हा 'वर्ल्ड क्लायमेट रिसर्च प्रोग्राम' (WCRP) चा एक मुख्य उपक्रम आहे. दर चार वर्षांनी आयोजित केली जाणारी ही सर्वसाधारण सभा संशोधनातील त्रुटी ओळखणे , वैज्ञानिक भागीदारी बळकट करणे आणि सामाजिक हितासाठी हवामानविषयक गंभीर आव्हानांचा सामना करण्यासाठी कृतीयोग्य आराखडे तयार करणे यांसाठी एक जागतिक व्यासपीठ म्हणून काम करते. या बैठकीदरम्यान होणाऱ्या चर्चा आणि निर्माण होणारे परस्पर संबंध APARC च्या भविष्यातील उपक्रमांमध्ये योगदान देतील, तसेच वातावरण आणि हवामान संशोधनाला नवी दिशा देण्यास मदत करतील, अशी अपेक्षा आहे.
या सर्वसाधारण सभेच्या वैज्ञानिक कार्यक्रमात 67 मौखिक सादरीकरणे (ज्यामध्ये 9 मुख्य भाषणे, 17 निमंत्रित तज्ज्ञांची भाषणे आणि 41 इतर सादरीकरणांचा समावेश आहे) तसेच 400 हून अधिक पोस्टर सादरीकरणे यांचा समावेश आहे.







माधुरी पांगे/सुषमा काणे /प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2322470)
अभ्यागत कक्ष : 12