लोकसभा सचिवालय
लोकसभा अध्यक्षांतर्फे शिवराज पाटील चाकूरकर यांना पुष्पांजली अर्पण
Posted On:
12 OCT 2026 7:33PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 ऑक्टोबर 2026
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज माजी लोकसभा अध्यक्ष शिवराज व्ही. पाटील चाकूरकर यांच्या जयंतीनिमित्त संविधान सदनाच्या मध्यवर्ती सभागृहात त्यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण केली.
यावेळी राज्यसभेचे उपसभापती हरिवंश, संसद सदस्य, माजी संसद सदस्य तसेच अन्य मान्यवरांनीही शिवराज पाटील यांना पुष्पांजली अर्पण केली.
लोकसभेचे महासचिव उत्पल कुमार सिंह आणि राज्यसभेचे महासचिव पी. सी. मोदी यांनीही शिवराज पाटील यांना पुष्पांजली अर्पण केली.
शिवराज पाटील यांचा जन्म 12 ऑक्टोबर 1935 रोजी महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील चाकूर गावात झाला. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य सार्वजनिक सेवेसाठी समर्पित केले. मुंबई विद्यापीठातून विधी शाखेतील पदव्युत्तर पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी 1972 मध्ये महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून आपल्या विधिमंडळातील कारकिर्दीला सुरुवात केली. पुढे 1978 ते 1979 या काळात त्यांनी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. 1980 मध्ये ते लातूर लोकसभा मतदारसंघातून सातव्या लोकसभेवर प्रथम निवडून आले. त्यानंतर सलग अनेक लोकसभा कार्यकाळांत त्यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले.
शिवराज पाटील यांना दहाव्या लोकसभेचे अध्यक्ष म्हणून सर्वानुमते निवडून येण्याचा दुर्मिळ बहुमान प्राप्त झाला. त्यांनी 10 जुलै 1991 ते 22 मे 1996 या कालावधीत लोकसभेचे अध्यक्षपद भूषविले. 31 मार्च 1993 रोजी विभाग-संबंधित 17 स्थायी समित्यांची स्थापना करण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या ऐतिहासिक उपक्रमामुळे कार्यकारी मंडळाच्या कामकाजात अधिक उत्तरदायित्व सुनिश्चित करण्यासाठी संसदेची भूमिका अधिक बळकट झाली.
खासदार स्थानिक क्षेत्र विकास योजना (MPLADS) सुरू करणे, संसद सदस्यांसाठी माहिती सेवांचे संगणकीकरण करणे आणि संसदेच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण सुरू करणे यांसारख्या महत्त्वपूर्ण उपक्रमांचाही त्यांनी पुढाकार घेतला.
शिवराज पाटील यांचे 12 डिसेंबर 2025 रोजी निधन झाले.
माधुरी पांगे/वैभवी जोशी/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2322459)
अभ्यागत कक्ष : 10