गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

गोवा विमानतळावर परीक्षा गैरव्यवहारासाठी वापरली जाणारी ब्लूटूथ साधने बाळगलेल्या दोन विमान प्रवाशांना केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने घेतले ताब्यात


जप्त केलेल्या उपकरणांचा संबंध भारतीय तंत्रज्ञान संस्था गोवा भरती परीक्षेशी असल्याचेही झाले उघड, या प्रकरणी गुन्हाही दाखल

Posted On: 11 OCT 2026 8:02PM by PIB Mumbai

 

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या जवानांनी 10 ऑक्टोबर 2026 रोजी गोव्यात दाबोलीम इथल्या गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या कारवाईत, स्पर्धा परीक्षांमध्ये गैरव्यवहार करण्याच्या उद्देशाने लपवून ठेवलेली ब्लूटूथ साधने बाळगलेल्या दोन देशांतर्गत प्रवाशांना ताब्यात घेतले. दोन्ही प्रवाशांना जप्त केलेल्या साहित्यासह स्थानिक पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून, त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

10 ऑक्टोबर 2026 रोजी सुमारे 14 वाजून 25 मिनीटांनी (दुपारी 2 वाजून 25 मी. ), एअर इंडिया एक्सप्रेसच्या IX-1340 या विमानाने गोव्याहून दिल्लीला जाण्यासाठी निघालेल्या पहिल्या प्रवाशाने उड्डाण पूर्व सुरक्षा तपासणी केंद्रावर त्याची हँडबॅग एक्स रे स्क्रिनिंगसाठी ठेवली होती. यावेळी कर्तव्यावर असलेल्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्याला एक्स रे प्रतिमेत संशयास्पद वस्तू आढळल्याने त्याने बॅग प्रत्यक्ष तपासणीसाठी पाठवली. या तपासणी दरम्यान स्पर्धा परीक्षांमध्ये कॉपी करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तीन इलेक्ट्रॉनिक वस्तू, दोन सिम कार्ड आणि तीन ब्लूटूथ इअरपीस हस्तगत करण्यात आले.

गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळावर तैनात केंद्रीय असलेल्या औद्योगिक सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांनी संबंधित प्रवाशाकडे विचारपूस केली असता, ही उपकरणे परीक्षेत गैरव्यवहारासाठीच असल्याचे पहिल्या प्रवाशाने मान्य केले. तसेच आपल्यासोबत प्रवास करणारा सहकारी आधीच विमानात बसल्याची माहिती त्याने दिली. विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या जवानांनी दुसऱ्या प्रवाशाला विमानातून खाली उतरवले. त्याच्या हँडबॅगच्या झडतीदरम्यान तशाच प्रकारचे एक साधन, दोन ब्लूटूथ इअरपीस, एक सिम कार्ड आणि त्याच दिवशी पार पडलेल्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या गोवा इथल्या संकुलाच्या बिगर शिक्षक भरती परीक्षेसाठीच्या, प्रशासकीय सहाय्यक पदाचे प्रवेशपत्रही जप्त करण्यात आले. हे उपकरण त्या परीक्षेत वापरण्यासाठीच होते, अशी कबुली त्या दुसऱ्या प्रवाशानेही दिली.

त्यानंतर संबंधित गुप्तचर यंत्रणांसोबत दोन्ही प्रवाशांची संयुक्तपणे चौकशी करण्यात आली. पहिल्या प्रवाशाने, तो इतर दुसऱ्याच उमेदवाराच्या ऐवजी या परीक्षेला बसला असल्याची कबुली दिली. या प्रवाशाने सुरक्षा क्षेत्रात त्याने फेकून दिलेले इतर दोन व्यक्तींचे आधार कार्डही यानंतर जप्त करण्यात आले. हा प्रवासी संरक्षण आस्थापनातील नागरी कर्मचारी असल्याच्या दावा त्याने केला होता, त्याच्या या दाव्याचीही संबंधित प्राधिकरणांकडून पडताळणी करण्यात आली.

दोन्ही प्रवाशांसह, जप्त केलेली सर्व उपकरणे आणि कागदपत्रे दाबोलीम विमानतळ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. संबंधित परीक्षा केंद्र हे फोंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने, नंतर त्यांना तिथे हस्तांतरित करण्यात आले. दोन्ही प्रवाशांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून स्थानिक पोलीस पुढील तपास करत आहेत.

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल देशभरातील विमानतळांवर विमान वाहतूक विषयक सुरक्षा पुरवते. या प्रकरणात, तपासणी कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे या उपकरणांचा शोध लागला आणि परीक्षा गैरव्यवहाराशी संबंधित साहित्यासह राज्य सोडून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन प्रवाशांना रोखण्यात यश आले.

***

शैलेश पाटील/तुषार पवार/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2322055) अभ्यागत कक्ष : 18
Read this releasein: English