इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
इंडिया मोबाइल काँग्रेस 2026' मध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या दालनात भारताच्या डिजिटल नवोन्मेषाचे आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान क्षमतांचे प्रदर्शन
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या दालनामध्ये डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, एआय, सेमीकंडक्टर, स्टार्टअप्स आणि इमर्सिव्ह तंत्रज्ञानाचे सादरीकरण
Posted On:
09 OCT 2026 3:01PM by PIB Mumbai
भारत आणि जगभरातील तंत्रज्ञान कंपन्या, स्टार्टअप्स, नवोन्मेषक, धोरणकर्ते, संशोधक आणि उद्योग क्षेत्रातील दिग्गजांना एकत्र आणणाऱ्या दहाव्या 'इंडिया मोबाइल काँग्रेस' (IMC) 2026 चा 7 ऑक्टोबर 2026 रोजी नवी दिल्लीतील 'यशोभूमी' येथे शुभारंभ झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे 8 ऑक्टोबर 2026 रोजी औपचारिक उद्घाटन झाले.
7 ते 10 ऑक्टोबर 2026 दरम्यान 'स्केल विदाउट बाउंडरीज' या संकल्पने अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या आयएमसी 2026 च्या माध्यमातून प्रगत तंत्रज्ञानावर आधारित संपर्कव्यवस्था आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान यांबाबत संवाद, नवोन्मेष आणि सहकार्य प्रस्थापित करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (MeitY) 'आयएमसी 2026' मध्ये डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, नागरिक सेवा, भाषा तंत्रज्ञान, डेटा संरक्षण, सेमीकंडक्टर्स, इंटरनेट पायाभूत सुविधा, प्रगत संशोधन आणि तंत्रज्ञान उद्योजकतेमधील विविध प्रकारच्या 'डिजिटल इंडिया' उपक्रमांचे आणि क्षमतेचे प्रदर्शन करणारे एक समर्पित दालन उभारले आहे.
नागरिक आणि सरकारी सेवांना पाठबळ देणाऱ्या डिजिटल पायाभूत सुविधा या दालनात ठळकपणे मांडल्या आहेत; ज्यामध्ये आधार, डिजीलॉकर (DigiLocker), उमंग (UMANG) आणि एन्टिटी लॉकर (Entity Locker) यांचा समावेश आहे. कशा प्रकारे डिजिटल प्लॅटफॉर्म्स नागरिकांसाठी तसेच संस्थांसाठी आपली ओळख पटवणे, दस्तऐवज जतन करणे आणि सरकारी सेवांचा लाभ घेणे अधिक सुलभ, सुरक्षित आणि सोयीस्कर बनवत आहेत, याची माहिती हे उपक्रम एकत्रितपणे देत आहेत.

एपीआय सेतूच्या बूथवर एपीआयद्वारे होणारे एकीकरण आणि माहितीची देवाणघेवाण, तसेच डिजिटल प्रणालींमध्ये आंतरकार्यक्षमतेला कसे समर्थन दिले जाते, हे अभ्यागत समजून घेत आहेत. यूएक्स4जी पथक अभ्यागतांना नागरिक-केंद्रित डिझाइनद्वारे त्यांच्या डिजिटल मालमत्तेचा वापरकर्ता अनुभव आणि डिझाइन कसे सुधारावे, हे शोधण्यात मदत करत आहे.
डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण आराखडा दर्शवणारा समर्पित बूथ, डिजिटल युगात वैयक्तिक माहितीच्या जबाबदार प्रक्रियेचे आणि संरक्षणाचे महत्त्व अधोरेखित करतो.
डिजिटल इंडिया भाषिणीच्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भाषा तंत्रज्ञानाचा वापर करून विविध भारतीय भाषांमधील डिजिटल आशय आणि सेवन पर्यंत पोहोच सुलभ करण्याचे प्रात्यक्षिक सादर केले जात आहे. मायगव्ह इंडियाने आपल्या बूथवर 'मन की बात' कार्यक्रमातील व्हिडिओंचा संग्रह सादर केला आहे. हा संग्रह देशभरातील प्रेरक कथा, वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांचे विचार आणि तळागाळातील उपक्रमांवर प्रकाश टाकतो.

या पॅव्हेलियनमध्ये प्रगत संगणक विकास केंद्र (सी-डॅक) देखील सहभागी झाले असून ते इंटरनेट पायाभूत सुविधा, उपयोजित संशोधन आणि प्रगत तंत्रज्ञान यांमधील क्षमतांवर प्रकाश टाकत, दर्पण एस3 (DARPAN S3) प्रदर्शित करत आहे. इंडिया मोबाईल काँग्रेस 2026 मध्ये शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या उपस्थितीमुळे डिजिटल सेवा, नागरिक सहभाग, कृत्रिम बुद्धिमत्ता, स्टार्टअप्स, सेमीकंडक्टर्स, इंटरनेट पायाभूत सुविधा आणि प्रगत संशोधन या क्षेत्रातील भारताच्या क्षमतांचे दर्शन घडत आहे. तसेच, अभ्यागतांना भारताच्या तंत्रज्ञान क्षमतांची व्याप्ती आणि या क्षेत्रांमध्ये निर्माण होणाऱ्या संधींची एक संक्षिप्त माहिती देखील मिळत आहे. इंडिया मोबाईल काँग्रेस 2026 दरम्यान विद्यार्थी, उद्योजक, सरकारी अधिकारी, संशोधक आणि उद्योग प्रतिनिधी विविध उपक्रमांची माहिती घेऊ शकतात, नवोन्मेषकांशी संवाद साधू शकतात आणि निवडक तंत्रज्ञानाचा अनुभव घेऊ शकतात.
***
Neha Kulkarni / Radhika Aghor / Madhura Nerurkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2321621)
अभ्यागत कक्ष : 4