पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 व्या इंडिया मोबाईल काँग्रेसचे केले उद्घाटन


भारताचे दूरसंचार क्षेत्र एका निश्चित गतीने अधिकाधिक स्वयंपूर्णतेच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे दृश्य अतिशय उत्साहवर्धक आहे : पंतप्रधान

गेल्या 10-12 वर्षांत मोबाईल फोन हे केवळ आधुनिक संवादाचे माध्यम न राहता सुशासनाचे एक महत्त्वाचे साधन म्हणूनही उदयाला आले आहेत आणि हाच आमच्या 'डिजिटल इंडिया' संकल्पनेचा मुख्य गाभा आहे: पंतप्रधान

एक दशकापूर्वीपर्यंत भारतामध्ये ‘डिजिटल विषमता’ हे एक मोठे आव्हान होते; आधुनिक तंत्रज्ञान हे हळूहळू केवळ मूठभर लोकांचा विशेष अधिकार बनत चालले होते; ज्यांच्याकडे साधने होती, केवळ तेच आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेऊ शकतील, अशी परिस्थिती भारतामध्ये निर्माण होत होती; 'डिजिटल इंडिया' अभियानाच्या माध्यमातून आम्ही ही वस्तुस्थिती बदलण्याचा निर्णय घेतला आणि मोबाईल फोनला या अभियानाच्या केंद्रास्थानी ठेवले; तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण करण्याच्या दिशेने हे एक अत्यंत मोठे पाऊल होते: पंतप्रधान

आज, शेकडो शासकीय सेवा मोबाईल फोनवर उपलब्ध आहेत; सरकारी मदत आता थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केली जाते: पंतप्रधान

मोबाईल फोन हे आता केवळ संभाषणाचे माध्यम राहिलेले नाही, तर त्यांनी प्रवास, प्रतीक्षा आणि खर्च कमी करून अधिक सोय उपलब्ध करून दिली आहे; हा तंत्रज्ञानाचा नागरिकांना मिळालेला सर्वात मोठा लाभांश आहे: पंतप्रधान

आज भारतामध्ये मोबाईल फोन हा गेमिंग कन्सोल आणि क्रिएशन स्टुडिओ या दोन्ही रूपात कार्य करत आहे: पंतप्रधान

आजच्या काळात दूरसंचार आणि डिजिटल तंत्रज्ञानाचे अत्यंत महत्त्वाचे स्थान लक्षात घेता, त्याची सुरक्षा यंत्रणा अधिक बळकट करणे अत्यंत आवश्यक आहे. फोन आणि नेटवर्कची सुरक्षा ही आपल्या सर्वांचीच प्राधान्याची बाब आहे: पंतप्रधान

आपण सर्वजण डीपफेक्समुळे निर्माण झालेले मोठे आव्हान पाहत आहोत, म्हणूनच या समस्येचा सामना करण्यासाठी एका जागतिक आराखड्याच्या निर्मितीसाठी काम करणे अत्यंत आवश्यक आहे: पंतप्रधान

गेल्या काही वर्षांत भारताने ग्राहकापासून निर्मात्यापर्यंतचा प्रवास पूर्ण केला आहे; आता भारत अशा लक्ष्याच्या दिशेने वाटचाल करत आहे, जिथे उत्पादन आणि डिझाईन भारतात तयार होईल, आणि त्याचे तंत्रज्ञान व बौद्धिक संपदा देखील भारताचीच असेल: पंतप्रधान


Posted On: 08 OCT 2026 6:18PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 ऑक्टोबर 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज यशोभूमी, नवी दिल्ली येथे 10 व्या इंडिया मोबाईल काँग्रेसचे उद्घाटन केले. एका अत्यंत महत्त्वपूर्ण राष्ट्रीय टप्प्याचे औचित्य साधत, पंतप्रधानांनी 8 ऑक्टोबर या  भारतीय वायुसेना दिनानिमित्त वायुसेनेच्या वीरांना अभिवादन केले आणि आपले सुरुवातीचे विचार देशाच्या शूर हवाई रक्षक योद्ध्यांना समर्पित केले. त्यांनी आकाशाचे रक्षण करणाऱ्या धाडसी जवानांना अभिमानाने प्रणाम केला. "मी आपल्या सर्व वीर जवानांना नमन करतो आणि देशवासीयांना वायुसेना दिनाच्या शुभेच्छा देतो," असे  मोदी म्हणाले.

एका  महत्त्वपूर्ण वैयक्तिक टप्प्याचा उल्लेख करताना, कालच सरकारचे प्रमुख म्हणून सातत्यपूर्ण सेवेची 25 वर्षे पूर्ण केल्याबद्दल पंतप्रधानांनी अतिशय मनापासून कृतज्ञता व्यक्त केली. लोकसेवेच्या या प्रवासात त्यांना पाठिंबा देणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे आणि आंतरराष्ट्रीय मित्रांचे त्यांनी मनःपूर्वक आभार मानले. "मी  देशवासीयांचे आणि जगभरातील भारताच्या प्रत्येक मित्राचे त्यांच्या शुभेच्छांसाठी आभार मानतो," असे  मोदी यांनी नमूद केले.

दीर्घायुष्याचा एक सुंदर योगायोग अधोरेखित करताना, पंतप्रधानांनी इंडिया मोबाईल काँग्रेसच्या 10 व्या वर्धापन दिनाचे स्वागत केले आणि त्याच वेळी देशात जीएसएमए बोर्ड बैठकीचे आयोजन करण्याचा बहुमान मिळाल्याचे नमूद केले. त्यांनी उपस्थित दूरसंचार ऑपरेटर्स , उद्योग क्षेत्रातील नेते, शिक्षणतज्ञ आणि स्टार्ट-अप्स यांच्या संपूर्ण जागतिक परिसंस्थेचे मनापासून स्वागत केले

अतिशय जड अंतःकरणाने पंतप्रधानांनी दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाची दुःखद बातमी सांगत पडद्यावर विविध प्रकारची पात्रे जिवंत करून प्रेक्षकांची मने सातत्याने जिंकणाऱ्या या प्रतिभावान कलाकाराचे कौतुक केले. "ते एक उत्कृष्ट कलाकार होते ज्यांनी आपल्या विविधांगी भूमिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांची मने जिंकली," असे मोदी म्हणाले.

दिवंगत अभिनेत्याच्या प्रबळ राष्ट्रप्रेमाची प्रशंसा करताना, पंतप्रधानांनी नाना पाटेकर यांचे वर्णन एक अत्यंत स्वतंत्र बाण्याचे व्यक्तिमत्त्व असे केले, ज्यांचे जीवन पूर्णपणे तिरंगा ध्वजाचा सन्मान आणि गौरव यासाठी समर्पित होते. त्यांनी या दिवंगत अभिनेत्याचे वर्णन 'चित्रपटसृष्टीतील क्रांतीकारक' असे केले; ज्यांचे धारदार संवाद आणि अर्थवाही निःशब्दता  यांनी सामाजिक अनिष्ट प्रथा व राष्ट्रविरोधी घटकांवर सतत प्रहार केले. "मी नाना पाटेकर जी यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांचे कुटुंबीय व चाहत्यांप्रती शोकसंवेदना व्यक्त करतो," असे मोदी यांनी सांगितले.

'इंडिया मोबाइल काँग्रेस'च्या माध्यमातून डिजिटल कनेक्टिव्हिटीच्या उल्लेखनीय प्रगतीचा आढावा घेत, पंतप्रधानांनी  2022  मध्ये याच मंचावरून 5G सेवेचा शुभारंभ केल्याची आणि  2023 मध्ये तिचा मोठ्या प्रमाणावर विस्तार होईल असे भाकीत केल्याची आठवण करून दिली. त्यांनी अभिमानाने नमूद केले की,  आज 5.5  लाखांहून अधिक बेस स्टेशन्सवरून कार्यरत असलेले 5 जी नेटवर्क आता देशातील प्रत्येक जिल्ह्यात यशस्वीपणे पोहोचले असून, यामुळे इंटरनेटचा वेग दहा पटीने वाढला आहे. "आज आपण सर्वजण पाहत आहोत की 5 जी कनेक्टिव्हिटी देशातील प्रत्येक जिल्ह्यात पोहोचली आहे," असे मोदी म्हणाले.

या मंचाच्या वाढत्या जागतिक प्रतिष्ठेचा उल्लेख करताना पंतप्रधानांनी सांगितले की,2024 च्या आयोजनात  जागतिक मानकांवर चर्चा करण्यासाठी 'इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन' सहभागी झाली होती .  तर मागील काही वर्षांमध्ये देशांतर्गत नवोन्मेष आणि उत्पादनावर प्रामुख्याने भर दिला गेला होता. देशाच्या दूरसंचार क्षेत्रातील अभूतपूर्व यशासाठी आणि सर्वात मोठी स्वप्ने साकार करण्यासाठी 'इंडिया मोबाइल काँग्रेस'ने एक महत्त्वपूर्ण उत्प्रेरक म्हणून भूमिका बजावली आहे. "गेल्या काही वर्षांमध्ये , हा मंच भारताच्या प्रगतीचा आणि भारताच्या स्वप्नांचा मंच म्हणून उदयास आला आहे," असे मोदी यांनी नमूद केले.

या परिषदेच्या महत्त्वाकांक्षी संकल्पनेचा स्वीकार करत, पंतप्रधानांनी उपस्थितांना देशात बदल घडवून आणणाऱ्या या  प्रवासाकडे  'सीमा पार विस्ताराचा' सर्वोत्तम पुरावा म्हणून पाहण्याचे आव्हान दिले. अमर्याद विस्ताराचे हेच स्वप्न देशाने प्रत्यक्ष कृतीतून कसे साकारले, हे भारताच्या अनुभवांमधून सांगण्याचे आश्वासन त्यांनी दिले. "या  विस्ताराचे स्वप्न आम्ही कसे जगलो आणि ते कसे प्रत्यक्षात आणले, हे मी तुम्हाला भारताच्या अनुभवांवरून सांगू इच्छितो," असे  मोदी म्हणाले.

कनेक्टिव्हिटीच्या मूलभूत उद्देशाची नव्याने व्याख्या करत, पंतप्रधानांनी स्पष्ट केले की, जागतिक स्तरावर दूरसंचार क्षेत्राबाबतच्या चर्चांमध्ये स्पेक्ट्रम, टॉवर्स आणि नेटवर्कचा वेग या गोष्टींवरच अधिक भर दिला जात असला, तरी देशांतर्गत जनतेसाठी मात्र मोबाईल फोनचे स्वरूप त्याहून अधिक व्यापक आणि महत्त्वपूर्ण बनले आहे. "गेल्या  10-12 वर्षांमध्ये, मोबाईल फोन हे सुशासनाचे एक अत्यंत महत्त्वाचे साधन म्हणून उदयास आले असून, 'डिजिटल इंडिया'च्या संकल्पनेचा तो मुख्य आधारस्तंभ ठरला आहे," असे  मोदी यांनी स्पष्ट केले.

दूरसंचार क्षेत्रातील तेजीमागील मूलभूत हेतूंबाबत बोलताना , पंतप्रधानांनी देशातील स्वस्त डेटा, परवडणारी उपकरणे आणि प्रचंड वापरकर्ता वर्ग याबद्दल जगभरात आश्चर्य व्यक्त होत असल्याची दखल घेतली, परंतु हे कसे घडले, का घडले  हे समजून घेण्याचे आवाहन उपस्थितांना  केले. त्यांनी स्पष्ट केले की, हा मूळ उद्देश समजून घेतल्यास देशाला पुढे नेणारे नेमके लक्ष्य -क्षेत्र  स्पष्ट होते. "जेव्हा आपण हे समजून घेऊ, तेव्हा प्रत्येकाला भारताचा केंद्रबिंदू अगदी स्पष्ट दिसेल," असे  मोदी म्हणाले.

डिजिटल तफावत विरोधातील आक्रमक लढ्याबद्दल बोलताना , पंतप्रधानांनी आठवण करून दिली की, अवघ्या एक दशकापूर्वी आधुनिक तंत्रज्ञान कसे वेगाने उच्चभ्रूंचा विशेषाधिकार बनत होते. त्यांनी स्पष्ट केले की, 'डिजिटल इंडिया' अभियानाने तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण करण्यासाठी जाणीवपूर्वक मोबाईल फोनला केंद्रस्थानी आणले.  व्यापक दूरसंचार सुधारणा राबवल्या आणि उपकरणे देशातच तयार होतील याची खात्री करण्यासाठी पायाभूत सुविधांचा मोठ्या प्रमाणावर विस्तार केला. "तंत्रज्ञानाच्या लोकशाहीकरणासाठी हा एक खूप मोठा प्रयत्न होता," असे मोदी म्हणाले.

या डिजिटल लोकशाहीकरणामुळे निर्माण झालेली क्षमताही पंतप्रधानांनी अधोरेखित केली. मोबाईल फोन आणि स्वस्त डेटाच्या सार्वत्रिक वापरामुळे सामान्य नागरिकांचे जीवन  कशा रितीने सुलभ झाले आहे याची मांडणी त्यांनी केली. जागतिक साथरोगाच्या काळात लॉकडाऊन असतानाही कार्यालये, बँका आणि शाळांचे कामकाज सुरळीत सुरू राहिल्या, यात या तंत्रज्ञानाने मोठी भूमिका बजावलेली असल्याचे त्यांनी नमूद केले. दूर्गम भागांतील गावांमधली गरीब मुलेही आता गुणवत्तापूर्ण डिजिटल शिक्षण सहज मिळवू शकत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. डिजिटल शिक्षण आता सर्वांच्या आवाक्यात येऊ लागले असल्याचे ते म्हणाले.

या शैक्षणिक क्रांतीच्या संदर्भातली आकडेवारीही पंतप्रधानांनी मांडली. दीक्षा (Diksha) या राष्ट्रीय ऑनलाइन मंचाची माहितीही त्यांनी दिली. साथरोगाच्या काळात जुलै 2022 पर्यंत या मंचावरून 5 अब्जापेक्षा जास्त शिक्षण सत्रे आणि 60 अब्ज मिनिटे शिक्षण पूर्ण झाले असल्याचे त्यांनी सांगितले. आता सुमारे 25 कोटी विद्यार्थ्यांना आपल्या सर्व डिजिटल आणि ऑनलाइन शिक्षण माध्यमांशी जोडण्याचा सरकारचा   प्रयत्न असल्याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केले.

अफाट विविधता असलेल्या  आपला देशात तंत्रज्ञानाने  एकसंधता आणली असल्याचेही ते म्हणाले. मोबाईल जोडणीमुळे दैनंदिन आयुष्यातील भौगोलिक आणि भाषिक अडथळे दूर झाले आहेत. डिजिटल क्रांतीपूर्वी नागरिकांना मूलभूत बँकिंग, आरोग्य आणि शासकीय सेवांसाठी शहरांमध्ये जाण्यासाठी खूप वेळ आणि पैसा खर्च करावा लागत होता या बाबीही त्यांनी नमूद केल्या. मोबाईल जोडणीमुळे देशातल्या विविधतेला सुलभतेची जोड मिळाली आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.

डिजिटल प्रशासनामुळे आर्थिक व्यवहारांत आलेल्या पारदर्शकतेबद्दलही त्यांनी उपस्थितांना सांगितले. मोबाईल मंचाच्या उपयोगाने आतापर्यंत 50 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम थेट  लाभार्थींच्या खात्यात वर्ग करण्यात आली.  परिणामी भ्रष्टाचाऱ्यामुळे होऊ शकणारी 5 लाख कोटी रुपयांची गळती वाचू शकली असे ते म्हणाले. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या माध्यमातून, यापूर्वी शासकीय लाभांपासून वंचित राहिलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या खात्यात 4 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त  रक्कम सुरक्षितपणे जमा केली आहे, आता तोच पैसा थेट योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत आहे असे पंतप्रधान म्हणाले.

यानिमीत्ताने पंतप्रधानांनी तंत्रज्ञान सक्षमीकरणामागच्या संकल्पनेचे सारही उपस्थितांसमोर मांडले. मोबाईल फोन हे केवळ संभाषणाचे साधन न राहता कमी प्रवास, कमी प्रतिक्षा कालावधी, कमी खर्च आणि प्रचंड सुलभतेची हमी देणारा ठरला असल्याचे ते म्हणाले. घडून आलेला हा व्यापक बदल म्हणजे सामान्य माणसाला तंत्रज्ञानात केलल्या गुंतवणुकीचा मिळालेला परतावा आहे असे ते म्हणाले. हा तंत्रज्ञानाचा नागरिकांना मिळालेला सर्वात मोठा लाभांश आहे असेही त्यांनी नमूद केले.

देशात उभारलेल्या भक्कम पायाभूत सुविधांमुळे आर्थिक क्षेत्राअंतर्गत त्याचे पडसाद  निर्माण झाल्याचेही त्यांनी सांगितले. दुर्गम भागांमधली टॉवरची उभारणी, ऑप्टिकल फायबरचे जाळे आणि स्वस्त डेटा यांमुळे अर्थव्यवस्थेत पूर्णपणे नवीन क्षेत्रे निर्माण झाली असल्याचे त्यांनी नमूद केले. या विस्तारामुळे तंत्रज्ञान, मनोरंजन आणि शिक्षण क्षेत्रात ग्राहक आणि नव्या सर्जनशील कलाकारांची नवी लाट आली, यामुळे अर्थव्यवस्थेतही नवीन क्षेत्र तयार झाली असे त्यांनी सांगितले.

मनोरंजन क्षेत्रातही वेगाने होत असलेल्या प्रगतीबद्दलही पंतप्रधानांनी सांगितले. टियर-2 आणि टियर-3 श्रेणीअंतर्गत येणाऱ्या शहरांमधील युवावर्गासह 50 कोटींपेक्षा जास्त लोक आता गेमिंग परिसंस्थेशी सक्रियपणे जोडली गेली आहेत.केवळ प्लेअर्स  ते एका व्यावसायिक तज्ञतेचे ई स्पोर्ट्स खेळाडू, आशय निर्माते आणि व्यावसायिक तज्ञ असा प्रवास करणाऱ्या युवा डिजिटल पिढीचेही त्यांनी कौतुक केले. आज देशातील मोबाईल फोन गेमिंग कन्सोलसोबतच निर्मितीचा स्टुडिओही बनला असल्याचे त्यांनी सांगितले.

आशय निर्मिती क्षेत्राच्या लोकशाहीकरणाच्या मुद्याचाही पंतप्रधानांनी उल्लेख केला. जलद जोडणी आणि स्वस्त डेटाच्या बळावर व्हिडिओ शेअरिंगची सुविधा देणारी व्यासपीठे तसेच प्रादेशिक ओटीटी सेवा ग्रामीण भागांपर्यंत पोहोचल्या असल्याचे ते म्हणाले. यामुळे भाषेचे अडथळे दूर झाले असून, आशय निर्मितीचा उद्योग आता हजारो कोटी रुपयांचे क्षेत्र बनले असून, यातून लाखो लोकांना रोजगाराच्या संधी मिळाल्या असल्याचेही त्यांनी नमूद केले. आहेत.एका अर्थाने मोबाईल फोनच्या माध्यमातून  देशातील आशय निर्मिती क्षेत्राचे लोकशाहीकरण घडून आल्याचे त्यांनी नमूद केले.

दूरसंचार आणि डिजिटल तंत्रज्ञान दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनत असल्याने, फोन आणि नेटवर्कच्या सभोवतालची सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करणे याला सर्वोच्च राष्ट्रीय प्राधान्य आहे; असे सायबर सुरक्षेच्या अत्यंत महत्त्वाच्या गरजेकडे लक्ष‌ वेधून  घेताना, पंतप्रधानांनी अधोरेखित केले. सर्वसामान्य नागरिकासाठी गुंतागुंतीच्या वस्तुशास्त्राच्या नियमांपेक्षा सुरक्षेची मूलभूत हमी अधिक महत्त्वाची आहे. "त्यांच्यासाठी विश्वास खूप महत्त्वाचा आहे," यावर  मोदी यांनी भर दिला.

डिजिटल विश्वासाच्या अपेक्षांचे तपशीलवार वर्णन करताना, पंतप्रधानांनी वापरकर्त्यांच्या सुरक्षेचे स्पष्ट चित्र मांडले. नागरिकांना कॉल करणाऱ्यांची खरी ओळख पूर्णपणे कळायलाच हवी, संदेशांची सत्यता पडताळता पाहता यायला हवी आणि रक्कम अदा करताना किंवा वैयक्तिक माहिती देताना त्यांना पूर्णपणे सुरक्षित वाटले पाहिजे, याबद्दल त्यांनी आग्रह धरला. ग्राहक विश्वास हा डिजिटल विस्ताराचा सर्वात महत्त्वाचा कणा आहे,असे त्यांनी हे स्पष्टपणे सांगितले. "जेव्हा ग्राहक कोणत्याही स्वरूपात आपली माहिती देतात, तेव्हा त्यांची माहिती सुरक्षित आहे, असा विश्वास त्यांना असायला हवा," असे मोदींनी ठामपणे सांगितले.

सायबर फसवणूक आणि डीपफेक हे जागतिक असुरक्षिततेचा गैरफायदा घेतात, त्यामुळे सरकार, तंत्रज्ञान कंपन्या, ऑपरेटर्स आणि वित्तीय संस्था या सर्वांना एकत्र आणणाऱ्या एका तातडीच्या, समन्वित जागतिक आराखड्याची आवश्यकता आहे; असा इशारा सीमाविरहित डिजिटल धोक्यांविरुद्ध एकसंधपणे आंतरराष्ट्रीय कारवाईचे आवाहन करताना, पंतप्रधानांनी दिला. अंतिम वापरकर्त्यांना फसवणूकीपासून वाचवताना  ती रोखण्यासाठी सक्षम यंत्रणा तयार करण्यात मदत करण्यासाठी त्यांनी जीएसएमएलला (GSMA) आवाहन केले.  "भारत आपले अनुभव जगासोबत  सामायिक करण्यास तयार आहे," असेही  मोदी यांनी सांगितले.

चालू दशकाची केवळ चार वर्षे शिल्लक असताना,धोरणात्मक क्षितिजावर लक्ष केंद्रित करत, नजीकच्या काळात लवकरच होणाऱ्या शिखर परिषदेतील चर्चा जागतिक मोबाईल बाजाराला भविष्यात मार्गदर्शन करणारा महत्त्वपूर्ण आराखडा तयार करेल याचे स्मरण पंतप्रधानांनी प्रतिनिधींना  करून दिले. तांत्रिक वर्चस्वाच्या पुढील युगासाठी एक महत्त्वपूर्ण नियोजन मंच म्हणून त्यांनी या कार्यक्रमाला संबोधित केले. "हा आराखडा भारतासह संपूर्ण जगाच्या मोबाईल बाजाराला दिशा देईल," असे  मोदी यांनी नमूद केले. 

तांत्रिक सार्वभौमत्वासाठीची अंतिम दृष्टीकोन  स्पष्ट करताना पंतप्रधानांनी घोषित केले की, देशाने ग्राहकाच्या भूमिकेतून निर्माता या भूमिकेकडे यशस्वीपणे संक्रमण केले आहे आणि आता उत्पादन डिझाइन, मूळ तंत्रज्ञान आणि बौद्धिक संपदा आपल्या देशाची असेल या दिशेने देश वेगाने वाटचाल करत आहे. यश सुनिश्चित करण्यासाठी सरकार दशकांपूर्वीच्या कायद्यांचे वेगाने आधुनिकीकरण करत आहे, व्यापक प्रोत्साहन योजना राबवत आहे, दूरसंचार कायदा व गतीशक्ती पोर्टलसारख्या व्यापक नियामक सुधारणांची अंमलबजावणी करत आहे;असे आश्वासन त्यांनी उद्योगाला दिले."याचा अर्थ, दूरसंचार क्षेत्रातही सुधारणांची एक्सप्रेस वेगाने पुढे जात आहे,” यावर असे  मोदींनी आपल्या भाषणात भर दिला.

महत्त्वाच्या हार्डवेअर स्थानिकीकरणाबद्दल अद्ययावत माहिती देताना पंतप्रधानांनी सांगितले  केले की, देशांतर्गत सेमीकंडक्टर उत्पादन परिसंस्था वेगाने प्रगती करत असून, पाच ठिकाणी व्यावसायिक उत्पादन आधीच सुरू झाले आहे. इंडिया सेमीकंडक्टर मिशनच्या पुढील टप्प्यात संपूर्ण पुरवठा साखळीच्या स्थानिकीकरणावर आक्रमकपणे लक्ष केंद्रित केले जाईल, असे त्यांनी घोषित केले.  "याचा अर्थ, भारत दूरसंचार क्षेत्राशी संबंधित प्रत्येक क्षेत्रात मोठी पावले उचलत आहे," असे मोदींनी यावेळी सांगितले.

आपल्या भाषणाचा समारोप करताना कृतीसाठी एक महत्वपूर्ण आवाहन करत, पंतप्रधानांनी इंडिया मोबाईल काँग्रेस हे  केवळ एक तंत्रज्ञान प्रदर्शन न राहता, मानवतेच्या सेवेतील नवकल्पना, संशोधन आणि भागीदारीसाठी एक अंतिम महत्वपूर्ण केंद्र बनण्याचे आवाहन दिले, जे एका विकसित राष्ट्राच्या भव्य संकल्पाला बळ देईल. उपस्थित असलेले सर्वजण या व्यासपीठाला उद्योग आणि विचारांसाठी एक प्रमुख जागतिक केंद्र बनवण्यासाठी अथक प्रयत्न करतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. "मला खात्री आहे की तुम्ही सर्वजण यासाठी मनापासून प्रयत्नशील  राहाल, या अपेक्षेसह, तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा," असे  मोदी आपल्या भाषणाचा  समारोप  करताना म्हणाले.

निलिमा चितळे/शैलेश पाटील/सुषमा काणे /तुषार पवार/संपदा पाटगावकर/प्रिती मालंडकर 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2320902) अभ्यागत कक्ष : 4