लोकसभा सचिवालय
azadi ka amrit mahotsav

संवाद, वैविध्यपूर्ण विचार आणि अर्थपूर्ण लोकसहभाग यावर मजबूत लोकशाहीची उभारणी होते: लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला


तंत्रज्ञान आणि युवा सहभाग लोकशाहीला नवा आयाम देऊ शकतो: लोकसभा अध्यक्ष

नवोन्मेषाचा अवलंब करण्यासाठी राज्य विधिमंडळांमध्ये निकोप स्पर्धा असायला हवी असे लोकसभा अध्यक्षांचे आवाहन

गोवा राज्याने आपला वारसा आणि नैसर्गिक पर्यावरणाचे जतन करून आर्थिक विकासात यशस्वीपणे समतोल साधला : लोकसभा अध्यक्ष

गोवा विधानसभेने युवा, महिला आणि नागरिकांच्या मोठ्या सहभागासह पुढील 25 वर्षांचा पथदर्शी आराखडा तयार करावा असे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे आवाहन

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी गोवा विधानसभेच्या इमारतीला 25 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित रौप्यमहोत्सवी सोहळ्याला संबोधित केले

Posted On: 06 OCT 2026 8:29PM by PIB Mumbai

पणजी/नवी दिल्ली, 6 ऑक्टोबर 2026

गोव्याचे राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी आज गोवा विधानसभा इमारतीला 25 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित रौप्यमहोत्सवी सोहळ्याचे उद्घाटन केले.

संवाद , वैविध्यपूर्ण विचार आणि अर्थपूर्ण लोकसहभागावर मजबूत लोकशाहीची उभारणी होते असे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी उद्घाटन समारंभाला संबोधित करताना सांगितले. विधिमंडळ हे चर्चा, संवाद, वादविवाद आणि विविध विचारांची देवाणघेवाण करण्याचे व्यासपीठ असल्याचे नमूद करत, ते म्हणाले की, जेव्हा सहमती आणि असहमती या दोन्ही गोष्टींना वाव असतो आणि विविध दृष्टिकोन विधिमंडळ प्रक्रियेत समाविष्ट केले जातात, तेव्हा लोकशाही अधिक बळकट होते. ते म्हणाले की, भारताच्या लोकशाही सामर्थ्याची उभारणी, विविध मते आणि दृष्टीकोन सामावून घेण्याच्या इथल्या संस्थांच्या क्षमतेवर उभारली गेली आहे.

जागतिक स्तरावर भारताचे वाढते महत्त्व अधोरेखित करताना बिर्ला म्हणाले की, भारताचा लोकशाहीविषयक अनुभव आणि घटनात्मक मूल्यांप्रति असलेली निष्ठा यामुळे जगात भारताचा आवाज बुलंद झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, 'वसुधैव कुटुंबकम्' या आपल्या सांस्कृतिक मूल्यांचा आधार घेत, भारत जागतिक आव्हानांवर उपाय शोधण्यात योगदान देत आहे. त्यांनी सांगितले की, लोकांच्या अपेक्षा आणि आकांक्षांचे धोरणे, कायदे आणि प्रभावी प्रशासनात ज्या प्रकारे रूपांतर केले जाते, त्यामध्येच लोकशाहीची खरी ताकद दिसून आली पाहिजे. गोव्यासारख्या छोट्या राज्यांमध्ये, जिथे लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांच्यात जवळचा संवाद असतो, अशा राज्यांमधील निवडून आलेल्या प्रतिनिधींची विशेष जबाबदारीही त्यांनी अधोरेखित केली. त्यांनी लोकप्रतिनिधींना आवाहन केले की, त्यांनी आपल्या मतदारसंघातील नागरिकांच्या आकांक्षा, अडचणी आणि आव्हाने याबाबत संवेदनशील राहावे आणि त्याचे वेळेवर निराकरण करण्याचा प्रयत्न करावा.

तंत्रज्ञानामुळे नागरिकांना नियम, कायदे, धोरणे, विधिमंडळातील चर्चा आणि समित्यांच्या कामकाजाशी संबंधित माहिती मिळवणे शक्य होते, ज्यामुळे विधिमंडळाच्या प्रक्रियेबद्दलची लोकांची आकलनक्षमता लक्षणीयरीत्या वाढू शकते; यावर भर देत लोकसभा अध्यक्षांनी अधिक पारदर्शकता आणि सुलभतेचे आवाहन केले, ज्यामुळे विधिमंडळ आणि जनता यांच्यातील संबंध अधिक दृढ होऊ शकतील. नवनवीन उपक्रम स्वीकारण्याबाबत विविध राज्यांच्या विधिमंडळांमध्ये निकोप स्पर्धा असावी असे आवाहन करताना बिर्ला म्हणाले की, विधिमंडळांनी एकमेकांकडून शिकावे आणि तंत्रज्ञान, विधिमंडळ प्रक्रिया व संस्थात्मक सुधारणा यांसारख्या क्षेत्रांतील सर्वोत्तम कार्यपद्धती सामायिक कराव्यात. लोकशाही संस्था बळकट करण्यासाठी विधिमंडळांमध्ये 'निकोप स्पर्धा' निर्माण करणे हाच मुख्य उद्देश असायला हवा, असेही त्यांनी नमूद केले.

लोकसभा अध्यक्षांनी लोकशाही संस्थांमध्ये युवकांच्या अधिकाधिक  सहभागावरही भर दिला. ते म्हणाले की, तंत्रज्ञान, शिक्षण, संशोधन आणि नवोन्मेष  या क्षेत्रांमध्ये भारताचे युवक आघाडीवर आहेत आणि विधिमंडळ प्रक्रियेतील त्यांच्या सहभागामुळे अधिक चांगली धोरणे व कायदे आखण्यास मदत होईल. गोवा मुक्ती चळवळीचा इतिहास आणि राज्याचा विधिमंडळ प्रवास अधोरेखित करणारे  चार दिवसांचे कार्यक्रम आयोजित करण्याच्या गोवा विधानसभेच्या उपक्रमाचे त्यांनी स्वागत केले. अशा उपक्रमांमुळे युवकांना विधिमंडळ संस्थांशी जोडण्यास आणि लोकशाही प्रक्रियेबद्दलची त्यांची समज वाढवण्यास मदत होईल, असेही त्यांनी नमूद केले.

बिर्ला यांनी नमूद केले की गोव्याची एक वैशिष्ट्यपूर्ण ओळख आहे; हे राज्य केवळ नैसर्गिक सौंदर्य, समुद्रकिनारा आणि समृद्ध सांस्कृतिक वारशासाठीच नव्हे, तर येथील सामंजस्यपूर्ण जीवनशैलीसाठीही ओळखले जाते. गेल्या 25 वर्षांत राज्याच्या सामाजिक-आर्थिक विकासात योगदान देणारे विद्यमान व माजी मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष, मंत्री, खासदार आणि गोवा विधानसभेचे सदस्य यांचे त्यांनी अभिनंदन केले.

तसेच,चर्चा, मते आणि विधिमंडळातील कामकाजाद्वारे विधानसभेची प्रतिष्ठा व सन्मान उंचावणाऱ्या सर्व लोकप्रतिनिधींच्या योगदानाचाही त्यांनी उल्लेख केला. बिर्ला म्हणाले की, गोव्याचा विकासाचा प्रवास वैशिष्ट्यपूर्ण राहिला आहे, कारण राज्याला आपला समृद्ध वारसा आणि नैसर्गिक पर्यावरण जपत असतानाच उद्योग, व्यापार, पर्यटन आणि शिक्षण क्षेत्रांनाही प्रोत्साहन द्यावे लागले. हा समतोल राखणे ही एक आव्हानात्मक पण महत्त्वाची जबाबदारी होती,असे त्यांनी सांगितले. त्यांनी नमूद केले की, आज गोव्याने पर्यटन, उद्योग आणि शिक्षण क्षेत्रात आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे आणि त्याच वेळी तेथील लोकांचा सन्मान व जीवनमानाचा दर्जाही कायम राखला आहे.विविध धोरणे, कायदे आणि जनताभिमुख  उपक्रमांच्या माध्यमातून या प्रवासात योगदान देणाऱ्या तत्कालीन सरकारांच्या आणि लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले.

रौप्य महोत्सव हा केवळ गेल्या 25 वर्षांतील विधानसभेच्या कामगिरीचा सोहळा साजरा करण्याचा प्रसंग नाही तर, पुढील 25 वर्षांचा वेध घेण्याची एक संधी आहे असे लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सांगितले. गोवा विधानसभेने विकसित भारताच्या संकल्पाला अनुसरून नागरिक, युवा आणि महिलांचा जास्तीत जास्त सहभाग असेल असा भविष्यवेधी मार्गदर्शक आराखडा तयार करावा, असे आवाहन त्यांनी केले. प्रत्येक नागरिकाला, विशेषतः वंचित  घटकातील प्रत्येक व्यक्तीला विधानसभा हे आपल्या आकांक्षा आणि अपेक्षांचे प्रतिनिधित्व करणारे, या आकांक्षाना प्रतिसाद देणारे व्यासपीठ वाटले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

पुढील 25 वर्षे ही लोकशाही संस्था अधिक भक्कम, प्रत्येकासाठी अधिक उपलब्ध, उत्तरदायी, प्रतिसाद देणाऱ्या आणि निकालभिमुख करण्यावर लक्ष केंद्रित करायला  हवे यावर त्यांनी  भर दिला. कायदेमंडळाच्या कामकाजात जनतेचा सहभाग वाढला तर लोकशाही संस्था नागरिकांप्रती अधिक उत्तरदायी आणि जबाबदार बनतील, असे त्यांनी नमूद केले.

या निमित्ताने ओम बिर्ला यांनी गोवा विधानसभेने सध्याच्या इमारतीतील 25 वर्षे पूर्ण केल्याबद्दल अभिनंदनही केले. गोवा विधानसभा राज्याची वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती, वारसा आणि नैसर्गिक पर्यावरणाचे जतन करत  गोव्याच्या आर्थिक तसेच सामाजिक विकासात आपले योगदान देत राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गोव्याच्या विकासात तसेच राज्यातील लोकशाही संस्थांना बळकट करण्यात योगदान दिलेल्या सर्व विद्यमान आणि माजी सदस्यांना, अध्यक्षांना, मुख्यमंत्र्यांना आणि इतर लोकप्रतिनिधींनाही बिर्ला यांनी शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने ओम बिर्ला यांच्या हस्ते गोवा विधानसभा आणि सचिवालय इमारतीच्या कस्टमाइज्ड माय स्टॅम्प अर्थात विशेष उद्देशाने तयार केलेल्या टपाल तिकीटाचे आणि विशेष पाकिटाचे अनावरणही झाले. यासोबतच त्यांच्या हस्ते नामवंत व्यक्तींचा सत्कारही करण्यात आला.

या कार्यक्रमात गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, गोवा विधानसभेचे अध्यक्ष डॉ. गणेश गावकर,गोव्याचे विधिमंडळ कामकाज मंत्री माविन गुदिन्हो,गोवा विधानसभेचे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आणि इतर मान्यवरांनीही आपले विचार मांडले.

गोवा विधानसभेचे अध्यक्ष डॉ.गणेश गावकर यांनी स्वागतपर भाषण केले,तर गोवा विधानसभेचे उपाध्यक्ष जोशुआ पीटर डिसोझा यांनी आभार प्रदर्शन केले.

 
पीआयबी मुंबई |शैलेश पाटील/निलिमा चितळे/राजश्री आगाशे/सुषमा काणे/तुषार पवार/प्रिती मालंडकर 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2319824) अभ्यागत कक्ष : 18