कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
डॉ. जितेंद्र सिंह उद्या नवी दिल्लीतील आयआयपीए येथे 17 व्या पेन्शन अदालतीचे अध्यक्षस्थान भूषवणार
अतिवयोवृद्ध निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतन धारकांच्या दीर्घकाळ प्रलंबित 897 तक्रारींचे निवारण केले जाणार
निवृत्तीवेतन अदालत : निवृत्तीवेतनविषयक तक्रारींच्या निवारणासाठी पर्यायी यंत्रणा
Posted On:
04 OCT 2026 1:57PM by PIB Mumbai
केंद्र सरकारच्या निवृत्तीवेतनधारकांच्या तक्रारींचे तात्काळ निवारण करण्यासाठी निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाने (डीओपीपीडब्ल्यू) पेन्शन अदालत हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. विशिष्ट प्रकारच्या तक्रारीशी संबंधित सर्व संबंधित भागधारकांना एकाच मंचावर आणून दीर्घकाळ प्रलंबित निवृत्तीवेतनविषयक तक्रारींचे निराकरण करण्याची संधी या उपक्रमामुळे मिळते. त्यामुळे हा उपक्रम संपूर्ण सरकारचा दृष्टिकोन या भावनेनुसार कार्य करतो. पर्यायी निवारण यंत्रणा म्हणून निवृत्तीवेतन अदालत महागड्या आणि वेळखाऊ न्यायालयीन प्रक्रियेची गरज दूर करण्यास मदत करते. त्याद्वारे तक्रारींच्या निवारणासाठी कार्यक्षम आणि किफायतशीर यंत्रणा उपलब्ध होते. न्यायालयीन खटले कमी करण्याच्या केंद्र सरकारच्या वचनबद्धतेचाही हा एक भाग आहे.
डीओपीपीडब्ल्यूने 2017 मध्ये हा उपक्रम सुरू केल्यापासून पेन्शन अदालती गुंतागुंतीच्या आणि दीर्घकाळ प्रलंबित निवृत्तीवेतनविषयक तक्रारींचे निराकरण करण्यासाठी कार्यक्षम आणि प्रभावी यंत्रणा म्हणून पुढे आल्या आहेत. 71.79% यशाच्या दरासह, या उपक्रमाने आतापर्यंतच्या 16 पेन्शन अदालतींच्या माध्यमातून एकूण 28,797 पैकी 20,676 तक्रारींचे जागेवरच निराकरण करून आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. उर्वरित प्रकरणांचेही संबंधित पेन्शन अदालतीनंतर डीओपीपीडब्ल्यू द्वारे आयोजित आंतर मंत्रालयीन आढावा बैठकींच्या माध्यमातून निवारण करण्यात आले आहे.
हीच प्रक्रिया पुढे नेत, निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागातर्फे 17वी पेन्शन अदालत 05 ऑक्टोबर 2026 रोजी नवी दिल्लीतील आयआयपीए येथील टी. एन. चतुर्वेदी स्मृती सभागृहात आयोजित करण्यात येणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री (कार्मिक) डॉ. जितेंद्र सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ही लोकअदालत होणार आहे.
ही पेन्शन अदालत विषयाधारित स्वरूपाची असल्याने विशेष आहे. सीपीईएनजीआरएएमएस पोर्टलवर दाखल करण्यात आलेल्या आणि 24 मंत्रालये/विभागांशी संबंधित अतिवरिष्ठ निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांच्या 897 तक्रारी निवारणासाठी या अदालतीत घेण्यात आल्या आहेत.
देशभरातील अतिवरिष्ठ निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारक आणि त्यांचे नातेवाईक या कार्यवाहीत हायब्रिड पद्धतीने सहभागी होणार आहेत. तक्रारदारांना प्रत्यक्ष किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे निवृत्तीवेतन लोकअदालतीत सहभागी होण्याची सुविधा देण्यात आली आहे.
या कार्यवाहीदरम्यान, 13 मे 2026 रोजी झालेल्या 16व्या निवृत्तीवेतन लोकअदालतीच्या यशोगाथा अधोरेखित करणाऱ्या पत्रिकांचे प्रकाशनही केंद्रीय राज्यमंत्री (कार्मिक) डॉ. जितेंद्र सिंह यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. याशिवाय, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांशी संबंधित विविध विषयांवरील वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs) असलेल्या पुस्तिकेचेही प्रकाशन करण्यात येणार आहे.
***
नेहा कुलकर्णी/नितीन गायकवाड/हेमांगी कुलकर्णी/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2318885)
अभ्यागत कक्ष : 9