संरक्षण मंत्रालय
भारतीय नौदलाच्या सह्याद्री व कुलीश या जहाजांचा एआयएमइ 2026 सराव यशस्वीरित्या पूर्ण
Posted On:
03 OCT 2026 5:26PM by PIB Mumbai
भारतीय नौदलाच्या सह्याद्री व कुलीश या जहाजांनी आसिआन भारत सागरी सराव (एआयएमइ) 2026 यशस्वीपणे पूर्ण केला. ‘विश्वासाच्या नांगरावर, समुद्रात एकत्र’ ही संकल्पना असलेला हा सराव फिलिपीन्समध्ये आयोजित करण्यात आला होता. या सरावामुळे बंदर व समुद्रातील टप्प्यांमधून व्यावसायिक संवाद, कामकाजातील सहकार्य आणि समुद्रातील प्रशिक्षणांची संधी मिळाली.
उद्घाटन समारंभानंतर लगेचच बंदर टप्पा सुरू झाला. यामध्ये प्रमुख अधिकाऱ्यांचा संवाद, खेळ, योग, समुदाय संवाद आणि विषय तज्ज्ञांशी चर्चा यासारखे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले होते. परस्परांसोबत चर्चा, कामकाजातील समन्वय आणि समुद्रात जहाज नेण्याआधीचे सहकार्य व समुद्रातील टप्प्यासाठीची तयारी यांचाही यामध्ये समावेश होता.
समुद्री टप्प्यामध्ये आयएनएस सह्याद्री आणि आयएनएस कुलीश या जहाजांनी मानवी मदत व आपत्ती निवारण, भेट-बोर्ड-शोध-जप्ती (व्हीबीएसएस) आणि सध्या सुरू असलेला सराव यासह संयुक्त सागरी सरावात सहभाग घेतला. हेलिकॉप्टर सरावामध्ये एकमेकांच्या जहाजावर हेलिकॉप्टर उतरवणे, उभ्या रेषेच्या दिशेत मदत पुरवठा आणि केसव्हॅक सराव यांचा समावेश होता. या सरावामुळे सहभागी नौदलांच्या समन्वयात व आंतरकार्यकारी पद्धतीमध्ये सुधारणा झाली.
एआयएमइ 2026 च्या बंदर व समुद्री टप्प्यामुळे एकमेकांवरील विश्वास दृढ झाला आणि आंतरकार्यकारी पद्धत बळकट झाली तसेच सागरी भागीदारी वृद्धींगत करणारे योगदान दिले गेले. भारताच्या पूर्व प्रथम या धोरणानुसार आणि महासागर (सागरी क्षेत्रातील सुरक्षा व विकास यासाठी परस्पर व सर्वंकष प्रगती) या संकल्पनेला अनुसरुन सहकारी नौदलांसोबतचे संबंध दृढ करण्याची भारताची वचनबद्धता आयएनएस सह्याद्री व आयएनएस कुलीश यांच्या सहभागामुळे पुन्हा अधोरेखित झाली.




***
सुषमा काणे/सुरेखा जोशी/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2318708)
अभ्यागत कक्ष : 12