दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
महाराष्ट्र आणि गोवा मुख्य संचार लेखा नियंत्रक कार्यालयातर्फे मुंबईत पंधरवडाभर स्वच्छता अभियान आणि श्रमदान
Posted On:
02 OCT 2026 6:55PM by PIB Mumbai
महाराष्ट्र आणि गोव्याच्या मुख्य संचार लेखा नियंत्रक (सीसीए) कार्यालयातर्फे राष्ट्रीय उपक्रम ‘स्वच्छता ही सेवा-2026 ’ अंतर्गत 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2026 या कालावधीत पंधरवडाभर स्वच्छता अभियान राबवण्यात आले. यावर्षीच्या “स्वच्छतेत सहभाग, स्वच्छ भारत, विकसित भारत” या संकल्पनेनुसार राबवण्यात आलेल्या या अभियानात स्वच्छता, पर्यावरणीय शाश्वतता आणि जनसहभागाला प्रोत्साहन देण्यावर भर देण्यात आला.

या अभियानाचा एक भाग म्हणून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्वच्छतेची शपथ घेतली. स्वच्छता आणि स्वच्छताविषयक कामांसाठी स्वेच्छेने वेळ देण्याची तसेच त्यामध्ये योगदान देण्याची बांधिलकी त्यांनी व्यक्त केली. पर्यावरण संवर्धन आणि हरित क्षेत्र वाढवण्यासाठी वृक्षारोपण अभियानही राबवण्यात आले.
कचरा व्यवस्थापन आणि नागरी जबाबदारीबाबत जनजागृती करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी बॅनर आणि फलक हातात घेऊन परिसरातून जनजागृती फेरी काढली. मुंबईतील जुहू तारा रोडवरील बीएसएनएल प्रशासकीय इमारत परिसरात सामूहिक श्रमदानही करण्यात आले. यावेळी परिसरातील कचरा हटवण्यात आला तसेच वाढलेले तण काढण्यात आले.

महाराष्ट्र आणि गोव्याचे संचार लेखा नियंत्रक डॉ. सतीश चंद्र झा यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबवण्यात आले. संयुक्त मुख्य संचार लेखा नियंत्रक खांडागळे धम्मपाल अनिल आणि सहाय्यक मुख्य संचार लेखा नियंत्रक विष्णू भानुदास बोराडे यांनी अभियानाच्या कामकाजात समन्वय राखला.
उपस्थितांना संबोधित करताना डॉ. झा यांनी, स्वच्छता ही केवळ हंगामी उपक्रम न राहता ती सातत्यपूर्ण सवय बनवण्याची गरज असल्याचे सांगितले. स्वच्छ आणि निरोगी भारताच्या निर्मितीसाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपले प्रयत्न सातत्याने सुरू ठेवावेत आणि सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
***
माधुरी पांगे/हेमांगी कुलकर्णी/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2318416)
अभ्यागत कक्ष : 17