सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
महाराष्ट्रातील करगणी इथल्या जय श्रीराम वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांनी स्वच्छता मोहिमेत सहभागी होऊन घालून दिला आदर्श
Posted On:
27 SEP 2026 7:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 सप्टेंबर 2026
महाराष्ट्रातील करगणी इथल्या जय श्रीराम वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांनी स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवला. स्वच्छतेला शाश्वत आणि लोकचळवळीचे रूप देण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला अनुसरून सध्या सुरू असलेल्या स्वच्छता मोहिमेचा एक भाग म्हणून या मोहीमेचे आयोजन केले होते. या सहभागातून या ज्येष्ठ नागरिकांनी जनभागीदारी अर्थात लोकसहभागाची भावना तसेच समाज स्वच्छ आणि आरोग्यसंपन्न ठेवण्यासाठी सामूहिक उत्तरदायित्वाचे महत्त्व अधोरेखित केले. हा वृद्धाश्रम आटपाडी तालुक्यातल्या ग्रामविकास संस्थेच्या वतीने चालवला जात आहे.

स्वच्छतेत सहभाग, स्वच्छ भारत, विकसित भारत या संकल्पनेअंतर्गत स्वच्छता ही सेवा 2026 ही मोहीम राबवली जात आहे. याअंतर्गत स्वच्छता उपक्रमांमध्ये नागरिक, संस्था आणि समुदायांच्या सक्रिय सहभागावर भर दिला जात आहे.
या मोहीमेत सहभागी झालेल्या ज्येष्ठ नागरिकांनी आपल्यातला उत्साह आणि नागरिक म्हणून असलेल्या जबाबदारीच्या भावनेचे दर्शन घडवले. स्वतः पुढाकार घेत या ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या वृद्धाश्रमाच्या आवारात तसेच आसपासच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबवली. त्यांच्या या सहभागाच्या माध्यमातून परिसर स्वच्छ आणि आरोग्यदायी ठेवण्याची जबाबदारी समाजातील प्रत्येक घटकाची असल्याचा संदेश प्रभावीरित्या दिला गेला.

ज्येष्ठ नागरिकांच्या या सहभागातून समाजाला एकत्र आणणे आणि सामाजिक जागरूकतेच्या कार्यात ज्येष्ठ नागरिक किती मोलाची भूमिका बजावू शकतात ही बाबही अधोरेखीत झाली. आपल्या अनुभवाच्या, वचनबद्धतेच्या आणि नागरी उपक्रमांमधील सक्रिय सहभागाच्या माध्यमातून ते संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी उदाहरण ठरले. यासोबतच समाजाच्या सामूहिक कल्याणासाठी योगदान देण्यात वय ही कोणतीही अडचण ठरत नाही, याची प्रचितीही त्यांच्या सहभागातून आली.
या उपक्रमाच्या माध्यमातून स्वच्छ भारत या मोहिमेची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सेवा, सामुदायिक सहभाग आणि सामाजिक जबाबदारीचे महत्त्व अधिक ठळकपणे अधोरेखित झाले. अधिक स्वच्छ आणि राहण्यासाठी आरोग्यदायी वातावरणाच्या निर्मितीसाठी प्रत्येक नागरिक योगदान देऊ शकतो, अशा प्रकारचे स्वच्छतेच्या या चळवळीचे सर्वसमावेशक स्वरूपही ज्येष्ठ नागरिकांचा या सक्रिय सहभागातून दिसून आले.


महाराष्ट्राच्या करगणी इथल्या जय श्रीराम वृद्धाश्रमात राबवलेली ही स्वच्छता मोहीम म्हणजे सामूहिक कृती ही वय आणि परिस्थितीच्या पलिकडे जाऊन केली जाऊ शकते, याची प्रचिती देणारे एक उत्तम उदाहरण ठरली. यामुळे अधिक स्वच्छ, आरोग्यदायी आणि जबाबदार समाज घडवण्याच्या सामायिक ध्येयासाठी योगदान देण्याची प्रेरणाही नागरिकांना मिळाली.
ज्येष्ठ नागरिकांमधील सक्रिय सहभाग, सन्मान आणि सामाजिक बांधिलकीच्या भावनेला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच समुदायांमध्ये सामूहिक जबाबदारीची भावना निर्माण करण्यासाठी सामाजिक न्याय आणि अधिकारिता विभागाने केलेल्या प्रयत्नांचेच प्रतिबिंब या उपक्रमातून उमटले.
* * *
सुषमा काणे/तुषार पवार/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2315621)
अभ्यागत कक्ष : 10