संरक्षण मंत्रालय
भारतीय तटरक्षक दल 'क्वाड-ॲट-सी' शिप ऑब्झर्व्हर मोहिमेच्या माध्यमातून सागरी सहकार्य बळकट करणार
Posted On:
25 SEP 2026 7:22PM by PIB Mumbai
'क्वाड-ॲट-सी शिप ऑब्झर्व्हर मिशन'चा भाग म्हणून, भारतीय तटरक्षक दलाचे (आयसीजी) 'शौनक' हे जहाज 25 सप्टेंबर 2026 रोजी चेन्नईहून ऑस्ट्रेलियातील पर्थकडे रवाना झाले. भारत, ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिका या 'क्वाड' देशांमधील सागरी सहकार्य आणि परस्पर कार्यक्षमता वाढवण्याच्या दिशेने हे महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.

आंतरकार्यक्षमतेत वाढ, समन्वय आणि परस्पर विश्वास दृढ करणे करण्याच्या उद्देशाने आखण्यात आलेले जहाजावरील सराव आणि व्यावसायिक देवाणघेवाणीमध्ये सहभागी होण्यासाठी, भारत आणि जपानचे प्रत्येकी दोन आणि ऑस्ट्रेलिया व अमेरिकेच्या प्रत्येकी एका अधिकाऱ्याचा समावेश असलेले सहा 'समुद्र स्वार(सी रायडर्स)' शौनक जहाजावर आरूढ होऊन मोहिमेसाठी रवाना झाले.
'क्वाड' गटाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी 26 मे 2026 रोजी जारी केलेल्या संयुक्त निवेदनानुसार राबवण्यात येत असलेला हा उपक्रम, हिंद-प्रशांत क्षेत्रात मुक्त, खुल्या, सर्वसमावेशक आणि नियमांवर आधारित सागरी व्यवस्था कायम ठेवण्याप्रती 'क्वाड' देशांच्या सामायिक कटिबद्धतेचे द्योतक आहे.

ही मोहीम भारताच्या 'महासागर' (क्षेत्रांमधील सुरक्षा आणि विकासासाठी परस्पर आणि सर्वसमावेशक प्रगती) हा सागरी दृष्टिकोन, तसेच हिंद-प्रशांत क्षेत्रातील सामूहिक सहभाग, व्यावसायिक संबंध आणि सागरी क्षेत्रात सुरक्षित वातावरण राखण्यास आयसीजी कटिबद्ध असल्याचे अधोरेखित करते.
***
निलिमा चितळे/मंजिरी गानू/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2315170)
अभ्यागत कक्ष : 11