संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे केवळ सीमांचे रक्षण करणे नाही, वेगाने बदलत असलेल्या आणि नव्या उदयोन्मुख धोक्यांचा सामना करण्यासाठी सरकारने व्यापक संरक्षण सिद्धतेला प्राधान्य दिले आहे: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

Posted On: 24 SEP 2026 9:57PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 24 सप्‍टेंबर 2026

 

आज दि. 24 सप्टेंबर 2026 रोजी नवी दिल्ली इथे संरक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संबोधीत केले. राष्ट्रीय सुरक्षेकडे केवळ भौगोलिक सीमांचे रक्षण करण्याच्या दृष्टीने पाहणे ही पेरिमीटर फॅलसी (Perimeter Fallacy) अर्थात  सीमा संबंधी भ्रम ठरतो, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले. यावेळी त्यांनी देशाची संरक्षण सिद्धता अधिक भक्कम करण्यासाठी तसेच भविष्यातील आणि उदयोन्मुख नव्या आव्हानांचा सामना करण्यासाठी लष्कराला सज्ज ठेवण्याप्रति पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारची वचनबद्धताही पुन्हा अधोरेखित केली. शत्रूंकडून शस्त्रास्त्रे आणि तोफखान्याच्या वापराव्यतिरिक्त आधुनिक काळातील आव्हानांमधील ड्रोन आणि मानवरहित हवाई वाहनांचा (UAVs) वापर, सायबर हल्ले, लोन वुल्फ हल्ले (Lone wolf attacks) आणि दिशाभूल करणाऱ्या मोहिमांचाही अंतर्भाव असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रीय सुरक्षा ही आर्थिक आणि ऊर्जा सुरक्षेशी जोडलेली आहे, अशावेळी आपला शत्रूपक्ष अर्थव्यवस्थेला हानी पोहोचवण्याचा किंवा ऊर्जा पुरवठा साखळीत अडथळा आणण्याचा प्रयत्न करू शकतात, असे ते म्हणाले. अशा अत्यंत बदलत्या आव्हानांचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने व्यापक दृष्टिकोन अवलंबला असल्याचे ते म्हणाले.

आपल्या देशाकडे चर्चेची ताकद (Power of argument) आणि ताकदीची चर्चा (Argument of power) या दोन्ही गोष्टी आहेत, आणि समोरची व्यक्ती ज्या भाषेत उत्तम प्रकारे समजेल त्याच भाषेत आपण संवाद साधू, असा स्पष्ट संदेशही आपण दिला असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. आज आपण मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी काम करत आहोत, आणि त्याला समांतरपणेच कोणत्याही संभाव्य धोक्याचा सामना करण्यासाठी आपली संरक्षण आणि धोरणात्मक क्षमता देखील बळकट करत आहोत असे ते म्हणाले. भारत हा शांतताप्रिय देश असून भारताने कधीही युद्धाचे समर्थन केले नसल्याचेही त्यांनी नमूद केले. असे असले तरी, आपल्या अखंडतेचे आणि सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी आणि आपल्या नागरिकांचे रक्षण करण्यासाठी आपण नेहमीच सज्ज राहिले पाहिजे याची जाणीव त्यांनी करून दिली.

मुत्सद्देगिरीशिवाय लष्करी सिद्धतेची स्थिती आपल्याला संघर्षाकडे आणि सुरक्षेच्या बाबतीत द्विधा मनस्थितीच्या दिशेने नेऊ शकते, आणि त्याचवेळी आवश्यक क्षमतेशिवाय केवळ मुत्सद्देगिरीच्या आधारे पुढे जाणे हे कमकुवतपणाचे लक्षण मानले जाते आणि ते राष्ट्रीय सुरक्षेसाठी घातक ठरते, ही बाबही त्यांनी अधोरेखीत केली. त्यामुळेच या दोन्ही बाबींमधे समतोल राखण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

कोणत्याही राष्ट्राची भौतिक ताकद ही भक्कम अर्थव्यवस्था आणि मजबूत सैन्य या दोन स्तंभांवर आधारित असते असे ते म्हणाले. ज्यावेळी अर्थव्यवस्था मजबूत असते, तेव्हा राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षण सिद्धतेसाठी अधिक संसाधने उपलब्ध होतात. ज्यावेळी देश सुरक्षित असतो, तेव्हाच विकासाशी संबंधित उपक्रमांना पुढे नेण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होते. राष्ट्रीय सुरक्षा आणि राष्ट्रीय विकास या परस्परांना पूरक बाबी आहेत असे ते म्हणाले.

 

* * *

सुषमा काणे/तुषार पवार/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2314657) अभ्यागत कक्ष : 6
Read this releasein: English