सांस्कृतिक मंत्रालय
बिहारचा वारसा, लोकपरंपरा आणि आध्यात्मिक परंपरा
पंतप्रधानांना भेटवस्तू म्हणून मिळालेल्या 65 स्मृतीचिन्हामधून होतात प्रतिबिंबित
Posted On:
23 SEP 2026 9:39PM by PIB Mumbai
नवी दिल्ली,23 सप्टेंबर 2026
पीएम स्मृतिचिन्हे ई-लिलाव 2026 मध्ये सादर करण्यात आलेल्या 65 स्मृतिचिन्हांच्या संग्रहातून बिहारची सांस्कृतिक समृद्धी व्यक्त होते, ज्यात राज्यातील लोककला, हस्तकला, अध्यात्म, इतिहास आणि वारसा यांसारख्या विविध परंपरा एकत्र आल्या आहेत. या संग्रहात मधुबनी चित्रांपासून आणि सिक्की हस्तकलेपासून ते पवित्र मंदिरे, ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वे आणि राष्ट्रीय चिन्हांच्या प्रतिमांपर्यंत विविध कलाकृतींचा समावेश आहे.
एकाच परंपरेचे प्रतिनिधित्व करण्याऐवजी हा संग्रह बिहारशी संबंधित असलेल्या अनेक सांस्कृतिक अस्मितांची झलक दाखवतो.
मधुबनी आणि मिथिला परंपरा

संग्रहाचा एक महत्त्वपूर्ण भाग प्रसिद्ध मिथिला/मधुबनी चित्रकलेच्या परंपरेला समर्पित आहे. या स्मृतिचिन्हांमध्ये राम-सीता विवाह, राम दरबार, छठ पूजा, दश महाविद्या आणि पवित्र यंत्रांच्या चित्रांसोबतच रामायण दर्शवणारी कचनी शैलीतील मधुबनी कलाकृतीही समाविष्ट आहे.
प्रदेशात रुजलेल्या हस्तकला परंपरा

बिहारचा हस्तकला वारसा सिक्की गवत कलेतूनही दिसून येतो, ज्यामध्ये भारताच्या नवीन संसद भवनाची एक तपशीलवार प्रतिकृती आणि आतमध्ये सूक्ष्म कलाकुसरीची चकत्या असलेली एक पारंपरिक विणलेली सिक्की टोपली यांचा समावेश आहे. बांबूच्या सुपावरील हाताने रंगवलेली मधुबनी कलाकृती लोकचित्रकला आणि पारंपरिक उपयुक्त हस्तकला यांचा संगम साधते.

दुसरी एक वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती म्हणजे भागलपूर येथील मंजुषा (अंगिका) रंगचित्र, ज्यात भारताच्या नकाशाच्या पार्श्वभूमीवर भारत मातेचे चित्रण आहे. पिवळा, हिरवा आणि लाल या तीन पारंपरिक रंगछटांमध्ये साकारलेली ही कलाकृती मंजुषा कलेच्या कथाकथन परंपरेचे प्रतिबिंब दर्शवते.
इतिहास आणि आध्यात्मिक वारसा


हा संग्रह बिहारच्या ऐतिहासिक आणि आध्यात्मिक पटलाचाही वेध घेतो. 1857 च्या पहिल्या स्वातंत्र्ययुद्धाशी संबंधित असलेले स्वातंत्र्यसैनिक मंगल पांडे यांचे चित्रण करणारा एक ताम्रपट आहे. इतर कलावस्तूंमध्ये अशोकस्तंभ, तख्त श्री हरमंदिर जी पटना साहिब, भगवान बुद्ध, महावीर स्वामी आणि राज्यभरातील विविध मंदिरे व तीर्थक्षेत्रांच्या प्रतिमांचा समावेश आहे.
मुंगेरमधील चंडिका स्थान आणि बडी दुर्गा महाराणी, सीतामढीमधील पुनौरा धाम, भोजपूरमधील माँ अरण्य देवी मंदिर, मुझफ्फरपूरमधील बाबा गरीबनाथ मंदिर, गोरखनाथ धाम आणि कैमूरमधील मुंडेश्वरी देवी मंदिर या वैशिष्ट्यपूर्ण धार्मिक स्थळांचा यात समावेश आहे.
या संग्रहात जन नायक कर्पूरी ठाकूर, आचार्य चाणक्य आणि गुरू वाल्मिकी यांच्याशी निगडित स्मृतिचिन्हांचा समावेश आहे, तसेच रामायण आणि इतर सांस्कृतिक परंपरांचे प्रतिनिधित्व केले आहे.
₹1,500 ते ₹1,20,000 पर्यंतच्या किंमतींचा हा बिहार संग्रह पंतप्रधानांना सादर केलेल्या स्मृतिचिन्हांच्या माध्यमातून राज्याच्या कला, हस्तकला, श्रद्धा आणि इतिहासाच्या जिवंत परंपरांशी जोडले जाण्याची संधी संग्राहकांना देतो.
पीएम मेमेंटोज ई-लिलावाची 8 वी आवृत्ती 2 ऑक्टोबर 2026 पर्यंत ऑनलाइन सुरू आहे. लिलावाच्या तारखा, सहभागाचा तपशील आणि संपूर्ण कॅटलॉगसाठी अधिकृत पीएम मेमेंटोज ई-लिलाव पोर्टलला येथे भेट द्या
https://pmmementos.gov.in/#/
निलिमा चितळे/नंदिनी मथुरे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2314201)
अभ्यागत कक्ष : 8