संरक्षण मंत्रालय
भारत-मंगोलिया यांच्यातल्या 'नोमॅडिक एलिफंट' या संयुक्त लष्करी सरावाला पिथौरागढ येथे प्रारंभ
Posted On:
21 SEP 2026 8:12PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 सप्टेंबर 2026
18 वा भारत आणि मंगोलिया वार्षिक संयुक्त लष्करी सराव 'नोमॅडिक एलिफंट' आज उत्तराखंडमधील पिथौरागढ येथील परदेशी प्रशिक्षण केंद्र येथे सुरू झाला. भारत आणि मंगोलिया यांच्यात आळीपाळीने आयोजित केला जाणारा 'प्लॅटून' स्तरावरील हा सराव 21 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर 2026 दरम्यान चालेल. या सरावात भारतीय लष्कर आणि मंगोलियन सशस्त्र दलांचे प्रत्येकी 45 जवान सहभागी झाले आहेत. या सरावाची मागील आवृत्ती मे-जून 2025 मध्ये मंगोलियातील उलानबतार येथे आयोजित करण्यात आली होती.
या सरावाचा उद्देश संयुक्त राष्ट्रांच्या आदेशानुसार निमशहरी आणि डोंगराळ प्रदेशात दहशतवाद -विरोधी अभियान राबवण्यासाठी दोन्ही देशांची संयुक्त लष्करी क्षमता वाढवणे हा आहे.
या संयुक्त प्रशिक्षणात सामरिक स्तरावरील मोहिमा,सर्वोत्तम पद्धतींचे आदानप्रदान ,संचालन सरावांमध्ये सुधारणा आणि दोन्ही सैन्यांमधील आंतरकार्यक्षमता वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल.प्रशिक्षण अभ्यासक्रमात इतर उपक्रमांसोबतच 'घेराबंदी आणि शोध मोहिमा' ,'रूम इंटरव्हेन्शन ड्रिल्स','विशेष हेलिकॉप्टर अभियान ','सायबर सुरक्षा प्रशिक्षण' आणि ड्रोन व ड्रोन विरोधी प्रणालींचा वापर यांचा समावेश असेल. या सरावांमुळे दोन्ही सैन्यांच्या तुकड्यांना वास्तविक संचालन परिस्थितीत एकत्र प्रशिक्षण घेण्याची आणि संयुक्तपणे काम करण्याची त्यांची क्षमता मजबूत करण्याची संधी मिळेल.
'नोमॅडिक एलिफंट 2026' हा सराव भारत आणि मंगोलिया यांच्यातील संरक्षण सहकार्य वृद्धिंगत करेल आणि या दोन मित्र राष्ट्रांमधील मैत्री व परस्पर विश्वासाचे दीर्घकालीन बंध अधिक मजबूत करेल.



निलिमा चितळे/सुषमा काणे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2313206)
अभ्यागत कक्ष : 11