संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आयएनएस त्रिशूल'ची इजिप्तमधील अलेक्झांड्रिया बंदराला भेट

Posted On: 19 SEP 2026 6:40PM by PIB Mumbai

 

भारतीय नौदलाची मार्गदर्शित क्षेपणास्त्रे असलेली 'आयएनएस त्रिशूल' ही नौका नौदलात दाखल झाल्याच्या प्रक्रियेचा भाग म्हणून सुरू झालेल्या तिच्या प्रवासांतर्गत तिने 14 ते 17 सप्टेंबर 2026 या कालावधीत इजिप्तमधील अलेक्झांड्रिया बंदराला भेट दिली. अलेक्झांड्रिया बंदरात आगमन झाल्यावर, इजिप्तच्या नौदलाच्या 'अल कादिर' या जहाजाने सोबत करत या जहाजाचे अगत्याने स्वागत केले.

'आयएनएस त्रिशूल'चे कमांडिंग ऑफिसर आणि कर्मचाऱ्यांनी 'चॅटबी वॉर मेमोरियल' येथे दोन्ही महायुद्धांमधील शूरवीरांना आदरांजली अर्पण केली. या स्मारकस्थळी 12 जणांना दफन करण्यात आले असून पूर्व भूमध्य समुद्रात बुडाल्याने मरण पावलेल्या जहाजांवरील 19 भारतीय सैनिकांची नावे या स्मारकावर कोरलेली आहेत.

इजिप्तमधील भारताचे राजदूत माननीय सुरेश के. रेड्डी यांनी 'आयएनएस त्रिशूल'ला भेट देऊन या नौकेवरील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. या संभाषणावेळी, त्यांनी या भागात भारतीय नौदलाच्या उपस्थितीचे महत्त्व स्पष्ट केले.

आयएनएस त्रिशूलने इजिप्शियन नौदलाच्या ईएनएस बर्नीस या जहाजासोबत संयुक्त सराव (पॅसेज एक्सरसाइज-पॅसेक्स) केला. या सरावात समन्वित युद्धाभ्यास, दूरसंवाद सराव आणि समुद्रात रसद पुरवठा करण्याच्या पद्धतींचा समावेश होता, या सरावामुळे दोन्ही नौदलांच्या कर्मचाऱ्यांना व्यावसायिक कौशल्यांची देवाणघेवाण करण्याची आणि परस्परसंवादक्षमता वाढवण्याची संधी मिळाली.

या नौकेने बंदरास दिलेली भेट आणि 'पॅसेक्स 'यामुळे भारताच्या आणि इजिप्त या दोन्ही देशांच्या नौदलांदरम्याच्या दीर्घकालीन संबंधांवर पुन्हा शिक्कामोर्तब झाले असून या दोन मित्र राष्ट्रांमधील सागरी सहकार्य अधिक दृढ करण्यास हातभार लावला आहे.

***

माधुरी पांगे/मंजिरी गानू/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2312586) अभ्यागत कक्ष : 12