भूविज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

स्वच्छ सागर, सुरक्षित सागर ही आता स्वच्छ किनारे आणि सुरक्षित सागरे यांच्यासाठीची, सर्वंकष सरकार आणि सर्वंकष समाज चळवळ झाली आहे: डॉ जितेंद्र सिंह


केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्या नेतृत्वाखाली आज आंतरराष्ट्रीय किनारे स्वच्छता दिनाच्या पूर्वसंध्येला जुहू बीचवर स्वच्छता मोहीम

Posted On: 18 SEP 2026 4:39PM by PIB Mumbai

 

आंतरराष्ट्रीय किनारे स्वच्छता दिना"च्या पूर्वसंध्येला, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान, पृथ्वी विज्ञान आणि पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांच्या नेतृत्वाखाली आज मुंबईत जुहू चौपाटीवर किनारा स्वच्छता मोहीम यशस्वीपणे राबवण्यात आली. यावेळी डॉ. जितेंद्र सिंह यांनी, भारताच्या अद्यापही पूर्णपणे उपयोगात आणल्या न गेलेल्या सागरी संपदेचे महत्त्व अधोरेखित केले. भारताच्या नील अर्थव्यवस्थेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या डीप ओशन मिशनची भूमिका महत्वाची असेल, असे, डॉ. सिंह यावेळी म्हणाले.

‘स्वच्छ सागर, सुरक्षित सागर’ ही मोहीम 2022 साली, भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झालयानिमित्त सुरु करण्यात आली होती, असे त्यांनी सांगितले. आज ही मोहीम, स्वच्छ किनारे आणि सुरक्षित सागरे यांच्यासाठीची, एक सर्वंकष सरकार आणि सर्वंकष समाजाचा सहभाग असलेली चळवळ बनली आहे, असे मत, डॉ सिंह यांनी व्यक्त केले.
75- दिवसांच्या आंतर-मंत्रालयीन मोहिमेची व्याप्ती आता, किनारी स्वच्छता दिनाचे औचित्य साधून, एक वार्षिक देशव्यापी उपक्रमापर्यंत वाढली आहे, असेही ते पुढे म्हणाले सप्टेंबर महिन्याचा शनिवार, सर्व सरकारी संस्था आणि नागरिकांना एकत्र आणून, देशाचे किनारे आणि सागरी पर्यावरणाचे रक्षण करणारा सामूहिक प्रयत्न ठरला आहे, असेही त्यांनी सांगितले 2026 साली ही मोहीम 12 ते 19 सप्टेंबर या कालावधीत राबवण्यात आली होती.
डॉ. जितेंद्र सिंह यांनी आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिनाच्या पूर्वसंध्येला मुंबईतील जुहू चौपाटीवर आयोजित किनारपट्टी स्वच्छता मोहिमेचे नेतृत्व केले. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. टी. श्रीनिवास कुमार तुम्माला आणि बीसीसीआय अध्यक्ष मिथुन मन्हास यांच्यासह पृथ्वी विज्ञान मंत्रालय व त्याच्या संस्थांचे संचालक आणि वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी, दिग्गज व्यक्ती, स्वयंसेवक आणि इतर सहभागी या वेळी उपस्थित होते. या कार्यक्रमात सामूहिक समुद्र शपथ घेण्यात आली, ज्यानंतर प्रत्यक्ष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यामध्ये डॉ. जितेंद्र सिंह यांनी अधिकारी आणि स्वयंसेवकांसह किनारपट्टीवरील प्लॅस्टिक आणि इतर कचरा हटवण्याच्या कार्यात भाग घेतला.
भारताची सुमारे 11,098 किमी लांबीची किनारपट्टी तिच्या किनारी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पसरलेली आहे आणि ती विविध परिसंस्था, समुदाय तसेच आर्थिक उपक्रमांना आधार देते. याचा अथांग विस्तार लक्षात घेता सागरी कचऱ्याची समस्या सोडवण्यासाठी आणि नाजूक किनारपट्टी परिसंस्थेचे रक्षण करण्यासाठी सरकार, वैज्ञानिक संस्था, किनारी समुदाय आणि नागरिकांद्वारे समन्वित कारवाईची आवश्यकता आहे.
12 ते 19 सप्टेंबर दरम्यान आयोजित केली जाणारी 'स्वच्छ सागर सुरक्षित सागर' ची 2026 मधील आवृत्ती देशभरात किनारपट्टी स्वच्छता मोहिमा आणि सार्वजनिक सहभागाचे विविध उपक्रम सादर करत आहे. महासागर संवर्धन आणि जबाबदार पर्यावरणीय पद्धतींना प्रोत्साहन देण्याच्या देशव्यापी प्रयत्नांचा एक भाग म्हणून ही मोहीम नागरिक, विद्यार्थी, किनारी समुदाय, शैक्षणिक संस्था, गैर-सरकारी संस्था, स्वयंसेवी संस्था आणि सरकारी यंत्रणांना एकत्र आणत आहे. पृथ्वी विज्ञान मंत्रालय आणि त्याच्या संस्था सागरी कचरा व किनारपट्टीच्या पर्यावरणीय संरक्षणाशी संबंधित वैज्ञानिक आणि सार्वजनिक संपर्क उपक्रमांद्वारे या मोहिमेला पाठिंबा देत आहेत.
'सागर प्रहरी' मंचाद्वारे नागरी सहभाग अधिक मजबूत केला जात आहे, जो या मोहिमेत जनतेचा सहभाग सक्षम करतो आणि सागरी कचऱ्याच्या नोंदी ठेवण्यास मदत करतो. हा उपक्रम सागरी प्रदूषण हाताळण्यात आणि किनारपट्टी परिसंस्थेचे रक्षण करण्यात वैज्ञानिक समज आणि सार्वजनिक सहभाग एकत्रित करण्याच्या मोठ्या उद्दिष्टाला पूरक ठरतो.
जुहू चौपाटीवरील कार्यक्रमात भारताच्या किनारपट्टीचे रक्षण करण्याच्या सामायिक प्रयत्नासाठी सरकारी प्रतिनिधी, क्रीडा क्षेत्रातील दिग्गज, प्रसिद्ध व्यक्ती, स्वयंसेवक आणि नागरिक एकत्र आले. सामूहिक शपथ आणि स्वच्छता मोहिमेने भारताचे किनारे स्वच्छ ठेवणे आणि त्याचे समुद्र सुरक्षित ठेवणे ही एक सामायिक जबाबदारी आहे, ज्यासाठी केवळ एका दिवसापुरती किंवा मोहिमेपुरती मर्यादित न राहता निरंतर सहभागाची गरज आहे या संदेशाचा पुनरुच्चार केला.
'स्वच्छ सागर सुरक्षित सागर' मोहीम भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षी ज्या सामूहिक कृतीच्या भावनेने सुरू करण्यात आली होती, तीच भावना पुढे नेण्याचे काम करत आहे; ज्यामुळे अधिक स्वच्छ किनारे, अधिक निरोगी महासागर आणि अधिक शाश्वत सागरी भविष्यासाठी सार्वजनिक सहभाग मजबूत होत आहे.
फोटो - शुक्रवारी मुंबईतील जुहू चौपाटीवर किनारपट्टी स्वच्छता मोहिमेदरम्यान केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह.

 

***
 

सुवर्णा बेडेकर/राधिका अघोर/निखिलेश चित्रे/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2312290) अभ्यागत कक्ष : 8