आयुष मंत्रालय
गोव्यात पारंपरिक औषधोपचारांवरील तिसऱ्या बिमस्टेक (BIMSTEC) परिषदेचा समारोप
Posted On:
17 SEP 2026 9:29PM by PIB Mumbai
नवी दिल्ली,17 सप्टेंबर 2026
पारंपरिक औषधोपचाराचे ज्ञान, अनुवांशिक साधनसंपत्ती आणि बौद्धिक संपदा अधिकार यावरील तिसरी बिमस्टेक परिषद आणि दुसरी बिमस्टेक नोडल गृप ही समन्वय गटाची बैठक आज गोव्यात पार पडली. या बैठकांमध्ये बिमस्टेक समूहातील सर्व सात सदस्य देश सहभागी झाले होते.
दुसऱ्या दिवशी अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान (एआयआयए-ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद), गोवा यांच्या भेटीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. या भेटीदरम्यान तृतीयस्तरीय आरोग्यसेवा आणि शैक्षणिक क्षेत्रातील अत्याधुनिक सुविधांची माहिती प्रतिनिधींना देण्यात आली. तसेच, प्रतिनिधींनी संस्थात्मक पातळीवरील सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण केली.
पारंपरिक औषधोपचार आणि जैवविविधता संवर्धनासाठी सामायिक वचनबद्धतेचे प्रतीक म्हणून वृक्षारोपण कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते.
नोडल ग्रुपने संस्थात्मक आणि धोरणात्मक सहकार्य; मानके आणि व्यापार; दस्तऐवजीकरण आणि क्षमता निर्माण; आणि अंमलबजावणी यंत्रणा या चार प्रमुख सहकार्य क्षेत्रांवर चर्चा करून निर्णय घेतला. सर्व सदस्य देशांनी बौद्धिक संपदा, अनुवांशिक साधनसंपत्ती आणि पारंपरिक औषधोपचाराच्या ज्ञानाच्या क्षेत्रात परस्पर सहकार्य आणि पाठिंबा देण्यास सर्वानुमते सहमती दर्शवली. या सहमतीमुळे भविष्यातील प्रादेशिक सहकार्यासाठी मजबूत पाया तयार झाला आहे.
एआयआयएचे संचालक प्रा. वैद्य पी. के. प्रजापती म्हणाले की, ही परिषद महत्त्वपूर्ण ठरली. कारण, परिषद केवळ चर्चेपुरती मर्यादित न राहता अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर सर्वसंमती झाली. ‘गोवा निष्कर्षांनी’ भविष्यातील बिमस्टेक सहकार्यासाठी मजबूत पाया घातला आहे, असे त्यांनी नमूद केले.
आयुष मंत्रालयाच्या संयुक्त सचिव मोनालिसा डॅश यांनी सर्व सदस्य देशांच्या सक्रिय सहभागाचे आणि रचनात्मक सहकार्याचे कौतुक केले.
बिमस्टेक सचिवालयाच्या विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष तसेच आरोग्य आणि मनुष्यबळ विकास विभागाचे संचालक कदीरकामु कंदासामी योगनादन यांनी या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन, समन्वय आणि उत्तम आदरातिथ्य केल्याबद्दल आयुष मंत्रालय आणि एआयआयए गोवा यांचे कौतुक केले. प्रादेशिक सहकार्याचा मुख्य उद्देश लोकांचे आरोग्य आणि कल्याण सुधारणे, तसेच भावी पिढ्यांसाठी पारंपरिक औषधोपचारांचा वारसा जतन करणे हा आहे, असे त्यांनी नमूद केले.
एआयआयए गोवाच्या अधिष्ठाता प्रा. डॉ. सुजाता कदम यांनी आभार मानले. परिषदेत सक्रिय सहभाग घेतल्याबद्दल आणि तिच्या यशस्वी सांगतेसाठी योगदान दिल्याबद्दल त्यांनी सर्व बिमस्टेक सदस्य देश, प्रतिनिधी, तज्ज्ञ, अधिकारी आणि संबंधितांचे आभार मानले.




सुवर्णा बेडेकर/आशुतोष सावे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2311707)
अभ्यागत कक्ष : 5