पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधानांची अबू धाबीच्या युवराजांशी भेट

Posted On: 12 SEP 2026 1:48PM by PIB Mumbai


पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी 18 व्या ब्रिक्स परिषदेच्या निमित्ताने 12 सप्टेंबर 2026 रोजी अबू धाबीचे युवराज शेख खालिद बिन मोहम्मद यांची भेट घेतली.
दोन्ही नेत्यांनी भारत आणि  संयुक्त अरब अमिराती - युएई मधील 'सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी'च्या महत्त्वावर पुन्हा भर दिला. ही भागीदारी दोन्ही देशांतील मजबूत राजकीय, सांस्कृतिक, व्यापारी, ऊर्जा क्षेत्रातील आणि नागरिकांमधील परस्पर संबंधांवर अधिस्थित आहे. जानेवारी 2026 मध्ये यूएईचे अध्यक्ष  शेख मोहम्मद बिन झायेद अल नहयान यांचा भारत दौरा आणि मे 2026 मधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा यूएई दौरा या दोन यशस्वी भेटींचे त्यांनी यावेळी स्मरण केले.

भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेखाली यूएईने घेतलेल्या सक्रिय आणि सकारात्मक सहभागाबद्दल पंतप्रधानांनी प्रशंसा केली. भारताच्या अध्यक्षतेदरम्यान ब्रिक्स व्यासपीठावर झालेल्या सकारात्मक प्रगतीचे दोन्ही नेत्यांनी स्वागत केले. तसेच, सामायिक हितसंबंध, प्राधान्यक्रम आणि ब्रिक्स सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठी दोन्ही देश या व्यासपीठावरून एकत्रितपणे काम करत राहतील यावर सहमती दर्शवली.

दोन्ही नेत्यांनी विविध क्षेत्रांतील द्विपक्षीय संबंधांमध्ये झालेल्या प्रगतीची नोंद घेतली. यूएईच्या 'इंटरनॅशनल होल्डिंग कंपनी'ने  ओडिशामध्ये 11.5 अब्ज अमेरिकन डॉलरच्या एका एकात्मिक ग्रीनफिल्ड ॲल्युमिनियम प्रकल्पाची घोषणा केली आहे, ज्याचे नेत्यांनी स्वागत केले. हा भारतातील ॲल्युमिनियम क्षेत्रातील आतापर्यंतचा सर्वात मोठा गुंतवणूक प्रकल्प असून, यामुळे ओडिसा जागतिक स्तरावर ॲल्युमिनियम निर्मितीचे मुख्य केंद्र म्हणून उदयास येईल अशी अपेक्षा आहे.

भारत-यूएई भागीदारी परस्पर फायद्यासाठी अधिक दृढ करण्यात 'एल इमाद' (L’Imad) ही यूएईची नवी 'सोव्हरेन इन्व्हेस्टमेंट फंड' संस्था अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावू शकते, यावर नेत्यांचे एकमत झाले. यासोबतच संरक्षण, अवकाश तंत्रज्ञान, अणुऊर्जा, तंत्रज्ञान आणि नवोपक्रम यांसारख्या धोरणात्मक व उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्याच्या संधींवरही त्यांनी सविस्तर चर्चा केली.

या भेटीमुळे दोन्ही देशांतील उच्चस्तरीय नेतृत्वातील नियमित संवादाची परंपरा आणि भारत-यूएई यांच्यातील पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या चिरंतन संबंधांना अधिक बळकटी मिळाली आहे.

***

शैलेश पाटील/वैभवी जोशी/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2309457) अभ्यागत कक्ष : 20