उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

उपराष्ट्रपतींच्या हस्ते चेन्नई येथे आयोजित इंडिया व्हॉल्व्ह्ज 2026 मध्ये इंडिया व्हॉल्व्ह नोंदणीचा शुभारंभ


आरोग्यसेवा हा मानवी हक्क; वैद्यकीय प्रगती सर्वसमावेशक आणि सर्वांना सुलभ असली पाहिजे : उपराष्ट्रपती

विकसित भारतासोबतच निरोगी भारताचीही गरज : उपराष्ट्रपती

Posted On: 05 SEP 2026 7:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 5 सप्‍टेंबर 2026

 

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी आज चेन्नई येथे आयोजित इंडिया व्हॉल्व्ह्ज 2026 या राष्ट्रीय शैक्षणिक परिषदेत इंडिया व्हॉल्व्ह नोंदणीचा शुभारंभ केला. हृदयाच्या झडपांशी संबंधित तसेच हृदयाच्या रचनेशी संबंधित आजारांवरील उपचार अधिक प्रगत करण्याच्या उद्देशाने ही परिषद घेण्यात येत आहे.

वैद्यकीय अनुभव, वैज्ञानिक संशोधन, नवोन्मेष आणि परस्पर सहकार्य यांचा एकत्रित सहभाग हा मानवसेवेच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे, असे उपराष्ट्रपती यावेळी म्हणाले. देश-विदेशातील आघाडीचे हृदयरोगतज्ज्ञ, हृदय शल्यचिकित्सक, संशोधक आणि वैद्यकीय तज्ज्ञ या परिषदेत उपस्थित आहेत.

प्रत्येक वैद्यकीय प्रक्रिया, वैद्यकीय निर्णय आणि वैज्ञानिक प्रगतीमागे एक माणूस असतो, कोणत्याही रुग्णाला अधिक काळ, निरोगी आणि सन्मानाने जगायचे असते, असे त्यांनी अधोरेखित केले. हृदयाच्या झडपांशी संबंधित आणि हृदयाच्या रचनेशी संबंधित आजारांचे वाढते आव्हान कायम असले, तरी वैद्यकीय विज्ञानातील प्रगतीमुळे या आजारांवरील उपचारपद्धतीत मोठा बदल झाला आहे, असे हृदयविकाराच्या उपचार क्षेत्रात झालेल्या उल्लेखनीय प्रगतीचा उल्लेख करताना, राधाकृष्णन यांनी नमूद केले.

वैद्यकीय विज्ञानातील प्रत्येक प्रगतीसोबत तिचा लाभ सर्वांना मिळेल आणि तो सर्वांना उपलब्ध होईल, याची खात्री करण्याची नवी जबाबदारी येते, असे सांगत ते म्हणाले की, आरोग्यसेवा हा मानवी हक्क आहे आणि ती प्रत्येकाला उपलब्ध असली पाहिजे.

इंडिया व्हॉल्व्ह नोंदणीचा शुभारंभ हे या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे सांगितले. भारतासाठी विशिष्ट वैद्यकीय उपचारांशी संबंधित पुरावे तयार करण्याच्या महत्त्वावरही त्यांनी भर दिला. अशा नोंदणीमुळे आपल्या देशासाठी, आपल्या देशवासीयांचा स्वतःचा डेटा तयार करण्यास मदत होईल. तसेच, यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांना उपचारांचे परिणाम अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता येतील, असे त्यांनी नमूद केले. आव्हाने आणि कमतरता ओळखता येतील, अनुभवातून शिकता येईल आणि रुग्णसेवा अधिक चांगली करता येईल, असा विश्वास राधाकृष्णन यांनी व्यक्त केला. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञता आणि नवोन्मेषाचे केंद्र म्हणून भारताचे वाढते महत्त्व उपराष्ट्रपतींनी अधोरेखित केले. आपले डॉक्टर, शास्त्रज्ञ आणि आरोग्यसेवा क्षेत्रातील तज्ज्ञांना जगभरात आदर मिळाला आहे, असे ते म्हणाले. प्रगत वैद्यकीय उपचारांच्या क्षेत्रात भारताने उल्लेखनीय क्षमता दाखवली आहे, असेही त्यांनी नमूद केले.

2047 पर्यंत विकसित भारत घडवण्याचे उद्दिष्ट आहे. विकसित भारतासोबतच निरोगी भारतही घडला पाहिजे, असे राधाकृष्णन यांनी सांगितले. आपल्या भाषणाच्या समारोपात, नवोन्मेष, तंत्रज्ञान आणि वैज्ञानिक प्रगती यांचे अंतिम मूल्यमापन मानवी जीवन सुधारण्याच्या त्यांच्या क्षमतेवर झाले पाहिजे, अशी आरोग्यसेवा व्यवस्था निर्माण करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवाहन राधाकृष्णन यांनी केले.

इंडिया व्हॉल्व्ह्ज 2026 आणि इंडिया व्हॉल्व्ह नोंदणी विषयी:

इंडिया व्हॉल्व्ह्ज 2026 ही हृदयाच्या झडपांशी संबंधित आणि हृदयाच्या रचनेशी संबंधित आजारांवरील राष्ट्रीय शैक्षणिक परिषद आहे. या परिषदेत देशभरातील तसेच परदेशातील हृदयरोगतज्ज्ञ, हृदय शल्यचिकित्सक, संशोधक आणि आरोग्यसेवा क्षेत्रातील तज्ज्ञ वैज्ञानिक विचारांची देवाणघेवाण, प्रशिक्षण आणि संयुक्त संशोधनासाठी एकत्र आले आहेत.

 

* * *

सुषमा काणे/राज दळेकर/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2307031) अभ्यागत कक्ष : 7