वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
वाहन उद्योगाला स्थानिक उत्पादनावर भर देण्याचे, निर्यात वाढवण्याचे आणि जागतिक बाजारपेठांसाठी सज्ज होण्याचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांचे आवाहन
Posted On:
03 SEP 2026 10:08PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 सप्टेंबर 2026
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज ‘सिआम’ अर्थात भारतीय वाहन उत्पादक संस्थेच्या 66 व्या वार्षिक अधिवेशनाला प्रमुख पाहुणे म्हणून संबोधित केले. भारताची विस्तारणारी व्यापार भागीदारी, वाढती देशांतर्गत बाजारपेठ आणि उत्पादन क्षेत्रातील जागतिक बदल यांतून निर्माण होणाऱ्या संधींचा त्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी त्यांनी भारतीय वाहन उद्योगाला केले. उद्योगाला स्थानिक उत्पादनावर भर देण्याचे, तसेच तंत्रज्ञान, नमोन्मेष तसेच संशोधन आणि विकास यामध्ये गुंतवणूक करण्याचे त्याचबरोबर निर्यात वाढवून जागतिक बाजारपेठांची गरज पूर्ण करण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहनही त्यांनी केले.
आगामी काळात भारताच्या विकासगाथेत वाहन क्षेत्र हे एक अत्यंत महत्त्वाचे वाहक ठरेल असे गोयल यांनी सांगितले. या उद्योगाने दमदार वाढ दर्शवली आहे आणि लोकांचे वाढते उत्पन्न आणि आकांक्षांमुळे ही वाढ अशीच सुरू राहण्यास भरपूर वाव आहे, असेही त्यांनी नमूद केले.
कंपन्यांनी आंतरराष्ट्रीय किंवा इतर बाजारपेठांच्या तुलनेत भारतासाठी वेगळ्या दर्जाची उत्पादने बनवू नयेत, अशी सूचना त्यांनी केली. जागतिक स्तरावर विकल्या जाणाऱ्या नमुन्यांच्या तुलनेत भारतीय डिझाइन निकृष्ट मानली गेली तर, काही वाहनांची निर्यात केली जात नाही; अशा काही घटनांचा संदर्भ देत, भारतात तयार होणारी उत्पादने जागतिक दर्जाची राहतील याची खात्री करण्याचे आवाहन त्यांनी उद्योगाला केले.
सरकार व्यापार करारांच्या माध्यमातून वाहन उद्योगासाठी प्रचंड संधींचे मार्ग खुले करत आहे असे मंत्र्यांनी सांगितले.
स्थानिक उत्पादनावर भर देण्याचे, निर्यात वाढवण्याचे आणि निर्यातीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित करण्याचे आवाहन गोयल यांनी आपल्या भाषणाचा समारोप करताना उद्योजकांना केले. विकसित भारत 2047 चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जगातील सर्वोत्तम उद्योगांशी स्पर्धा करणे आवश्यक आहे, यावर त्यांनी भर दिला. या उद्योगाला सरकारकडून सातत्याने पाठिंबा मिळेल अशी ग्वाही त्यांनी दिली; तसेच भारतामध्ये अभूतपूर्व वेगाने होणाऱ्या विकासासाठी 1.4 अब्ज लोकांच्या सामूहिक प्रयत्नांची आणि आत्मविश्वासाची आवश्यकता भासणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
* * *
सुवर्णा बेडेकर/संदेश नाईक/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2306595)
अभ्यागत कक्ष : 7