वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या नेतृत्वात भारत-अर्जेंटिना संयुक्त व्यापार समितीची 4 थी बैठक संपन्न; धोरणात्मक आणि आर्थिक भागीदारी अधिक मजबूत करण्याच्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार


भारत-अर्जेंटिना दरम्यान लिथियम, ऊर्जा आणि कृषी क्षेत्रातील सहकार्याला गती; एसपीएस (SPS) चर्चेमुळे भारतीय शेतमालासाठी अर्जेंटिनाच्या बाजारपेठेचे मार्ग खुले

भारत-अर्जेंटिना औषधनिर्मिती बाजारपेठेतील प्रवेश मजबूत करणार; डिजिटल, अंतराळ आणि प्रगत तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्याचा विस्तार

व्यापार आणि गुंतवणुकीच्या नव्या संधी शोधण्यासाठी अर्जेंटिनाला भेट देणारे आजवरचे सर्वात मोठे भारतीय व्यावसायिक प्रतिनिधीमंडळ

Posted On: 29 AUG 2026 10:11AM by PIB Mumbai

 

भारत-अर्जेंटिना संयुक्त व्यापार समितीची (जेटीसी) चौथी बैठक 24 ऑगस्ट रोजी ब्युनॉस आयर्स येथील प्लासियो सॅन मार्टिन येथे पार पडली. या बैठकीत भारतीय प्रतिनिधीमंडळाचे नेतृत्व वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांनी केले, तर अर्जेंटिनाच्या प्रतिनिधीमंडळाचे नेतृत्व आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंधांचे सचिव राजदूत फर्नांडो ब्रुन यांनी केले. दोन्ही बाजूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 2025 मधील अर्जेंटिना दौऱ्यादरम्यान ठरवलेल्या कृतीआराखड्या (रोडमॅप) च्या प्रगतीचा आढावा घेतला आणि दोन्ही देशांमधील धोरणात्मक आणि आर्थिक भागीदारी अधिक दृढ करण्याच्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार केला.

2025 मध्ये भारत आणि अर्जेंटिना यांच्यातील द्विपक्षीय व्यापार 6.5 अब्ज अमेरिकी डॉलर्सच्या पार गेला असून, त्यात प्रतिवर्ष 17 टक्क्यांहून अधिक सातत्यपूर्ण वाढ नोंदवली गेली आहे. भारत हा अर्जेंटिनाचा पाचवा सर्वात मोठा व्यापार भागीदार म्हणून समोर आला आहे. परदेशी व्यापार सुलभ करण्यासाठी, बिगर-शुल्क अडथळे (नॉन-टॅरिफ बॅरिअर्स) कमी करण्यासाठी आणि गुंतवणुकीला चालना देण्यासाठी अर्जेंटिनाकडून सुरू असलेल्या प्रयत्नांमुळे अर्जेंटिनाच्या बाजारपेठेत भारतीय कंपन्यांचा सहभाग आणखी वाढण्याची अपेक्षा आहे.

खाणकाम, ऊर्जा आणि पायाभूत सुविधा क्षेत्रांतील गुंतवणुकीच्या संधींवरही चर्चा झाली. यामध्ये अर्जेंटिनाच्या लिथियम क्षेत्रात भारतातील ‘काबिल’ (KABIL) कंपनीच्या सुरू असलेल्या सातत्यपूर्ण सहभागाचाही समावेश होता. कॅटामार्का (Catamarca) येथील 'काबिल'चे खाणकाम  हे अर्जेंटिनातील भारतीय कंपनीचे पहिले लिथियम खाणकाम अभियान असून, दुसऱ्या टप्प्यातील उत्खनन पूर्ण झाल्यानंतर त्यात लक्षणीय प्रगती झाली आहे. दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठी साल्टा आणि जुजुई राज्यांमध्ये अधिक सहकार्याच्या संधी शोधल्या जात आहेत.

भारतीय कृषी उत्पादनांना अर्जेंटिनाच्या बाजारपेठेत प्रवेश मिळवून देण्याच्या दृष्टीने झालेल्या प्रगतीचीही बैठकीत दखल घेण्यात आली. भारतीय कांदे, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, द्राक्षे, बटाटे, केळी आणि डाळी यांच्यासाठी स्वच्छताविषयक आणि वनस्पती आरोग्यविषयक (सॅनिटरी आणि फायटोसानिटरी-एसपीएस) उपायांवरील तांत्रिक स्तरावरील चर्चा पुढे जात आहे. या घडामोडींमुळे भारतीय शेतकरी आणि निर्यातदारांसाठी मोठ्या संधी निर्माण होण्याची, द्विपक्षीय कृषी व्यापाराला बळकटी मिळण्याची आणि 'विकसित भारत 2047' चे ध्येय साध्य करण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.

भारतीय औषधनिर्मिती (फार्मास्युटिकल) उत्पादनांना बाजारपेठेत प्रवेश सुलभ करण्याबाबतही महत्त्वपूर्ण प्रगती झाली. अर्जेंटिनाने आपल्या औषधनिर्मितीविषयक नियामक चौकटीअंतर्गत भारताचा दर्जा अनुसूची II वरून अनुसूची I मध्ये उन्नत करण्यासाठी तसेच बाजारपेठेच्या उपलब्धतेतील अडथळे कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले आहे.

यामुळे भारतीय औषध कंपन्यांना मोठ्या संधी मिळतील आणि अर्जेंटिनामध्ये दर्जेदार तसेच परवडणाऱ्या आरोग्यसेवेचा विस्तार होईल. याशिवाय, अर्जेंटिनाची ANMAT आणि भारताची CDSCO यांच्यातील 2019 च्या सामंजस्य कराराच्या आधारे, आयुर्वेद आणि योग या क्षेत्रांतील संयुक्त उपक्रमांद्वारे सहकार्य मजबूत करण्यास दोन्ही बाजूंनी संमती दर्शवली आहे.

विमान वाहतूक, अंतराळ तंत्रज्ञान, दूरसंचार आणि डिजिटल सेवा यांसारख्या सहकार्याची उदयोन्मुख क्षेत्रे —विशेषतः 5G, कृत्रिम बुद्धिमत्ता  आणि डिजिटल पायाभूत सुविधा ही दोन क्षेत्रे उभय देशांसाठी अधिक संधी उपलब्ध करून देणारी क्षेत्रे आहेत हे दोन्ही देशांनी मान्य केले.

भारत- मेरकॉसर Mercosur (Mercado Común del Sur / Southern Common Market) प्राधान्य व्यापार करार हा देखील बाजारपेठेत प्रवेश मिळवण्यासाठी, त्या प्रवेशाचा विस्तार करण्यासाठी आणि आर्थिक एकात्मता बळकट करण्यासाठी एक महत्त्वाचा मार्ग ठरला आहे. संदर्भ अटींबाबत (Terms of Reference) झालेली प्रगती आणि 'डिजिटल मूळ प्रमाणपत्रांचा' अंगीकार  यामुळे व्यापारास चालना मिळेल आणि सीमापार व्यापार आणि व्यवसाय  अधिक कार्यक्षम होईल, अशी अपेक्षा आहे.

या संयुक्त व्यापार बैठकीनंतर (JTC) अर्जेंटीनाचे परराष्ट्र व्यवहार, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि धार्मिक व्यवहार मंत्री महामहीम पाब्लो क्विरनो आणि 'जी6' औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी यांच्यासोबत बैठक झाली. या चर्चेतून भारत-अर्जेंटिना आर्थिक संबंधांमधील संधींबाबत अर्जेंटिनाच्या व्यावसायिक समुदायाकडून उपयुक्त माहिती मिळाली; तसेच, या बैठकीच्या माध्यमातून सरकारी उपक्रम हे उद्योगांच्या गरजा आणि आकांक्षांशी सुसंगत असण्याचे महत्त्व अधोरेखित झाले.

वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांनी विविध क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेतल्या. अर्जेंटीनाचे राष्ट्रीय कृषि, पशुधन आणि मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव सर्गिओ इरेटा यांच्यासमवेत कांदा, लिंबूवर्गीय फळे, दुग्धव्यवसाय, आक्रोड, द्राक्षे आणि केळी यापदार्थांवरील पथदर्शी आरखड्याचा आढावा घेतला. वि-नियमन सचिव अलेहांद्रो काकाचे  यांच्यासोबत त्यांनी भारतीय औषधनिर्माण क्षेत्रासाठी गैर-शुल्क अडथळे आणि नियामक मान्यतेवर चर्चा केली; नवोन्मेष, विज्ञान आणि तंत्रज्ञान सचिव श्रीमती एड्रियाना बराव्हॅले यांच्यासोबत, अर्जेंटीनाच्या अंतराळ संशोधन संस्था - CONAE च्या  जोसेफिना पेरेझ, तसंच  अणु  अंतराळ क्षेत्राच्या संचालक  जिमेना शियाफिनो यांच्यासोबत, इस्रो-CONAE यांच्यादरम्यानच्या प्रस्तावित अंतराळ आणि अणु सहकार्यावर बैठक घेऊन चर्चा केली.

25  ऑगस्ट 2026  रोजी पॅलेसियो सॅन मार्टिन इथे  आयोजित करण्यात आलेल्या  भारत-अर्जेंटिना व्यवसाय मंचाच्या माध्यमातून या संबंधांना अधिक बळकटी मिळाली. या मंचाने दोन्ही देशांतील सरकारी प्रतिनिधी आणि आघाडीच्या  उद्योगांना एकत्र आणले. अर्जेंटिनाला भेट देणाऱ्या पहिल्या आणि आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या भारतीय व्यावसायिक शिष्टमंडळाचे नेतृत्व वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांनी केले. यात, यूपीएल, किर्लोस्कर आणि आदित्य बिर्ला ग्रुपच्या प्रतिनिधींसह 25 हून अधिक उद्योजकांचा समावेश होता. दोन्ही देशांच्या सामायिक दृष्टीकोनाचे मूर्त व्यावसायिक परिणामांमध्ये रूपांतर करण्यासाठी भारतीय शिष्टमंडळाने अर्जेंटिनाच्या व्यापारी समुदायाशी चर्चा केली.

या मंचाने भारतीय कंपन्यांना अर्जेंटिनातील  त्यांच्या समकक्षांशी थेट संवाद साधण्यासाठी, व्यापार आणि गुंतवणुकीसाठी नवीन मार्ग शोधण्यासाठी आणि कृषी, खनिजे, ऊर्जा, औषधनिर्माण, आरोग्यसेवा, पर्यटन, बँकिंग आणि दूरसंचार यासह प्रमुख क्षेत्रांमध्ये भागीदारीच्या संधींचा शोध घेण्यासाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ उपलब्ध करून दिले. बाजारपेठेतील प्रवेश सुधारणे, नियामक आणि व्यापारविषयक अडथळे दूर करणे, उद्योगांमधील परस्पर सहकार्य  वाढवणे  आणि उभय पक्षी व्यावसायिक सुलभता आणून दोन्ही देशांच्या सरकारी पातळीवरील संवादाचे रूपांतर ठोस व्यावसायिक निष्पत्तींमध्ये करण्यावर या चर्चांमध्ये भर देण्यात आला.

भारत-अर्जेंटिना आर्थिक भागीदारीमुळे  व्यापार विस्तार, गुंतवणुकीत वाढ आणि मूल्यनिर्मितीसाठी नवीन संधी उपलब्ध होतात. पारंपारिक आणि उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये सहकार्य मजबूत केल्यामुळे दोन्ही अर्थव्यवस्थांचा विकास आणि समृद्धीमध्ये आणखी भर पडू शकते. 

 

***

नेहा कुलकर्णी/आशुतोष सावे / सविता म्हसकर/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2304492) अभ्यागत कक्ष : 9