पंतप्रधान कार्यालय
उझबेकिस्तान आणि किर्गिझ प्रजासत्ताकच्या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी पंतप्रधानांनी केलेले निवेदन
Posted On:
29 AUG 2026 8:45AM by PIB Mumbai
मी, 29 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2026 या कालावधीत उझबेकिस्तान आणि किर्गिझ प्रजासत्ताकच्या दौऱ्यावर जात आहे.
उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष शावकत मिर्झियोयेव्ह यांच्या निमंत्रणावरून मी, 29 ते 30 ऑगस्ट रोजी राजकीय दौऱ्यासाठी ताश्कंदला भेट देणार आहे. अलीकडील वर्षांत भारत आणि उझबेकिस्तान यांच्यातील धोरणात्मक भागीदारीत महत्त्वपूर्ण प्रगती झाली आहे. व्यापार आणि गुंतवणूक, डिजिटल संपर्क, संरक्षण आणि ऊर्जा या क्षेत्रांतील सहकार्य अधिक दृढ करण्याबाबत तसेच, विकसित भारत आणि ‘यांगी उझबेकिस्तान’ अर्थात ‘नवा उझबेकिस्तान’ या सामायिक संकल्पनांना पुढे नेण्याबाबत राष्ट्राध्यक्ष मिर्झियोयेव्ह यांच्याशी चर्चा करण्यास मी उत्सुक आहे. या भेटी दरम्यान मी, ‘शास्त्री स्मारक’ आणि ताश्कंद स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ ओरिएंटल स्टडीजमधील 'महात्मा गांधी केंद्र' यांनाही भेट देणार आहे; उभय देशांमध्ये असलेले सांस्कृतिक संबंध आणि नागरिकांमधील जिव्हाळ्याच्या संबंधांप्रती ही आदरांजली आहे.
ताश्कंदहून, किर्गिझ प्रजासत्ताकाचे अध्यक्ष महामहीम सदिर झापारोव्ह यांच्या निमंत्रणावरून मी बिश्केकला जाणार आहे. शांघाय सहकार्य संघटनेला (SCO) 25 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने बिश्केक मध्ये आयोजित करण्यात आलेल्या 26व्या शिखर परिषदेत मी सहभागी होणार आहे. भारत 2017 पासून एससीओचा सक्रिय आणि रचनात्मक सदस्य आहे. सुरक्षा, संपर्क आणि संधी यांवर आधारित या क्षेत्रासाठीचा भारताचा दृष्टिकोन अधिक बळकट करण्यासाठी तसेच, आपल्या शेजारील प्रदेशात आणि त्यापलीकडील प्रदेशांतही शांतता आणि स्थैर्याला धोका निर्माण करणाऱ्या दहशतवाद, फुटीरतावाद आणि अतिरेकी विचारसरणीच्या संकटापासून मुक्त अशा क्षेत्राच्या निर्मितीसाठी इतर सदस्य देशांसोबत काम करण्यास मी उत्सुक आहे.
मी राष्ट्राध्यक्ष झापारोव्ह आणि एससीओ (SCO) मधील इतर नेत्यांची भेट घेण्यास, तसेच 'सहाव्या जागतिक नोमॅड गेम्स'च्या (World Nomad Games) उद्घाटन समारंभास उपस्थित राहण्यास देखील उत्सुक आहे; हा सोहळा मध्य आशियाच्या समृद्ध आणि अमूर्त अशा चैतन्यमय वारशाचा उत्सव आहे, ज्याबद्दल भारताला अत्यंत आदर आहे.
मला विश्वास आहे की या भेटीमुळे मध्य आशियातील भारताची धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत होईल, या प्रदेशाशी असलेले आपले सांस्कृतिक आणि ऐतिहासिक नातेसंबंध अधिक दृढ होतील आणि शांतता, स्थैर्य आणि समृद्धी या मूल्यांच्या आपल्या सामायिक प्रयत्नांना गती मिळेल. ही मूल्येच जगाशी असलेल्या भारताच्या संबंधांच्या केंद्रस्थानी आहेत.
***
नेहा कुलकर्णी/सविता म्हसकर/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2304470)
अभ्यागत कक्ष : 19