अर्थ मंत्रालय
राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीच्या(एनएडीटी) उत्तरायण-2026 या अभिमुखता कार्यक्रमाच्या सांगता समारंभाचे नागपूर येथील संकुलात आयोजन
नवीन पदोन्नती मिळालेल्या 105 सहाय्यक उत्पन्न कर आयुक्तांनी पूर्ण केले व्यावसायिक क्षमता, नेतृत्व आणि सार्वजनिक सेवेवर केंद्रित सात आठवड्यांचे प्रशिक्षण
Posted On:
28 AUG 2026 11:50AM by PIB Mumbai
राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी (एनएडीटी), नागपूर येथे 27 ऑगस्ट 2026 रोजी, नवीन पदोन्नती मिळालेल्या सहाय्यक उत्पन्न कर आयुक्तांसाठी आयोजित सात आठवड्यांच्या 'उत्तरायण-2026' या अभिमुखता कार्यक्रमाच्या सांगता सभारंभाचे आयोजन करण्यात आले. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायाधीश न्यायमूर्ती अनिल एस. किलोर या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 20 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 22 महिला अधिकाऱ्यांसह एकूण 105 अधिकारी अभिमुखता कार्यक्रमात सहभागी झाले होते.भारतीय महसूल सेवेची (IRS) विविधता आणि सर्वसमावेशक भारतीय स्वरूपाचे यातून दर्शन घडले. व्यावसायिक क्षमता, नेतृत्व कौशल्ये आणि सार्वजनिक सेवेप्रति असलेली वचनबद्धता भक्कम करणे आणि या अधिकाऱ्यांना त्यांच्या वाढलेल्या जबाबदाऱ्यांमध्ये सुलभतेने सामावून घेणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता.

‘मिशन कर्मयोगी’ची उद्दिष्टे आणि 'विकसित भारत'च्या संकल्पनेला अनुसरून क्षमता-आधारित दृष्टिकोनावर हा कार्यक्रम आधारित होता. वर्गखोल्या सत्रे, केस स्टडीज, व्यावहारिक सराव, सिम्युलेशन्स, संवादात्मक चर्चा आणि अनुभवाद्वारे अध्ययनाच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना कर प्रशासनाचे समकालीन पैलू, कायद्याचा अर्थ आणि त्याचे उपयोजन, नेतृत्व, निर्णय प्रक्रिया, नैतिकता, प्रामाणिकपणा आणि नागरिक-केंद्री सार्वजनिक सेवा या विषयांची ओळख करून देण्यात आली. वैधानिक जबाबदाऱ्या पार पाडताना सुयोग्य व्यावसायिक निर्णयक्षमता, उत्तरदायित्व, प्रतिसाद देण्याची तत्परता आणि संवेदनशीलतेचा विकास करण्यावर विशेष भर देण्यात आला.

अधिकाऱ्यांना संबोधित करताना, न्यायमूर्ती अनिल एस. किलोर यांनी या अधिकाऱ्यांचे हा कार्यक्रम पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन केले आणि त्यांच्या नवीन भूमिकांसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. उदयोन्मुख तांत्रिक आणि प्रशासकीय आव्हाने लक्षात घेता, सतत शिकणे आणि ज्ञानाच्या नवीन मार्गांसाठी खुले राहण्याच्या महत्त्वावर त्यांनी भर दिला. तंत्रज्ञान व्यावसायिक परिणामकारकता वाढवू शकते, परंतु त्याचा वापर मानवी निर्णयक्षमता आणि नैतिक जबाबदारीने मार्गदर्शित असणे आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले. कायद्याचा योग्य अर्थ लावणे, तथ्यांचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन आणि सकारण निर्णयप्रक्रिया ही प्रभावी सार्वजनिक सेवेची मूलभूत तत्त्वे आहेत, यावरही त्यांनी भर दिला.

समारोपाच्या या समारंभाने अधिकाऱ्यांच्या सखोल शिक्षण प्रवासाची सांगता झाली आणि व्यावसायिक जबाबदारीच्या एका नवीन टप्प्याची सुरुवात झाली. अभ्यासक्रम संचालकांनी अभ्यासक्रमाचा अहवाल सादर केला, ज्यामध्ये कार्यक्रमाची प्रमुख शिकण्याची उद्दिष्टे, शैक्षणिक पैलू आणि अनुभवात्मक घटक अधोरेखित करण्यात आले. अधिकृत आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. त्यानंतर राष्ट्रीय गीत (वंदे मातरम) आणि राष्ट्रगीत(जन गण मन) सादर करण्यात आले. या कार्यक्रमाने सार्वजनिक सेवेच्या बदलत्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सक्षम, नैतिक, तांत्रिकदृष्ट्या जागरूक आणि नागरिक-केंद्री कर प्रशासक घडवण्याबाबतच्या नागपूरच्या राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.

***
नेहा कुलकर्णी/शैलेश पाटील/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2304162)
अभ्यागत कक्ष : 17